Friday, May 3, 2024
Homeराज्यअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन…

Share

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री. शरद पवार व मुख्य निमंत्रक मा.ना.श्री. उदय सामंत आहेत.

तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.

दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे संपन्न होणार असून दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर, दिनांक २७ आणि २८ जानेवारी २०२४ सोलापूर, दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ बीड, दिनांक १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ लातूर, दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर, आणि मुंबई येथे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च २०२४ रोजी संपन्न होणार आहे. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या ९ एकांकिका आणि बालनाट्य तसेच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल २०२४ यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा , मुंबई येथे संपन्न होणार आहे.

एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय व तृतीय एकांकिका आणि बालनाट्यसाठी अनुक्रमे रु. ११,०००/- रु. ७,०००/- व रु. ५,०००/- पारितोषिक देण्यात येणार असून अंतिम फेरीत या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस रु. २,००,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे अथवा इतर एकांकिकेस प्रथम रु. १,००,०००/-, द्वितीय रु. ७५,०००/- तृतीय रु. ५०,०००/- आणि उत्तेजनार्थ २५,०००/- रोख, तसेच दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय ह्या साठी प्रत्येकी प्रथम द्वितीय व तृतीय साठी अनुक्रमे रू. १५,०००/-, रू. १०,०००/-, रू. ५,०००/- रोख देण्यात येणार आहेत. या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या खास ह्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या नवीन एकांकिकांमधून तीन एकांकिका सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात येतील. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल.

अंतिम फेरीत निवड झालेल्या नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रू. ५०,०००/- ,रू. ३५,०००/- , रू. २५,०००/-, आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रू. १०,०००/- देण्यात येणार आहेत.

सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल.

या संपूर्ण १०० व्या नाट्य संमेलनास रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.

(अजित भुरे)
प्रमुख कार्यवाह


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: