Saturday, May 11, 2024
Homeराजकीयआमदार मिटकरी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता…धड सोन्याचे मात्र पाय मातीचे…गृह तालुक्यातच प्रभावहीन…

आमदार मिटकरी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता…धड सोन्याचे मात्र पाय मातीचे…गृह तालुक्यातच प्रभावहीन…

Share

आकोट- संजय आठवले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर फुटीर गटाने जाहीर केलेल्या राज्य कार्यकारिणीत आमदार मिटकरी यांची मुख्य प्रवक्ता म्हणून वर्णी लावण्यात आली असली तरी आपल्या गृह तालुक्यातच मिटकरी प्रभावहीन असल्याने त्यांची गत ‘धड सुवर्णाचे पण पाय मात्र मृत्तिकेचे’ अशी स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या फुटीर गटाला मिटकरी जिल्ह्यात तर सोडा पण तालुक्यातही जराशी उभारी देतील अशी अजिबात संभावना नाही.

शिवसेना पाठोपाठ राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी पक्ष फुट झाली. त्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर ‘सीनियर पवार की ज्युनियर पवार’ असा बाका प्रश्न उभा ठाकला आहे. अर्थातच अकोला जिल्हा ह्याला अपवाद नाही. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना यातील एक बाजू निवडावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी फुटीर गटाला समर्थन दिले आहे आणि ते स्वाभाविकही आहे.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमदार मिटकरी अजित पवारांचा अविष्कार असल्याचे मानले जाते. अर्थात मोठ्या पवारांनी त्यांचे आमदारकीला हिरवी झेंडी दिल्यानेच त्यांची वर्णी लागली हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. पण मिटकरींनी आपल्या आमदारकीचे सारे श्रेय लहान पवारांना दिले. आणि मोठ्या साहेबांप्रती बेगडी कृतज्ञता व्यक्त करीत लहान साहेबांची वाट धरली. नंतर ‘आमच्या पक्षात फूट नाही. आमचे नेते मोठे साहेबच’ असे म्हणत म्हणत फुटीर गटाचे मुख्य प्रवक्ते पद स्वीकारले.

या नियुक्तीने मिटकरी अगदी सातव्या आसमानात पोहोचले. पण राजकीय मुत्सद्देगिरीचा जराही लवलेश नसलेल्या मिटकरींना यातील गोम कळालीच नाही. ती अशी कि, मुख्य प्रवक्त्याला उठ सुट माध्यमांशी संवाद साधावा लागतो. पत्रकार नको ते प्रश्न विचारतात. या प्रश्नांमध्ये मोठ्या साहेबांबाबतही अनेक खोचक प्रश्न राहणार आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देणे म्हणजे जन्मदात्या बापाशी बेमानी होईल असे असणार आहेत. याची जाणीव फुटीर गटातील सर्वच आमदारांना आहे. आणि हे आमदार काहीही झाले तरी मोठ्या साहेबांबाबत गैर बोलूच शकत नाहीत.

त्यामुळे सर्वच बाबतीत नवखे असलेले आणि आक्रमक म्हणून उगाच डोईवर घेतलेले आमदार मिटकरी यांचे डोईवर हा काटेरी मुगुट चढविण्यात आला. आणि अन्य चतुर आमदार या सुळावरच्या पोळीपासून सुरक्षित अंतरावर राहिले. परंतु मुत्सद्दी आणि मातब्बर नेत्यांचे डावपेचांची जराही जाण नसल्याने मिटकरी या नियुक्तीने गदगद झाले आहेत. केवळ बोलता येणे याखेरीज अन्य कोणतीही अर्हता नसताना अचानक आमदारकीचा अलभ्य लाभ झाल्याने त्यांनी आपला जिल्हा तर सोडा पण तालुक्यातही ना जनसंपर्क वाढविला ना पक्ष विस्तार केला. उलट आपल्याच पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांशी उगाचच पंगे घेतले. त्यामुळे आता या प्रवक्ते पदी राहून आवेशात ते काही बाही बोलणारच नाहीत याची शाश्वती नाही. म्हणूनच ‘जो खानदानी रईस है वो, मिजाज रखते है नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई नई है’ असे म्हणण्याची पाळी येवू शकते.

वास्तविक फुटीर गटाच्या सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात आपल्या निकटवर्तीयांना या घडामोडींची इत्थंभूत माहिती दिलेली आहे. त्यांना नवीन परिवर्तनाकरिता सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्या धर्तीवर नाही जिल्ह्यातील परंतु किमान आपल्या गृह तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मिटकरी यांनी विश्वासात घेणे अनिवार्य होते. मात्र अद्यापही त्यांनी कुणाशीही संपर्क केलेला नाही. करतील तरी कसे? त्यांचे कुणाशी जमतच नाही. तसे पाहू जाता फुटीर गटाने त्यांना दिलेल्या या अलभ्य नियुक्तीचा संपूर्ण जिल्ह्यात जल्लोष व्हायला हवा होता. परंतु कुठेही साधी टिकलीही फोडण्यात आलेली नाही. त्यावरून मिटकरींचे धड कितीही शुद्ध सोन्याचे असले तरी त्यांचे पाय मात्र मातीचेच असल्याचे दिसत आहे.

त्यांच्या या अकर्मण्यतेमुळे आकोट मतदार संघातील राष्ट्रवादी नेते, कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चलबिचल आहे. महा व्हाईसने अनेकांशी संपर्क साधला असता, अनेकांनी मोठ्या साहेबांशी इमान राखणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा सरचिटणीस इंजि. प्रमोद लहाने, आकोट शहर अध्यक्ष नवनीत लखोटिया, महाराष्ट्र प्रदेश माजी संघटक सौ. छायाताई कात्रे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस महिला सौ. ज्योतीताई कुकडे, तेल्हारा तालुका अध्यक्ष तथा तेल्हारा बाजार समितीचे उपसभापती प्रदीप ढोले, आकोट तालुका सचिव नागेश आग्रे यांनी आपण मोठ्या साहेबांसोबत असल्याचे सांगितले. आकोट विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर यांनी जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर अनेकांनी झाल्या फुटीबाबत अतिशय संताप व्यक्त करून अन्य पक्षात जाण्याचा विचार असल्याचे सांगितले. महत्त्वाचे म्हणजे शरदचंद्र पवार यांचेसोबत राहण्याचा निर्णय घेणाऱ्यांनी आपण मुंबई सभेला जाणार असल्याचेही सांगितले. परंतु यातील कुणीही आपल्याशी आमदार मिटकरींनी संपर्क केल्याचे सांगितले नाही. त्यावरून मिटकरींचे मुख्य प्रवक्ते पद अकोला जिल्ह्यात बेअसर झाल्याचे तुर्तास तरी दिसत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: