Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणआमदार भारसाकळेंनी केली बदमाशी…हिवरखेड नगरपंचायत होण्यास सहमती दर्शविणारा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल दडपला…हिवरखेडात संतापाची...

आमदार भारसाकळेंनी केली बदमाशी…हिवरखेड नगरपंचायत होण्यास सहमती दर्शविणारा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल दडपला…हिवरखेडात संतापाची लाट…

Share

आकोट- संजय आठवले

कुण्यातरी लाळघोट्याने दिलेली विकास पुरुष ही उपाधी लावणाऱ्या आमदार प्रकाश भारसाकळेंची अट्टल बदमाशी उघड झाली असून एकही आक्षेप नसल्याने हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यास हरकत नसल्याचा जिल्हाधिकारी अकोला यांचा अहवाल आमदार भारसाखळेंनीच राजदरबारी दडपल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीच्या सर्व निकषांची पूर्तता होत असल्यावरही हा अहवाल दडपून आपल्या खोट्या मोठेपणा करिता भारसाखळे हिवरखेडकरांना नगरपरिषदेचे गाजर दाखविण्याचा कपटी खेळ करीत असल्याने हिवरखेड परिसरात कमालीचा असंतोष व संताप व्यक्त होत आहे.

गत अनेक वर्षांपासून हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे घोडे अडलेले होते. हिवरखेडकरांच्या अहोरात्र पाठपुराव्याने यासंदर्भातील कागदपत्रे एक एक टेबल पार करीत अखेर नगरपंचायतीच्या उद् घोषणेवर स्थिरावले. उद् घोषणा झाली. आक्षेप मागविले गेले. आणि आपल्याला श्रेय मिळत नसल्याचे आणि आपल्या जि.प., पं.स. सदस्यांचे नुकसान होणार असल्याचे भारसाखळेंनी ओळखले. आणि लगेच त्यांचा कुत्सितपणा खडबडून जागृत झाला. हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायतीत रूपांतरित झाल्यास तेथील लोक उपाशी मरतील असा दैवी साक्षात्कार त्यांना झाला. नगरपंचायत प्रश्नावर हिवरखेडकरात असंतोष पसरल्याचेही त्यांच्याच दिव्यदृष्टीने हेरले. येथील ९०% ग्रामस्थ अतिशय दुर्बल घटकातील असल्याचे दिव्यदर्शनही त्यांच्याच दयार्द्र हृदयास झाले. येथील विकास खुंटणार असल्याचेही त्यांच्यातील विकास पुरुषाने ओळखले. नगरपंचायत प्रस्तावाला अनेकांचा विरोधही केवळ त्यांनाच दिसला आणि म्हणूनच हिवरखेडवासियांचे इतके सारे नुकसान होऊ नये याकरिता हिवरखेड नगरपंचायत होण्यास त्यांनी अवरोध निर्माण केला. आपल्या सत्तेचा सदुपयोग करून त्यांनी या प्रस्तावावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून स्थगनादेश मिळविला. सोबतच हा स्थगनादेश मिळवताना त्यांनी आपले काही हेतूही साध्य केले. पहिला हेतू म्हणजे आपल्या कडोसरीला खोचलेल्या आपल्या जि. प., पं. स. सदस्यांना द्यावे लागणारे राजीनामे वाचविले. दुसरा हेतू म्हणजे नगरपंचायत करण्याचे इतरांना जाणारे श्रेय थांबविले. तिसरा हेतू म्हणजे हिवरखेडकरांना नगरपरिषद देण्याचे गाजर दाखवून त्यांचे दोन गट पाडले.

एकीकडे भारसाखळे यांचे हे कपटी डावपेच सुरू असतानाच शासकीय यंत्रणा मात्र आपली जबाबदारी चोखपणे बजावत होती. शासनाने जिल्हाधिकारी अकोला यांचेकडून हिवरखेड नगरपंचायत होणेसंदर्भात आक्षेप व हरकती मागविल्या. त्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी श्रीकांत देशपांडे उपविभागीय अधिकारी आकोट यांचे अध्यक्षतेखाली संतोष यावलीकर, तहसीलदार तेल्हारा व भारत सिंग चव्हाण, गटविकास अधिकारी तेल्हारा या दोन सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली. या समितीकडे एकूण २१ आक्षेप नोंदविण्यात आले. या समितीने दिनांक ८.८.२०२२ रोजी सूचना देऊन १२.८.२०२२ रोजी आक्षेपकर्त्यांची प्रथम सुनावणी घेतली. त्यानंतर दिनांक ३०.८.२०२२ रोजी सूचना देऊन दिनांक २.९.२०२२ रोजी दुसरी सुनावणी घेतली. या दोन्ही सुनावणी मध्ये बाळकृष्ण ओंकार सदाफळे, शेख नईम शेख नजीर, प्रदीप मुरलीधर इंगळे, रोहन भारत झगडे, सौ. गोकुळा महेंद्र भोपळे या ५ लोकांनी आपले आक्षेप मागे घेऊन नगरपंचायत होण्यास संमती दर्शविली. आम्ही आक्षेप घेतलेला नसून आक्षेप अर्जावर आमचे नाव न विचारता टाकले असे अनुप बंडूभाऊ धुरदेव, रवी राजाराम घारपवार, अमोल रामकृष्ण ढबाले या तिघांनी सांगितले. तर खोटी माहिती देऊन छापील अर्जावर आमची स्वाक्षरी घेतल्याचे सौ.सदफ नाजमीन अब्दुल आदिल व मंगेश काशीराम कोष्टी या दोघांनी सांगितले.

राजेश मनोहर इंगळे, सागर मंगल धुरदेव, विशाल विजय बैस, बाळकृष्ण भगवान वाकोडे, गजानन शालिग्राम ताडे, शिवा आनंद ढगे, शरद जयप्रकाश इंगळे, राम सुरेंद्र भोपळे, ज्ञानेश्वर रमेश राऊत आणि सुनील चिरंजीलाल बजाज हे दहा जण दोनदा नोटीस देऊनही सुनावणीस हजर झाले नाहीत. मात्र सुनील बजाज यांनी नोटीस वर लिहिले की, “मी सुनावणीस हजर राहू शकत नाही. परंतु अर्जाशी सहमत आहे.” असाच प्रकार विशाल पांडुरंग कुलट यांनीही केला. सुनावणी वेळी त्यांनी लेखी न देता, आक्षेप अर्जाशी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे यातील एकही आक्षेप कायम टिकला नाही. परिणामी साऱेच्या सारे आक्षेप खारिज करण्यात आले. एकही आक्षेप नसल्याने हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर करावयास हरकत नसल्याचा स्वयं स्पष्ट अभिप्राय नोंदवून समितीने तसा अहवाल जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचेकडे पाठविला. त्यांनी तो अहवाल नगर विकास मंत्रालयास पाठवून हिवरखेडचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यास सहमती दर्शविली.

मात्र सरकार दरबारी हा अहवाल जाताच आमदार भारसाखळेंची “शुगर” वाढली आणि त्यांनी आपल्या सत्तेचा सदुपयोग करून सदर अहवाल जागीच दडपून टाकला. त्यांच्या या वर्तनाने “आपला तो आपलाच असतो आणि परका हा परकाच असतो” या म्हणीचे प्रत्यंतर आले. वास्तविक आकोट मतदार संघाशी भारसाखळेंचा काडीचाही संबंध नाही. तरीही येथील जनतेने त्यांना भरभरून मत देऊन दोनदा आमदार केले. आता कृतघ्नपणा करून भारसाखळे त्याच जनतेला आपल्या आमदारकीचा तोरा दाखवीत आहेत. त्यामुळे हिवरखेड परिसरात प्रचंड असंतोष पसरला आहे. परिणामी भारसाखळेंना अतिशय दुर्बल घटकात दिसलेली हिवरखेडची जनता आता त्यांना मतांच्या उपासमारीकडे नेणार असल्याचे संकेत आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: