Saturday, May 4, 2024
Homeराज्यअखेर आमदार भारसाखळे यांनाच कापावी लागणार फित….महाव्हाईसचे भाकीत ठरले तंतोतंत खरे…हा सोहळा...

अखेर आमदार भारसाखळे यांनाच कापावी लागणार फित….महाव्हाईसचे भाकीत ठरले तंतोतंत खरे…हा सोहळा घेणार भारसाखळे यांची सत्वपरीक्षा…

Share

आकोट – संजय आठवले

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित अख्खे मंत्रिमंडळ आमदार भारसाकळे यांचे हातावर तुरी देणार असल्याने अतिशय उद्विग्न आणि हिरमुसलेल्या भारसाखळे यांना आकोट पालिका ईमारत लोकार्पण सोहळा स्वतःच पार पाडावा लागणार असल्याचे महा व्हाईस ने केलेले भाकित तंतोतंत खरे ठरले असून दि.९ मार्च २०२४ रोजी आमदार भारसाखळेच या सोहळ्याच्या फितेला कात्री लावणार आहेत. परंतु लोकार्पणाच्या या फितेसह ही कात्री भविष्यात आमदार भारसाखळे यांचे काय काय कापणार? याबाबत मात्र शहरात खमंग चर्चा सुरू आहे.

आकोट पालिकेच्या नवीन इमारतीची पायाभरणी काँग्रेसच्याच काळात झाली. त्यानंतर तळमजल्याचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण २०११ साली तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांचे हस्ते करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यावर उर्वरित दोन मजल्यांचे काम करणे प्रस्तावित होते.

त्यानुसार तब्बल तेरा वर्षांनी ही इमारत पूर्णत्वास आली आहे. वास्तविक या इमारतीचे काम अर्धवट असतानाच आमदार भारसाखळे यांना तिचे लोकार्पण करावयाचे होते. त्यासोबतच संत नरसिंग महाराज मंदिराच्या विस्तारित हॉलचेही लोकार्पण करावयाचे होते. मात्र मंदिराच्या हॉलचे काम अर्धवट असूनही भारसाखळे केवळ आपला उदो उदो करणेकरिता त्याचे लोकार्पण करीत असल्याचे महा व्हाईसने उघड केले. हे बिंग फुटल्याने त्या हॉलचे लोकार्पण रद्द केले गेले.

आणि पालिका इमारतीच्या लोकार्पणातही अशीच फटफजिती होऊ नये म्हणून काम पूर्णत्वानंतर हे लोकार्पण करावयाचे ठरविण्यात आले. वास्तवात प्रशासकीय इमारत, पालिका इमारत, संत नरसिंग महाराज मंदिर हॉल यांचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन अशी सारी कामे एकाच वेळी करायची आणि त्याकरिता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री यांनाआमंत्रित करून त्यांचे मुखाने आपली प्रशंसा करून घ्यायची असा डाव आमदार भारसाखळे यांचा होता.

परंतु भाजपच्याच अंतर्गत सर्वे मध्ये नापास झाल्याने भारसाखळे यांचे बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वारस्य उरलेले नसल्याने त्यांनी या सोहळ्याचे आमंत्रण नाकारले. त्यांनी नाकारले म्हणून शिंदे पवार यांनीही नकार घंटा वाजवली. परंतु अगदीच तोडू नये म्हणून दुधाची तहान ताकावर भागवीत ह्या कार्यक्रमाकरिता अकोला जिल्हा पालकमंत्री विखे पाटील यांना वेळ मारून नेण्यास सांगण्यात आले.

परंतु कोणतेही श्रेय घेण्यात प्रधानमंत्री मोदींची सवय लागलेल्या आमदार भारसाखळे यांनी उपजिल्हा रुग्णालय कार्यक्रमात श्रेयाची बदमाशी केलीच. ती अशी कि, पालकमंत्री विखे पाटील यांचे आकोट दौऱ्यात प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालयास भेट आणि पाहणी असे स्पष्ट नमूद होते.

त्या ठिकाणी भूमिपूजन अथवा कोनशीला समारंभ असल्याबाबत काहीही उल्लेख नव्हता. तरी श्रेयाकरिता हपापलेल्या आमदार भारसाखळे यांनी या ठिकाणी कोनशीलेची पाटी लावून तसा सोहळा साजरा केला. अर्थात ही हात चलाखी नामदार विखे यांना आवडली नाही. आणि भविष्यात त्याचे विपरीत पडसाद उमटतील हे भारसाखळे यांनाही सुचले नाही.

परंतु आता पालिका इमारत लोकार्पणाबाबत ते प्रतिकूल पडसाद तीव्रतेने जाणवले आहेत. झाले असे कि, या लोकार्पणाकरिता आमदार भारसाखळे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस, पवार यांच्या पायऱ्या झिजवल्या. परंतु त्याचा काही एक परिणाम झाला नाही. फडणवीस कोणत्याही स्थितीत भारसाखरळे यांचे महिमा मंडन करण्यास राजी नाहीत. त्यामुळे शिंदे पवार यांनीही तिकडे दुर्लक्ष केले.

अशात आधार होता नामदार विखेंचा. परंतु मागील अनुभव ताजा असल्याने यावेळी त्यांनीही आपले हात वर केले. अशा स्थितीत पालिका इमारत लोकार्पण वांध्यात आले. येथे उल्लेखनीय आहे कि, या लोकार्पणाकरिता भारसाखळे इतके उतावीळ होते कि, त्यांनी पालिकेसमोर चक्क समारंभ मंडपाचा ढाचाही तयार ठेवला होता. प्रतीक्षा होती कुण्या तरी मंत्र्याच्या होकाराची. पण जिथे खुद्द फडणवीसांचीच इतराजी तिथे अन्य मंत्री कसे होतील राजी?

त्यामुळे तो ढाचा तसाच उभा होता. पण महा व्हाईसने ह्या उतावीळपणाचे वृत्त प्रकाशित केले. आणि त्याच रात्रीत तो ढाचा काढून घेण्यात आला. ह्याच वृत्तामध्ये महा व्हाईसने भाकीत केले होते कि, शिंदेच काय पण अख्ख्या मंत्रिमंडळातील कुणीच या लोकार्पणाला येणार नाहीत. अगदी नामदार विखे सुद्धा. त्यामुळे ह्या लोकार्पणाची फीत स्वतः भारसाखळे यांनाच कापावी लागणार.

आणि हे भाकीत तंतोतंत खरे ठरले. या सोहळ्याकरिता कुणीच न मिळाल्याने अखेर भारसाखळे यांनीच ही फित कापण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक भारसाखळे यांचे आमंत्रण नाकारून शिंदे फडणवीस आणि अख्ख्या मंत्रिमंडळाने त्यांचा पर्यायाने आकोट नगरवासीयांचा अपमान केला आहे. या अपमानाने भारसाखळे यांनी पेटून उठावयास हवे होते.

परंतु भारसाखळे यांना आकोटवासियांच्या सन्मानाशी नाही तर त्यांनी दिलेल्या आमदारकीशी देणेघेणे आहे. वास्तविक त्यांनी हे लोकार्पण आकोटच्याच एखाद्या सर्वसामान्य नागरिकाकडून करविणे आणि ही इमारत शिंदे फडणवीस यांची नाही तर आकोटवासीयांची आहे असा संदेश शिंदे फडणवीसांना देणे अत्यावश्यक होते.

पण भारसाखळे हे श्रेया करिता हपापलेले आणि भाजपच्या पुनश्च उमेदवारीकरिता लाचार झालेले असल्याने एखाद्या सर्वसामान्य आकोटवासियालाला सन्मान देण्याचे त्यांना सुचले नाही. सुचले असते तर तो सर्वसामान्य आकोटवासी नाही, तर आमदार भारसाखळे मोठे झाले असते. आणि नजीक भविष्यात त्यांच्या भाजपच्या उमेदवारीस आणि नागरिकातील लोकप्रियतेस लागणाऱ्या कात्रीची धार काही प्रमाणात बोथट झाली असती.

परंतु आमदारकीचा मोठेपणा असला तरी भारसाखळे यांचेकडे मनाचा मोठेपणा नाही. त्यामुळेच त्यांच्या आमदारकीच्या मोठेपणाची कसोटी या लोकार्पणाच्या निमित्याने लागणार आहे. ती अशी कि, प्रशासकीय इमारत लोकार्पणाकरिता आमदार भारसाखळे यांनी विविध क्लृप्त्या लढवून गर्दी जमवली होती. पण त्या गर्दीत बोटावर मोजणे इतके अकोटवासी आढळून आले होते. बहुतांश चेहरे ग्रामीण भागातीलच होते.

त्यातही त्या समारंभाला पालकमंत्री का होईना पण मंत्री होते. आता सोहळा पालिका इमारतीचा आहे. त्यातच कुणी मंत्री ही नाही. केवळ विकास पुरुष भारसाखळेच आहेत. त्यामुळे या समारंभाला गर्दी जमविण्याचे आव्हान भारसाखळे यांचे समोर आहे.

बचत गट, घरकुल, नोंदणीकृत कामगार आदी लाभार्थींची कामे पालिकेचे हाती आहेत, म्हणून त्यांचे मार्फत ही पूर्तता होऊ शकते. परंतु अपेक्षित असलेला सर्वसामान्य अकोटवासी येथे येणे गरजेचे आहे. त्याच्या उपस्थितीनेच भारसाखळे यांच्या लोकप्रियतेची पावती मिळणार आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या उपस्थितीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.


Share
Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: