Tuesday, April 30, 2024
Homeराज्यकृषी विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..!

कृषी विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..!

Share

सहकारी – सामुदायिक शेतीची संकल्पना मांडणारे बाबासाहेब दूरदृष्टीचे नेते होते – प्रा. भाष्कर पाटिल

समाजभान जोपासत बाबासाहेबाना अभिप्रेत ग्रामव्यवस्था वृद्धिंगत करणे हिच बाबासाहेबांना खरी आदरांजली – डॉ. शरद गडाख

अकोला – संतोषकुमार गवई

देशातील तत्कालीन परिस्थिती लक्षात घेत लहान घटक क्षेत्राला पाठिंबा देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीचे विभाजना सोबतच सहकारी – सामुदायिक शेतीची संकल्पना मांडत पर्यायाने सामाजिक जातीभेदाला मुठमाती देत एकोपा वाढीस लागून सशक्त राष्ट्रनिर्मिती साध्य होईल ही दूरदृष्टी अधोरेखित केल्याचे प्रशंसनीय प्रतिपादन सुधाकरराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय अकोलाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. भाष्कर पाटिल यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 व्या जयंतीनिमित्त डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाचे प्रसंगी मुख्य वक्ता म्हणून प्राध्यापक तथा विद्यार्थी वर्गाला ते संबोधित करीत होते. आपल्या अतिशय ओघावत्या वाणीत बाबासाहेबाच्या जीवनकार्याचा विशेषतः शेती आणि शेतकरी विषयक कार्याचा आणि आजच्या समाजजीवनाचा अतिशय सुरेख समन्वय साधत बाबासाहेब आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे परस्पर सहयोगी धोरण सुबकतेने गुंफले.

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, कोकणातील खोती पद्धतीचा विरोध, शेतसारा पद्धतीचा विरोध व पर्यायी ऐपतीवर आधारित पद्धतीची शिफ़ारस आदी घटना अधोरेखित करताना डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांचे संप, चळवळी आंदोलने उभारणारे बाबासाहेब विद्यार्थ्यांसमोर सक्षमतेने मांडले. शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा व औद्योगिकतेचा दर्जा द्यावा ही बाबासाहेबांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज देखील डॉ. भास्कर पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण संबोधनात व्यक्त केली.

तर शेतकरी कुटुंबातून शेतीच्या शिक्षण घेणाऱ्या पदवीधरांनी व्यावसायिक पद्धतीने शेती करीत पारंपरिक शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांना देखील आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रसारित करावे व आपण समाजाचं देणं लागतो ही भावना जोपासणे हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे वास्तविक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाश्वत विकासासाठी अनेकानेक संकल्पना मांडत आणि कृतीत आणत देशाला भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगताना डॉ.बाबासाहेबांचे कार्य युवा पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक असून व्यावसायिक शेती संदर्भातील त्यांचे विचार अतिशय वास्तविक आणि युवा पिढीला प्रेरणादायी ठरणारे असून युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र निश्चितच अभ्यासावे असे आवाहन देखील डॉ. गडाख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले व
जागतिक पटलावर एक बलाढ्य लोकशाही म्हणून आपला देश विश्व पटलावर विराजमान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशाग्र आणि व्यवहार्य नेतृत्वात निर्माण झालेले भारतीय संविधान संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत असताना जातीपातीच्या जोखडातून समाजाला बाहेर काढणे हिच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल देखील डॉ. शरद गडाख यांनी प्रतिपादित केले.

कुलगुरू डॉ शरद गडाख यांचे अध्यक्षतेत कृषी महाविद्यालय अकोलाच्या समिती सभागृहात आयोजित या जयंती सोहळ्याचे प्रसंगी संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलसचिव सुधीर राठोड आदींची विचार मंचावर विशेष उपस्थिती होती.

तर कृषि महाविद्यालय अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे यांचे सह सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबाराव सावजी, डॉ. ययाति तायडे, डॉ. शैलेश हरणे, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, यांचे सह विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी तथा विद्यार्थी वर्गाची सभागृहात उपस्थिती होती. पाहुण्याचा संक्षिप्त परिचय विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.संदीप हाडोळे यांनी करून दिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजनासाठी कुलगुरू डॉ.शरद गडाख यांचे मार्गदर्शनात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.संदीप हाडोळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वैभव बनसोड यांनी तर आभार चेतन निचळ प्रदर्शन यांनी केले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विद्यार्थी कल्याण विभागाद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते यामध्ये प्रश्नमंजुषा रांगोळी स्पर्धा पोस्टर मेकिंग आणि निबंध स्पर्धेच्या समावेश होता. या स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये पल्लवी कुर्वे, राकेश घोडीचोर, वैभव बनसोड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय, प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये बादल बावणे, सौरभ देशमुख, सार्थक वासनिक यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय, पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये पल्लवी कुर्वे, पायल पद्मने, तेजस्विनी झसकर यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय तथा निबंध लेखन स्पर्धेमध्ये मुक्ता देशमुख, सुप्रिया गोपनारायण व नम्रता तायडे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांनी अथक परिश्रम घेतले.


Share
Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: