Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा – जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे…

नांदेड – महेंद्र गायकवाड

सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजना, थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज योजना आदी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी पात्र लाभधारकांनी पुढे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना 11 जुलै 1985 रोजी झाली आहे. महामंडळाच्या भागभांडवलात भरघोस वाढ होऊन महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 1 हजार कोटी झाले आहे. मंजूर भागभांडवलापैकी सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी 100 कोटी प्रमाणे 200 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. यापैकी शासनाकडून 100 कोटी निधी प्राप्त झाला असून 31 मार्च 2024 पर्यंत उर्वरित 100 कोटी प्राप्त होणार आहे.

या आहेत योजना
एन.एस.एफ.डी.सी.योजना
(राष्ट्रीय अनुसुचीत जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली) या महामंडळाचे 105 कोटी रुपये थकीत असल्यामुळे त्यांच्याकडून निधी मिळणे 2015 पासून बंद होते. सर्व थकित रक्कम भरणा केल्यामुळे मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये, महिला समृध्दी योजना प्रकल्प रक्कम 1 लाख 40 हजार, लघु ऋण योजना प्रकल्प रक्कम 1 लाख 40 हजार अशा तीनही योजनेसाठी सुमारे 3 हजार 500 लाभार्थी करिता 100 कोटी रुपयांच्या निधीबाबतचा प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळाकडे सादर केला आहे. सदर निधी येत्या काही दिवसात उपलब्ध करून दिला जात आहे.

या योजनेअंतर्गत मातंग समाजाच्या युवक-युवतीसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी 30 लाख व परदेशांतर्गत शिक्षणासाठी 40 लाख कर्ज देण्याकरिताचे प्रस्ताव या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मागविलेले आहेत. पात्र असलेल्या प्रस्तावास एन.एस.एफ.डी.सी च्या निधीमधूनच मंजूरी देवून विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

थेट कर्ज योजना
प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये आहे. या योजनेअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 हजार 207 लाभार्थ्यांना 12 कोटीचे कर्ज मंजूर केले आहे. नोव्हेंबर अखेर 800 लाभार्थ्यांना 8 कोटी रुपयाचे आजवर वाटप झाले आहे. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1 हजार 650 व आर्थिक 16.50 कोटी रुपयांची तरतूद केलेली असून कर्ज मंजूरीची कार्यवाही चालू आहे.

बीज भांडवल योजना
सदर योजनेची प्रकल्प मर्यादा 7 लाख आहे. यात महामंडळामार्फत 10 हजार अनुदानासहित 20 टक्के रक्कम हिस्सा महामंडळामार्फत दिला जात होता. लहूजी साळवे आयोगाच्या अभ्यासाच्या 19 मंजूर शिफारशी पैकी एका शिफारसीच्या अनुषंगाने या योजनेअंतर्गत महामंडळामार्फत 45 टक्के रक्कम 4 टक्के व्याजाने दिल्या जाते. लाभार्थीचा सहभाग 5 टक्के असून उर्वरित 50 टक्के बँकेचे कर्ज असते. महामंडळाच्या हिश्याचे रक्कम 20 टक्के वरून 45 टक्के पर्यंत वाढ केल्यामुळे बँकेचा कर्ज मंजूरी करिताचा कल तसेच प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे बहुसंख्य लाभार्थीना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती योजना
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना मातंग समाजातील प्रतिवर्षी 10 वी 12 वी परीक्षेत 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते. सदर योजना पदवी व पदविकासाठी उपलब्ध करून दिली आहे. यात दहावीसाठी 1 हजार रुपये, बारावीसाठी 1 हजार 500, पदवी उत्तीर्ण करणाऱ्यासाठी 2 हजार रुपये याप्रमाणे पूर्वी शिष्यवृत्ती दिल्या जात होती. चालू आर्थिक वर्षांपासून यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. 10 वी साठी 5 हजार रुपये, 12 वीसाठी 7 हजार 500 रुपये, पदवी व पदविकासाठी 10 हजार, पदव्युत्तरसाठी 12 हजार 500 रुपये वाढ करण्यात आली आहे. आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत पुन्हा या रक्कमेमध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळास सादर करण्यात येणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर 30 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजना या महामंडळास लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

सध्या महामंडळामार्फत थेट कर्ज योजना ही 1 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेली राबविण्यात येते. या रक्कमेत 5 लाख रुपये पर्यंत मर्यादा वाढ करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर केला असून लवकरच त्याला मंजुरी भेटणार आहे.

लहूजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या 68 शिफारशी पैकी 19 शिफारशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सबंधीत आहे या 19 मंजूर असलेल्या शिफारशीमध्ये दोन टप्पे करून पहिल्या टप्यातील नऊ शिफारशी करिता 234 कोटी रुपये व उर्वरीत 10 शिफारशी करीता 221 कोटी रुपये असे एकूण 455 कोटी रुपये इतका निधी मिळणे करिताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून शासन स्तरावर विचाराधीन आहे.

अंधेरी मुंबई तसेच तुळजापूर जिल्हा धाराशीव येथील जागेबाबत शासन स्तरावर प्रक्रिया सुरु आहे. मुंबई अंधेरी येथे 378 चौ.मी. महामंडळाच्या मालकीची जागा आहे. या जागेवर अण्णाभाऊ साठे भवन व बहुद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्याकरिता 50 कोटी रुपये तसेच जिल्हाधिकारी धाराशिव यांनी मातंग समाजाच्या युवक-युवतीसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याकरिता नगरपालिका तुळजापूर यांच्या मालकीची 1 एकर जागा या महामंडळास उपलब्ध करुन दिली आहे. सदर जागेवर सुसज्य प्रशिक्षण केंद्र उभारणी करिता 50 कोटी रुपये निधी मिळवा असा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

या योजनेच्या अधिक माहिती व शंका समाधानासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: