Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराजकीयकाँग्रेस सत्तेत आल्यास शेतकर्यांना कर्जमाफी, जीएसटीमुक्त शेती, गरीब महिलांना १ लाख रुपये...

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकर्यांना कर्जमाफी, जीएसटीमुक्त शेती, गरीब महिलांना १ लाख रुपये व ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार: राहुल गांधी…

काँग्रेसचा जाहीरनामा ‘जनता की बात’, बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांच्या चर्चेतून बनला जाहीरनामा.

मोदी सरकार गरीब, दलित, ओबीसी,आदिवासींचे नाही, तर केवळ अदानींचे, १० वर्ष मोदी अदानीसाठी काम करत आहेत.

भंडारा/मुंबई – काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्निवीर योजना बंद करणार तसेच हिंदुस्थानातील गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील साकोलीत भव्य जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार चंद्रकांत हंडारे,

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री सतीष चतुर्वेदी, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे गडचिरोली चिमूरचे काँग्रेस उमेदवार ड़ॉ. नामदेव किरसन,

नागपूरचे उमेदवार आ. विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजीत वंजारी, आ. सहसराम करोटे, माजी खा. मधुकर कुकडे, माजी खा. खुशाल बोपचे, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एससी एसटी, आदिवासी, ओबीसी समाजाची सरकारमध्ये भागिदारी अत्यल्प आहे. जेवढी लोकसंख्या तेवढाच अधिकार त्या समाजाला मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस सरकार सत्तेत येताच जातनिहाय जनगणना व आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे क्रांतीकारी काम करणार आहे.

मोदी सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले की, सरकार मोदींचे नाही तर अदानीचे आहे, एका अरबतीचे सरकार आहे व नरेंद्र मोदींनी १० वर्षात त्यांच्यासाठीच काम केले. आज देशातील विमानतळे, बंदरे, रस्ते, खाण, कोळसा, सौरऊर्जा सर्वकाही अदानी यांचेच झाले आहे.

नरेंद्र मोदी २४ तास धर्म, हिंदू-मुस्लीम यावरच बोलतात, एका समाजाला दुसऱ्याविरोधात लढवतात व तुमची संपत्ती अदानीच्या घशात घालतात. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने जनतेला लुटले आहे. नरेंद्र मोदी यांनी ओबीसी, शेतकरी, छोटे व्यापारी, कामगार, गरीब, आदिवासी यांच्यासाठी काय केले?

देशात सर्वात मोठा प्रश्न महागाई व बेरोजगारीचा आहे पण मोदी त्यावर कधीच बोलत नाहीत. कोरोना काळात गंगा नदीत हजारो मृतदेह दिसत होते पण नरेंद्र मोदी मात्र जनतेला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, मोबाईल टॉर्च लावा असे सांगत होते. कधी ते समुद्राच्या तळात जातात व पुजा करतात, मोदींनी देशाची थट्टा चालवली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच मागास, आदिवासी, ओबीसी समाजाच्या हितासाठी आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणही केले जाणार आहे.

याचा लाभ भंडारा जिल्ह्याला होणार असून या जिल्ह्यात एससी, एसटी, भटके विमुक्त, आदिवासी व ओबीसी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात शेतकरी, कामगार, तरुण, महिला व गरिबांसाठी आश्वासने दिली आहेत त्याबद्दल राहुल गांधी यांना मनापासून धन्यवाद देतो.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, जेंव्हा जेंव्हा समतेचा विचार अडचणीत आला, राज्यघटना, लोकशाही अडचणीत आली, काँग्रेस पक्ष अडचणीत आला तेंव्हा तेंव्हा विदर्भाची जनता काँग्रेस सोबत राहिली आहे. युपीए सरकार असताना अनेक विकास कामे केले पण भाजपाने धर्माच्या नावावर मते मागून समाजात वाद निर्णाम केला.

भाजपा धर्माच्या नावावर मते मागत आहे त्याला फसू नका काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून न्यायपत्र आणले आहे, जनतेसाठी गॅरंटी घेऊन आले आहेत. या गॅरंटीमधून सर्वसामान्य जनतेच्या जिवनात आनंद निर्माण होणार आहे. राहुल गांधी हे जनतेची गॅरंटी घेऊन आले आहेत. काँग्रेस पक्षाला मतदार करुन विजयी करा असे आवाहन थोरात यांनी केले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, मोदी सरकारने महागाई प्रचंड वाढवली, काँग्रेस सरकारच्या काळात असेलला ४०० रुपयाचा सिलेंडर भाजपाला महाग वाटत होता पण आज तो ११०० रुपये झाले तरी भाजपाला तो महाग वाटत नाही. वीज बिल १० टक्के वाढवून वीजही महाग केली आहे.

अदानीच्या स्मार्ट मीटरच्या सामान्य जनतेला लुटले जाणार आहे. या लुटारू सरकारला सत्तेतून खाली खेचा व काँग्रेसला साथ द्या, काँग्रेस, महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात आणा असे वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, दररोज ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. केंद्र सरकारने तीन काळे कायदे आणले त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले, त्यात ७०० शेतकऱ्यांचे मृत्यू झाले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फायदा केवळ विमा कंपन्यांना झाला. राज्य सरकारची १ रुपयात पीकविमा योजना सुद्धा फसवी आहे. भाजपा सरकार जनतेची कामे करत नाही म्हणून या सरकारचा पराभव करा व काँग्रेस, इंडिया आघाडीचे सरकार आणा.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: