Tuesday, April 30, 2024
Homeमनोरंजनमराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर...

मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर…

Share

मुंबई – गणेश तळेकर

२०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. ‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच.

या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान ते आपल्या चित्रपटातून उलगडणार आहेत. आपल्या आगामी ‘फकिरा’ या चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नुकतीच केली. मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या अप्रतिम कादंबरीवरचा चित्रपट ते घेऊन येत आहेत.

विषय आणि सादरीकरणाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या भव्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी कलाकार मंडळी दिसणार आहेत. नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. रुद्रा ग्रुप आणि चित्राक्ष निर्मिती यांच्या या चित्रपटात ‘फकिरा’ ही मध्यवर्ती भूमिका कोण करणार? हे अजून गुलदस्त्यात आहे.

चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची स्नूषा सावित्रीबाई मधुकर साठे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, अभिनेते नागेश भोसले, कमलेश सावंत, चित्रपटाचे डीओपी वीरधवल पाटील, लेखक मंदार जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

‘नशिबाने साथ दिली तर उत्तम कलाकृती साकारायला मिळते. माझ्या नशिबाने ‘फकिरा’ ही कलाकृती साकारण्याचे भाग्य मला मिळाले, याबद्दल दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी समाधान व्यक्त केले. ‘अशा विषयाचा चित्रपट करण्यासाठी अंगी अचाट धाडस लागते. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे याने हे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो असे म्हणत, अभिनेते नागेश भोसले यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. एका उत्तम प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेते कमलेश सावंत यांनी व्यक्त केला.

समाजाला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा आत्यंतिक जुलूम आणि सर्वांविरोधात बंड करणारा लढवय्या ‘फकिरा’ याचे यथार्थ चित्रण करणाऱ्या ‘फकिरा’ कादंबरीचे चित्ररूप रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. २०२५ मध्ये ‘फकिरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: