Tuesday, May 7, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | गौण खनिजाचे अवैध उत्खननापोटी झाला कोट्यावधींचा दंड…जमिनीची अकृषक परवानगीही झाली...

मूर्तिजापूर | गौण खनिजाचे अवैध उत्खननापोटी झाला कोट्यावधींचा दंड…जमिनीची अकृषक परवानगीही झाली रद्द…जमीन व खदानधारक दीपक अव्वलवार अडचणीत…

Share

आकोट- संजय आठवले

मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे भगोरा शिवारातील गट क्रमांक ९६ मध्ये परवानगी पेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अकोला यांनी जमीनधारक दीपक अव्वलवार यांना कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड ठोठावण्यापूर्वी मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी यांनी ह्याच जमिनीस दिलेली अकृषक परवानगी ही रद्द केल्याने जमीनधारक दीपक अव्वलवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

मुर्तीजापुर शहराच्या स्टेशन विभागातील रहिवासी दीपक अशोक अव्वलवार यांची मुर्तीजापुर तालुक्यातील मौजे भगोरा शिवारात १.११ हेक्टर शेत जमीन आहे. ह्या शेत जमिनीचे औद्योगिक प्रयोजनाकरिता (खदान व स्टोन क्रशरकरिता) बिनशेती रूपांतरण करण्यासाठी त्यांनी सन २०२०-२१ मध्ये रीतसर अर्ज केला होता. त्यावरून त्यांना आदेश क्रमांक एएपी ३४/ भगोरा/ ०४/ २०२०-२१ दिनांक ९.११.२०२० नुसार अकृषक परवानगी देण्यात आली. त्या आदेशाचे आधारे त्यांना नोव्हेंबर २०२० मध्ये दोनदा १,००० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी दिली गेली. त्या परवानगीनुसार त्यांनी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूकही केली. परंतु त्यानंतर आदेश क्रमांक प्रस्तु- १/ कावी/ ४१५५ दिनांक १४.१२.२०२० नुसार बिनशेती वापराची ही परवानगी रद्द करण्यात आली.

ही अकृषक परवानगी रद्द झाल्याने जमीन धारक दीपक अव्वलवार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार या शेतजमिनीवरील अकृषक वापर त्वरित थांबवून तेथे कृषिक वापर सुरू करणे बंधनकारक होते. परंतु तसे न करता त्यांनी या ठिकाणी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरुच ठेवून हजारो ब्रास गौण खनिजाचा अपहार केला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचेकडे तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी याप्रकरणी दिनांक २३.२.२०२२ रोजी सुनावणी मुक्रर केली. त्याकरिता गैरअर्जदार दीपक अव्वलवार, उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना नोटिसेस बजावण्यात आल्या. सोबतच घटनास्थळाची संयुक्त मोका पाहणी करण्याचे आदेश पारित केले.

त्यानुसार मूर्तिजापूर नायब तहसीलदार बनसोड, मंडळ अधिकारी डाबेराव, तलाठी वाघमोडे, अभियंता चव्हाण या पथकाने दिनांक २१.०२.२०२२ रोजी मौजे भगोरा येथील गट क्रमांक ९६ ची पाहणी केली. मात्र या समयी जमीनधारक तथा खदान मालक दीपक अव्वलवार हे गैरहजर होते. परंतु त्यांचे कारभारी भीमपाल दादाराव गवई हे मोक्यावर हजर होते. त्यांना खदानी बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्या संदर्भात कोणतीच कागदपत्रे मोकास्थळी नसल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. मोका परिसराची पाहणी केली असता, या ठिकाणी वाहनांच्या ताज्या खुणा आढळून आल्या. ह्या खूणा पोकलेन, जेसीबी, ट्रक आदी अवजड वाहनांच्या असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणी पूर्व पश्चिम २६४ फूट लांब, पूर्वेकडील उत्तर दक्षिण 220 फूट लांब, खोली 25 फूट या मापात उत्खनन झाल्याचे दिसून आले. हे उत्खनन मुरूम व डब्बरचे असल्याचे सिद्ध झाले. या उत्खननाचे मोजमाप घेतले असता ते १३११५.५९ ब्रास निघाले. या शेतास अकृषक परवानगी असताना त्या परवानगीनुसार केलेले १,००० ब्रास उत्खनन यातून वजा केले असता, या ठिकाणी १२,११५.५९ ब्रास अवैध उत्खनन झाल्याचे दिसून आले.

हा अहवाल जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना सादर करण्यात आला. त्या अहवालाचे अवलोकन करून त्यांनी दीपक अव्वलवार यांचे दोषांवर शिक्कामोर्तब केले. आणि अव्वलवार यांनी अवैधपणे १२११५.५९ ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याचा दिनांक २.३.२०२२ रोजी निवाडा दिला. या अवैध उत्खननापोटी त्यांनी दीपक अव्वलवार यांचेवर १८ कोटी ९० लक्ष ९ हजार ६०० रुपये ईतका दंड आकारला. एकीकडे ईतका अवाढव्य दंड आकारला गेला. दुसरीकडे खदान व स्टोन क्रशरही बंद करण्यात आले. तर तिसरीकडे शेताची अकृषक परवानगी ही रद्द करण्यात आली, अशा तिहेरी पेचात सापडल्याने दीपक अव्वलवार हे चांगलेच अडचणीत आले आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: