Tuesday, May 7, 2024
Homeगुन्हेगारीपट्टेदार वाघाने केले शेतकर्‍याचे भक्षण, मुसेवाडी मार्गावरील नहाबी शेतशिवारातील थरारक घटना...

पट्टेदार वाघाने केले शेतकर्‍याचे भक्षण, मुसेवाडी मार्गावरील नहाबी शेतशिवारातील थरारक घटना…

Share

  • अख्ख्या तालुक्यात भितीचे वातावरण…

रामटेक – राजु कापसे.

गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या एका शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून नरडीचा घोट घेत त्याच्या शरीराचे अक्षरशः भक्षण केल्याची थरारक घटना रामटेक – मुसेवाडी मार्गावर १ कि.मी. आतमध्ये असलेल्या नहाबी शेतशिवारात काल दि. ५ नोव्हेंबर ला घडली. या घटनेमुळे परिसरातच नव्हे तर संपुर्ण तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

नंदु लक्ष्मण सलैय्या वय ६८ वर्ष रा. नहाबी असे मृतकाचे नाव आहे. विशेष म्हणजे १५ वर्षातील ही पहिलीच घटना असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. नहाबी गावपरीसरात अनेकांना वाघ दिसण्याची चर्चा होती परंतु कोणतीही लहान मोठी घटना न घडल्याने कोणी याकडे फारसे लक्ष दिले नाही. परिसरातील नागरिकांनी ही केवळ अफवा असल्याचे गृहीत धरून याकडे दुर्लक्ष केले. सर्वजण आपापल्या शेती कामात व्यस्त झाले मात्र काही दिवसांपूर्वी एका पट्टेदार वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा नहाबी गावातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

पाच नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे शेतकरी नंदू सलैय्या हे आपल्या गुरांसाठी लागणारा चारा आणण्यासाठी सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास नहाबी शेतशिवारात गेले होते. त्यांनी देशमुख नामक गृहस्थाचे शेत बटईने घेतले होते बटईने घेतलेल्या या शेताजवळ चारा तोडत असताना दबा धरून बसलेल्या पट्टीदार वाघाने नंदू सलैय्या यांच्यावर हल्ला करून त्यांचा अक्षरशः फडशा पाडला. त्यांचे संपूर्ण शरीर छिन्नविछीन्न झाले होते. डोके, हात व पाय वेगवेगळ्या ठिकाणी पडून होते या घटनेमुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री आठ वाजताच्या सुमारास वन विभागाची चमू दाखल झाली त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यादरम्यान स्थानिकांनी वन विभागाने या नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा व मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी केली. वन विभागाने यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: