Friday, May 17, 2024
Homeराज्यत्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला :- नाना पटोले...

त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला :- नाना पटोले…

Share

त्र्यंबकेश्वरमधील वातावरण बिघडवणाऱ्या अनाचार्य भोसले, आनंद दवे, नितेश राणेंचीच एसआयटी चौकशी करा.

जनाधार घटत चालल्यानेच दंगली घडवून राजकीय पोळी भाजण्याचे भाजपाचे षडयंत्र

सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांचे जाहीर आभार.

महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे.

त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत आहे असे स्थानिक लोकांनी स्पष्ट केले आहे. गावकऱ्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेऊन भाजपाचा दंगल घडवण्याचा डाव हाणून पाडला आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर प्रकरणी भारतीय जनता पक्षाचा खरपूर समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत संभाजीनगर, अकोला, शेवगाव, अहमदनगर व आता त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले गेले. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासभा, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ,

भाजपा आध्यात्मिक आघाडी, युवा मोर्चा, लव्ह जिहाद संघटना या भाजपाच्या बगलबच्यांनी मंदिराच्या पायऱ्यावर गोमूत्र शिंपडून महाआरती केली. हिंदूशिवाय इतर धर्मांच्या लोकांनी मंदिरात प्रवेश करु नये असे फलक झळकवले. आपली राजकीय पोळी भाजपण्यासाठी भाजपा लोकांमध्ये धार्मिक वाद घडवून आणत आहे हे चिंताजनक आहे.

मात्र राज्यातील जनता सुज्ञ असून भाजपाच्या अशा षडयंत्राला बळी पडणार नाही. त्र्यंबकेश्वरमधील प्रकरणी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा कोणताही प्रकार झालेला नाही.

धूप दाखवण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली असल्याचे गावकरी व पोलीस सांगत आहेत मात्र भाजपाशी संलग्न संघटना जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. अनाचार्य भोसले, हिंदू महासभेचा आनंद दवे, आमदार नितेश राणे यांच्यासह ज्यांनी त्र्यंबकेश्वरचे वातावरण बिघडवण्यास खतपाणी घातले, चिथावणी दिली, त्यांचीच चौकशी फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीने करावी.

नाशिकमधील काळाराम मंदिर प्रवेशासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह सत्याग्रह केला होता. आज त्याच नाशिक जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवले जात आहे. मागील काही दिवसातील घटना पाहता भाजपा जाणीवपूर्वक अशा घटनांना खतपाणी घालण्याचे काम करु शकते मात्र त्र्यंबकेश्वरच्या लोकांनी घेतलेली भूमिका व नाशिकमधील स्थानिक प्रसार माध्यमांशी घेतलेली भूमिका यामुळे मोठा अनर्थ टळला, त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले पाहिजेत असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: