Monday, May 6, 2024
Homeकृषीजिल्ह्यात कृषी पंपाची थकबाकी पोहचली तेराशे कोटींवर...

जिल्ह्यात कृषी पंपाची थकबाकी पोहचली तेराशे कोटींवर…

Share

• शेतकऱ्यांनी किमान चालू बिल भरून सहकार्य करावे; महावितरण

• ४२ हजार शेतकऱ्यांनी सुमारे १५ वर्षापासून भरले नाही एकदाही बिल

अमरावती – जिल्ह्यात कृषी पंपाकडे असलेली विजेची थकबाकी १ हजार २९२ कोटीपेक्षा जास्त झाली आहे.रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे.त्यामुळे आवश्यक विजेचे नियोजन करता यावे, देखभाल दुरूस्ती करता यावी यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले आहे.

सध्यास्थितीत रब्बी हंगामाला सुरूवात झाल्याने विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील शेतीपंपाच्या थकबाकीचा विचार केला ,तर एकून १ लाख ३८ हजार ९१८ ग्राहकांडे वीजबिलाची थकबाकी १ हजार २९२ कोटी ३३ लाखांवर गेली आहे.

जिल्ह्यातील महावितरणच्या विभागनिहाय थकबाकीनुसार अचलपुर विभागातील ४५ हजार २९ कृषी पंप ग्राहकांकडे ६७४ कोटी ९७ लाख थकले आहेत.याशिवाय अमरावती ग्रामीण विभागातील ४६ हजार ८१५ कृषी पंपाची थकबाकी २९३ कोटी ७४ लाखांवर पोहचीली आहे.अमरावती शहर विभागात ८७८ कृषी पंप ग्राहक असून त्यांच्याकडे वीज बिलाचे १८ कोटी ८३ लाख थकीत आहे,तर मोर्शी विभागातील ४६ हजार १९६ ग्राहकाकडे ३०४ कोटी ८० लाख रूपये वीजबिलाची थकबाकी आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील २६ हजार कृषी पंप ग्राहकांनी १५ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही एकदाही वीज बिल भरले नाही,तर १५ हजार ९४६ कृषी पंप ग्राहकांनी १० ते १५ वर्षात एकदाही वीज बिल भरण्याला प्राधान्य दिले नाही. महावितरण ही सरकारी कंपनी असली तरी आपल्या ग्राहकांसाठी लागणाऱ्या विजेचे नियोजन करण्यासाठी महावितरणला विविध सरकारी व खाजगी स्त्रोतांकडून वीज विकत घ्यावी लागते. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिल भरणे अपेक्षीत आहे.

याशिवाय रब्बी हंगामात विजेचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वीज यंत्रणा अती भारीत होत असल्याने रोहीत्र निकामी होण्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रोहीत्र निकामी झाल्याने महावितरणचे आर्थीक नुकसान होते.ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित होतो.त्यामुळे अधिकृत वीज जोडणी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भागात कोणी अवैध वीज जोडणी करून वीज वापरत असेल तर ते टाळण्यासाठी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी धोरणात थकबाकीमुक्तीची संधी
महावितरणकडून तीन टप्यात कृषी धोरणा २०२० राबविण्यात येत आहे.पहीला टप्पा २०२१-२२,दुसरा टप्पा २०२२-२३ आणि तीसरा टप्पा २०२३-२४. महावितरणच्या कृषी धोरणाअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना निर्लेखन, व्याज व विलंब आकारात माफी देत मुळ थकबाकीतही पहिल्या टप्प्यात ५० ,दुसऱ्या टप्प्यात ३० आणि तीसऱ्या टप्प्यात २० टक्के माफी देण्यात आली असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले आहे.

जनसंपर्क अधिकारी
महावितरण,अमरावती परिमंडळ


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: