Friday, September 22, 2023
HomeMarathi News Today‘रंगीला सरडा’ पडला प्रेमात!…मध्य महाराष्ट्रात दुर्मिळ सरड्याचे दर्शन...

‘रंगीला सरडा’ पडला प्रेमात!…मध्य महाराष्ट्रात दुर्मिळ सरड्याचे दर्शन…

माळराने, शेतीचा परिसर व विरळ मनुष्यवस्ती लगतच्या जंगलात आढळणारा ‘रंगीला सरडा’ सध्या प्रेमात पडलाय. या सरड्याचे दर्शन नुकतेच अमरावती येथील वन्यजीव छायाचित्रकार डॉ.तुषार अंबाडकर, विनय बढे व अमित सोनटक्के आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना झाले आहे. महाराष्ट्रात या सरड्याचे दर्शन दुर्मिळ मानले जाते. पालीच्या आकाराचा या सरड्याला इंग्रजीमध्ये ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ (Fan Throated Lizard) असे म्हणतात. सरडा डेक्कननेनिंस (Sarda deccanensis) या शास्त्रीय नावाने हा सरडा ओळखला जातो. विणीच्या काळात नर सरड्याचा गळ्याखालचा भाग रंगीत होतो. मादीला आकर्षित करण्यासाठी हा सरडा स्वतःच्या गळ्याखालील पोळे (Dewlap) मागे पुढे करून आकर्षित करतो. मादीला मात्र असे रंगीत गळ्याखालील पोळे (Dewlap) नसतात.

पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्र राज्यात याचे दर्शन दुर्मिळ आहे. या सरड्याला ‘निलपंखी सरडा’ नावानेही ओळखले जाते. या सरड्याची लांबी २२ ते २३ सेमी पर्यंत असून आकाराने हा सरडा आकारणे लहान असून लहान कीटक याचे मुख्य खाद्य आहे. या प्रजाती बद्दलचे वर्णन पहिल्यांदा शास्त्रज्ञ जॉर्डन यांनी ई.स. १८७० मध्ये केलेले आहे. हा सरडा भारतासाठी स्थानविशिष्ट (Endemic to India) प्रजाती म्हणून जगप्रसिद्ध आहे. या सरड्याचे पृथ्वीवर अस्तित्व २६ लाख वर्षापूर्वी असल्याची नोंद आहे.

जग प्रसिद्ध सरीसृप तज्ञ डॉ.वरद गिरी, डॉ.दिपक वीरप्पन, मोहम्मद असिफ काझी व के.प्रवीण कारंथ यांच्या संशोधनादरम्यान त्यांना हा सरडा पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्र राज्यात आलेला नव्हता. त्यांनी संपूर्ण भारतभर तब्बल तीन हजार सहाशे किमी फिरून यावर संशोधन केलेले आहे. या सरड्याच्या तब्बल पाच नवीन प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत, या पाचही प्रजाती जगासाठी नवीन ठरलेल्या आहेत. अमरावती परिसरात या सरड्याच्या दर्शनाने येथील जैवविविधेतेचे महत्व पुन्हा नव्याने अधोरेखित झाले असल्याचे जाणकारांचे मत आहे.

“या सरड्याचे दर्शन चकित करणारे आहे. हि नोंद महत्त्वपूर्ण असून या नोंदीसह आजवर अनेक दुर्मिळ प्रजातींचे दर्शन आपल्या भागात झाले आहे. या अनुषंगाने विदर्भातील भूस्थित परिसंस्था व कृषी परीसंस्थाचे संवर्धन होणे गरजेचे वाटते.”​ ​​​​ ​​​​​ @यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती

“या सरड्याचे दर्शन मनाला आनंद देणारे आहे. आम्ही देशी विदेशी पक्षी छायाचित्रे व वन्यप्राणी टिपण्यासाठी नियमित जात असतो. या सरड्याचे दर्शन आम्हाला प्रेरणा देणारे आहे. ” ​​ ​​@डॉ.तुषार अंबाडकर, वन्यजीव छायाचीत्रकार, अमरावती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: