Friday, May 3, 2024
Homeराज्यराजस्थानमध्येही डबल इंजिन सरकार आणण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मतदारांना आवाहन...

राजस्थानमध्येही डबल इंजिन सरकार आणण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मतदारांना आवाहन…

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजस्थान विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा…

धीरज घोलप

महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील मतदाराना केले. या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कौल देऊन राजस्थानमध्ये नक्की परिवर्तन घडवतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये जाऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धर्म पाळत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. सकाळी जयपूर विमानतळावर दाखल होताच त्यांचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने पगडी घालून जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जयपूरच्या हवा महल परिसरातून उभे असलेले योगी श्री बालमुकुंद आचार्य यांच्यासाठी प्रचारफेरी काढली. यावेळी स्थानिक मतदारांनी या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी, राजस्थान ही महा शूरवीर महाराणा प्रताप यांची पुण्यभूमी असून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातून आलो आहे असे सांगताना त्यांनी देशासह राज्याला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाचे आणि विचारांचे सरकार असणे गरजेचे असते महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्याने आज देशात सर्वाधिक विकासप्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यामुळे राजस्थानातही डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्यास राज्याचा विकास वेगाने होईल असे सांगितले.

यानंतर त्यांनी शहापुरा मतदारसंघातील भाजप उमेदवार उपेन यादव यांच्यासाठी प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीमध्ये शहापुरातील असंख्य नागरिक आवर्जून उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राजस्थानमध्ये रस्ते, स्वच्छता, पाणी, रुग्णालये यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्यातील काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे. राज्याला प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात देशभरात सुशासनाचा मापदंड घालून दिला असून दिलेला शब्द शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी ते ओळखले जतात त्यामुळे भाजपला दिलेले मत हे विकासाला दिलेले मत असल्याचे आवर्जून नमूद केले.पंतप्रधान मोदींनी देशातील गरिबाला मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे, उज्ज्वला योजना, पीएम किसान योजना, अंत्योदय योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लाभ मिळवून दिले आहेत. हे लाभ डीबीटीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात आले असल्याचे सांगितले.

यानंतर त्यांनी कोठपुतली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हंसराज पटेल यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन उपस्थित मतदारांना संबोधित केले. या भागातील अनेक नागरिक हे मुंबईत रोजगारासाठी वास्तव्याला असून त्यांना सुरक्षा देणे ही आपली जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

तसेच गेल्या पाच वर्षात राजस्थानमध्ये कर्जमाफी झालेली नाही नुसती अश्वासने मिळाली आहेत, त्यामुळे इथे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत, काँग्रेस राजवटीमध्ये राज्यात बेसुमार भ्रष्टाचार वाढला असून त्याला आळा घालण्यासाठी परिवर्तनाची गरज असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित मतदारांना सांगितले.

राजेंद्र सिंह गूढा यांच्या मतदारसंघातील लढत ही मैत्रीपूर्ण

राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले राजेंद्र सिंह गूढा हेदेखील या निवडणुकीत नक्की विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

या मतदारसंघातील लढत ही मैत्रीपूर्ण असून तिथे कोणताही निकाल लागला तरीही एनडीएचे हात बळकट करण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम राहील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच गूढा यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी प्रचार केला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: