Homeराज्यमुख्य प्रशासक बाजार सुरू करण्यात नापास…व्यापार्‍यांनी दिले तडजोडीचे पत्र…

मुख्य प्रशासक बाजार सुरू करण्यात नापास…व्यापार्‍यांनी दिले तडजोडीचे पत्र…

Share

तडजोडी करिता जिल्हा उपनिबंधक उद्या आकोटात… शेतकरी पॅनलचा आंदोलनाचा इशारा…

आकोट – संजय आठवले

आकोट बाजार समिती मधील मुख्य प्रशासक व व्यापार्‍यांतील पेच अद्याप कायम असून मंगळवार दि.१३ डिसें. रोजी कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्याचा छातीठोक दावा करणारे मुख्य प्रशासक मात्र या दाव्यात नापास झाले आहेत. दरम्यान व्यापाऱ्यांनी मुख्य प्रशासकांना तडजोडीचे पत्र पाठवले असून ती न झाल्याने उद्या जिल्हा उपनिबंधक तडजोडीकरिता आकोटात येत आहेत. तर दुसरीकडे येत्या दोन दिवसात कापूस खरेदी सुरू न झाल्यास शेतकरी पॅनलने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गत ६ डिसेंबर पासून आकोट बाजार समितीमध्ये कापूस खरेदी बंद आहे. वास्तविक बाजार समितीच्या नियमांनी व्यापाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा अधिकार बाजार समितीला दिला आहे. परंतु यासोबतच बाजार सलग तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बंद राहू न देण्याकरिता पर्यायी व्यवस्था करण्याचे कर्तव्य ही या नियमानी बाजार समितीवर बंधनकारक केले आहे. अशा स्थितीत बाजार समितीने व्यापाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा अधिकार बजावला आहे.

मात्र पर्यायी व्यवस्था उभी करण्यात बाजार समिती नापास झाली आहे. परिणामी गत ७ दिवसांपासून कापूस बाजार ओस पडला आहे. समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी मात्र मोठमोठ्या शहरातील बडे बडे कापूस खरेदीदार बोलावून दिनांक १३ डिसेंबर रोजी कापूस बाजार सुरू करण्याच्या डरकाळ्या फोडल्या होत्या.

मात्र १३ डिसेंबर रोजी कापूस बाजारात पूर्ण शुकशुकाट पसरलेला आढळून आला. परिणामी मुख्य प्रशासकांच्या ह्या डरकाळ्या फुस् झाल्या आहेत. त्यामुळे बाजार समिती केवळ गप्पांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने चालवावी लागते असा संदेश प्रस्रृत झाला आहे.

मुख्य प्रशासकांच्या ह्या निरर्थक वल्गनांदरम्यान आकोटच्या व्यापाऱ्यांनी मुख्य प्रशासकांना तडजोडीचे पत्र लिहून त्यात आपल्या मागण्या नमूद केल्या आहेत. सौदा पट्टीवर “ओला हलका माल वापस” या ऐवजी “सारखा माल”हे दोन शब्द लिहावेत किंवा वाहनातील पूर्ण कापूस बाहेर काढून त्याचा ढेर करण्यात यावा. तो कापूस पारखून व्यापारी त्याची निलामी करतील. किंवा बाजार समितीने स्वतः कापसाची गुणवत्ता प्रमाणित करावी.

त्यानुसार व्यापारी बोली बोलतील यासोबतच व्यापारी व कास्तकार यांच्यात वाद झाल्यास त्याचा निपटारा करण्याकरिता वांधा समिती गठीत करण्यात यावी. मात्र यावर मुख्य प्रशासकांनी आपला तोरा कायम ठेवला. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. परंतु बाजार समिती सलग तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बंद राहणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी नियमाने जिल्हा उपनिबंधकांवर सोपवलेली आहे. ती पार पाडण्याकरता शुक्रवार दि.९ डिसें. रोजी सहा. उपनिबंधक खाडे अकोटात आले होते.

मात्र त्यांना तडजोडीऐवजी आकोटातून सटकण्याचीच अधिक घाई होती. त्यामुळे त्यांनी चर्चा करण्याचा केवळ देखावा करून रविवार दि.११ डिसें. रोजी संयुक्त बैठक घेण्याचे घोषित केले. परंतु स्वतः ् बोलाविलेल्या ह्या बैठकीस खाड्यांनीच पाठ दाखवली. त्यांच्या ह्या बेजबाबदारीने हा वाद तसाच धूमसत राहिला. म्हणून आता दिनांक १४ डिसें. रोजी जिल्हा उपनिबंधक कहाळेकर तडजोडीकरिता आकोट येथे येणार आहेत.

दरम्यान शेतकरी पॅनल नेत्यांनी जिल्हा उपनिबंधक कहाळेकर व सहायक उपनिबंधक खाडे यांचे बाबत पणन संचालक व सहकार मंत्रालय सचिव यांचेकडे तक्रार केली आहे. आपल्या या तक्रारीत त्यांनी कहाळेकर व खाडे यांच्या बेपर्वा व बेजबाबदारीबाबत त्यांचे वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

सोबतच येत्या दोन दिवसात कापूस खरेदी पूर्ववत सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कहाळेकर आकोट येथे येत आहेत. मुख्य प्रशासक व व्यापारी यांच्यातील वादाची तडजोड व कापूस खरेदी सुरू करणणेबाबत ते काय दिवे लावतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: