Friday, May 17, 2024
Homeगुन्हेगारीआमदार भारसाखळे यांची भूमिका…सूतगिरणी कामगाराचा खुलासा….आणि सर्व कामगारांची फसवणूक…

आमदार भारसाखळे यांची भूमिका…सूतगिरणी कामगाराचा खुलासा….आणि सर्व कामगारांची फसवणूक…

Share

आकोट – संजय आठवले

आकोट तालुका सहकारी सूतगिरणीची सद्यस्थिती, कामगारांचे घेणे, गिरणी खरेदीदार, अवसायक आणि आमदार भारसाखळे यांचे भूमिकेबाबत महा व्हाईस ने वृत्ते प्रकाशित केल्यावर सूतगिरणी कामगार, खरेदीदार आणि अवसायक यांनी महा व्हाईस सोबत या विषयावर चर्चा केली. मात्र प्रकाशित वृत्तांबाबत आमदार भारसाखळे यांचे गोटातून कोणताही खुलासा आलेला नाही.

परंतु या प्रकरणात भारसाखळे यांनी वापर केलेल्या एका गिरणी कामगाराने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल करून महा व्हाईसचे वृत्तांकन अर्धसत्य असल्याचा आपल्या कुवतीनुसार जावईशोध लावला आहे. परंतु या वृत्तातील नेमकी कोणती बाब अर्धसत्य आहे हे मात्र त्याने या मेसेज मध्ये नमूद केलेले नाही.

त्यामुळे खुलासाकारांला खुल्या मंचावर चर्चेकरिता महाव्हाईस आवाहन करीत आहे. आकोट तालुका सहकारी सूतगिरणीचा खरेदी व्यवहार पार पडल्यानंतर खरेदीदारांनी मान्य केलेला कामगारांच्या घेण्याचा मुद्दा मात्र अधांतरीच राहिलेला आहे. या देण्यासोबतच शासनाचे द्यावयाचे देणे गिरणी खरेदीदारांनी अदा केलेले आहे. परंतु आपला पदर रिक्त असल्याचे पाहून गिरणी कामगारांनी आमरण उपोषणाचे शस्त्र उपसले. त्यावेळी आमदार प्रकाश भारसाखळे यांनी कामगारांना उपोषण सोडण्याची विनंती केली.

मात्र असे करताना त्यांनी कामगारांकरिता अनावश्यक असलेली अजब खेळी केली. कामगारांच्या घेण्याचा मुद्दा केवळ त्यांच्या प्रमाणीत यादी भोवती गुंतलेला असताना, भारसाखळे यांनी महसूल विभागाने घेतलेल्या सूतगिरणीच्या फेरफार व सातबारा नोंदी भोवती हा मुद्दा गुंडाळला.

त्याकरिता त्यांनी उपोषणकर्ता गिरणी कामगार देविदास रामचंद्र निकम याचेकरवी उपविभागीय अधिकारी आकोट यांचेकडे हा फेरफार व सातबारा नोंद रद्द करणेकरिता तक्रार नोंदविली. वास्तविक सुतगिरणी कामगारांना सूतगिरणीच्या मालकी हक्काबाबत काही देणे घेणे नाही. त्यांची मागणी केवळ आपल्या घामाच्या दामाची होती आणि आजही आहे.

असे असताना भारसाखळे यांनी त्या घेण्याबाबतच्या मुद्द्याला भलतेच वळण देऊन कामगारांना उपोषण सोडण्याची विनंती केली. आणि आश्चर्य म्हणजे आमदारांच्या या भानामतीला बळी पडून कामगारांनी उपोषण सोडले. त्यावर महा व्हाईसने वृत्त प्रकाशित करून कामगारांच्या झालेल्या फसवणुकीचा सविस्तर पर्दाफाश केला.

वृत्तात महा व्हाईसने काही चुकीचे लिहिले असल्यास आमदार भारसाखळे यांचेकडून त्याचे खंडन व्हावयास हवे होते. मात्र तसे न होता कोणतीही माहिती आणि कामगारांचे घेणे मिळण्याकरिता नेमके काय करावे याचा गंधही नसताना त्या तक्रारकर्त्या कामगाराने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल केला. त्यात त्यांनी लिहिले कि, ‘महा व्हाईसने अर्धसत्य लिहिले आहे. आमदार महोदयांना विनंती करून आम्हीच उपोषण मंडपात आणले’ परंतु महा व्हाईस ने नेमके काय अर्धसत्य लिहिले? त्याबाबत मात्र त्याने काहीच लिहिलेले नाही.

आता यातील गोम अशी आहे कि, आमदार महोदयांना त्यांच्या निकटस्थ काही अर्धवट ज्ञानी कार्यकर्त्यांनी अर्धवट माहिती पुरवली. त्यामुळे त्यांच्या जुन्या स्मृती चाळवल्या. सोबतच नवीन समीकरणे मांडण्याची कल्पना त्यांना सुचली. म्हणून आमदार उपोषण मंडपात आले हे महा व्हाईस ने आपल्या वृत्तांत सुचित केलेले आहे. कुणीच काहीच न सांगताही आमदार उपोषण मंडपात आले असे महा व्हाईसने कुठेच म्हटलेले नाही. त्यामुळे त्या तक्रारकर्त्या कामगाराने केलेला आरोप अतिशय फडतूस आणि लाळघोट्या असल्याचे स्पष्ट होते.

उपोषण मंडपात आमदार या तक्रारकर्त्याचे विनंतीवरुन आले हे घडीभर मान्य केले, तरी या मंडपात आमदारांनी केलेल्या वर्तनावरून त्यांना खोटी व अर्धवट माहिती दिली गेल्याचे सिद्ध होते. तसे नसते तर त्यांनी कामगारांच्या रकमेबाबतच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून आकोटच्या प्रभारी दुय्यम निबंधकांना कामगारांची यादी ताबडतोब मिळविण्याचा आदेश दिला असता. आणि ती यादी प्राप्त होताच कामगारांचा प्रश्न मार्गी लागला असता.

महत्त्वाचे म्हणजे गिरणी खरेदीदारांनी कामगारांचे देणे देण्यास अजिबात विरोध दर्शविलेला नाही. फक्त कुणाला किती रक्कम द्यायची व जे कामगार हयात नाहीत त्यांचे वारसदारांची पडताळणी करावयाची असल्याने या खरेदीदारांना कामगारांची न्यायालयाने मंजूर केलेली प्रमाणित यादी हवी आहे. ती यादी जितक्या लवकर मिळेल तितक्या लवकर कामगारांना त्यांचा पैसा मिळणार आहे. अशी वास्तविकता असताना आमदारांनी ते करावयास हवे होते. आणि कामगारांची मागणीही तीच होती.

परंतु कामगारांचा ज्याचेशी अजिबात संबंधच नाही, तो गिरणी खरेदीबाबतचा फेरफार व नोंदीचा मुद्दा उपस्थित करण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु तो मुद्दा उपस्थित केला गेला. तो उचलून धरल्या गेला. आणि कामगारांचा त्या मुद्द्याशी संबंध नसताना उपोषणकर्त्या देविदास रामचंद्र निकम याने आमदारांचे सांगण्यावरून निरर्थक तक्रार केली. यावरून हा तक्रारकर्ता आमदारांचा हस्तक असून त्यांचे ईशाऱ्यावर तर काम करीत नाही ना? असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच महा व्हाईसने अर्धसत्य लिहिले असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करून त्या कामगाराने आमदार भारसाखळे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला असे म्हणणे उचित ठरते.

त्या कामगाराने असे करण्याऐवजी आमदार भारसाखळेंना कामगारांची प्रमाणित यादी मिळवून मागितली असती, तर त्याने कामगारांचे भले झाले असते. पण जिचा कामगारांशी संबंधच नाही ती तक्रार करून आणि आता पुन्हा जिल्हाधिकारी अकोला कार्यालयासमोर उपोषण मांडण्याचा निर्धार करून कामगारांचे काय भले झाले? याचा खुलासा आता ह्या कामगाराने करायलाच हवा. कारण प्रश्न आता केवळ प्रमाणित यादीचा आहे. ती त्वरित मिळविणेकरिता दुय्यम निबंधक आकोट यांना प्रेरित करावयाचे आहे. त्याकरिता ‘जखम गुडघ्याला आणि मलमपट्टी डोक्याला’ असे तऱ्हेवाईक वागणे उचित नाही. त्यामुळे ह्या मुद्द्याला भरतीकडेच वळण देऊन हा कामगार अन्य कामगारांची दिशाभूल करून कोणता खेळ करीत आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे.

गिरणी खरेदीदारांशी महा व्हाईस ने चर्चा केलेली आहे. यादी मिळताच कामगारांचे देणे देण्याची कार्यवाही सुरू करण्यास ते राजी आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांनी हेच सांगितलेले आहे. त्यामुळे कामगारांनी यादी मिळविण्याचा एकमेव उपक्रम हाती घेऊन ती लवकरात लवकर प्राप्त करण्यातच त्यांचे हित सामावलेले आहे. आता राहिला प्रश्न महा व्हाईसने अर्धसत्य प्रकाशित केल्याचा. तर सदर मेसेजकर्ता आणि त्याचे समर्थकांनी महा व्हाईस ने लिहिलेले अर्धसत्य जाहीर करणेकरिता आम जनतेसमोर खुल्या मंचावर चर्चेकरिता यावे असे आवाहन महा व्हाईस करीत आहे.

याची वेळ व तारीख मेसेजकर्ता व त्याचे समर्थकांनी येत्या आठ दिवसात जाहीर करावी. असे न झाल्यास हा मेसेजकर्ता बिचारा एक खेळणे असून कुणीतरी त्याचा वापर करीत असल्याचे आपोआपच स्पष्ट होईल. या कामगाराचा वापर करून घेणाऱ्यांना सल्ला आहे कि, ‘भोळ्या भाबड्या कामगारांचा वापर करणेऐवजी त्यांचे घामाचे दाम मिळणेकरिता आपली शक्ती खर्ची घाला. जेणेकरून प्रताडितांना न्याय दिल्याचे पुण्य पदरी पडेल’.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: