Friday, May 17, 2024
Homeराज्यरामनामाच्या जयघोषाने दुमदुमला अवघा गडमंदीर परीसर...

रामनामाच्या जयघोषाने दुमदुमला अवघा गडमंदीर परीसर…

Share

  • दुपारी १२ च्या सुमारास भक्तीमय वातावरणात पार पडला श्रीराम जन्मोत्सव
  • दर्शनार्थींची संख्या लाखाच्या घरात
  • रामनवमीच्या दिवशी गडमंदीरावर उसळली अलोट गर्दी
  • अलोट गर्दी हाताळतांना गडमंदीर सुरक्षा रक्षकांसह पोलीसांची दमछाक
  • भक्तगणांसाठी ठिकठिकाणी शरबत व महाप्रसादाचे वितरण

रामटेक – राजू कापसे

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत प्रख्यात असलेल्या रामनगरी ( रामटेक ) मध्ये आज दि. ३० मार्च ला गडमंदीरावर श्रीराम नवमी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी १२ वाजतादरम्यान राम जन्मोत्सवाच्या वेळी अवघा गडमंदीर परीसर ‘ रामनामाच्या ‘ जयघोषाने दुमदुमुन गेलेला होता. गावोगावावरून आलेल्या दिंड्या, पालख्या तथा दर्शनार्थी ने संपुर्ण गडमंदीर परीसर भरून गेलेला होता. पहिल्यांदाच राम नवमी ला एवढी अलोट गर्दी असल्याची तथा लाखाच्या घरात दर्शनार्थीची संख्या पोहोचली असल्याची चर्चा यावेळी सर्वीकडे होती.

विशेष म्हणजे रामजन्मोत्सव थाटात साजरा करण्याची उत्कंठा यावेळी रामनगरीवासीयांसह संपूर्ण तालुक्यातच दिसुन आली. तालुक्यात ठिकठिकाणी रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान आज दि. ३० मार्च ला प्रख्यात श्रीराम गडमंदीरावर पहाटेपासुनच रामनामाचे वारे वाहु लागले होते. सकाळच्या सुमारास गडमंदीरामध्ये पुजारीच्या हस्ते विधीवत पुजा अर्चना झाली. श्रीरामाच्या मुर्तीला नवीन कपडे परिधान करण्यात आले. कुणी सकाळच्या सुमारास तर कुणी रामजन्मोत्सवाच्या काही वेळ पुर्वी गडमंदीरावर हजर झाले.

दुपारी १२ वाजताच्या दरम्यान रामजन्माची वेळ होताच भावीक भक्तगण रामनामाचा जयघोष करीत नाचु गाऊ लागले. हाताच्या टाळ्यांचे, ढोलकीचे व टाळांच्या आवाजासह भक्तगणांच्या मुखातुन निघणार्‍या रामनामाच्या गजराने यावेळी अवघा रामगड परीसर निनादून गेलेला होता. राममंदीरामध्ये गुरुदेव भजन मंडळाचे भजन सुरु होते तर बाहेरील आवारात ह.भ.प. श्री संत रामभाऊजी पडोळे महाराज यांचे किर्तन सुरु होते. नागपुर, देवलापार तथा जामसावळी तथा इतर ठिकाणाहुन पालख्या आलेल्या होत्या तर धोतकी येथुन दिंडी आलेली होती. रामजन्मोत्सवादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भावीक भक्तांनी एकच गर्दी केलेली होती.

गडमंदीरावरील विद्युत रोषनाई ठरली आकर्षणाचे केंद्र
श्रीराम नवमी च्या काही दिवसांपूर्वीपासुनच गडमंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. गडमंदीर उंच असल्याकारणाने रात्रीच्या सुमारास जवळपास १५ किलोमिटरपासुनही हा रामगड दिसुन येत होता हे विशेष. रंगीत विद्युत रोषणाई एवढी आकर्षक होती की गडमंदीराच्या सभोवतालच्या १५ किलोमिटरच्या परीसरात रामनगरील हा प्रख्यात रामगड आकर्षणाचे केंद्र ठरला.

गडमंदीर सुरक्षा रक्षकांसह पोलीसांची दमछाक
पहिल्यांदाच या रामनवमीला गडमंदीरावर लाखाच्या घरात दर्शनार्थी भावीक भक्तगणांची अलोट गर्दी दिसुन आल्याची चर्चा सर्वीकडे होती. एवढ्या मोठ्या जनसमुदायाला हाताळणे तथा दर्शनाचे नियोजन करणे सहज बाब नव्हती. लोकांच्या गर्दीचे नियोजन करतांना देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांसह पोलीस प्रशाषणाची चांगलीच दमछाक झाली.

गडमंदीरावर देवस्थानच्या रिसीव्हर एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांचे मार्गदर्शनात निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर हे आपल्या सुरक्षा रक्षकांसह व रामटेक पोलिस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक हृदयकुमार यादव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तटस्थ होते. दिवसभरच येथे हजारो भक्तगणांची रेलचेल सुरु होती. वाहनांची तर गडमंदीराच्या रस्त्यांवर रिघ लागलेली होती. गडमंदीराच्या दोन्ही रस्त्यांवर पोलीस कठडे लावुन तटस्थ होते.

ठिकठिकाणी शरबत व महाप्रसादाचे वितरण
रामनवमीच्या दिवशी स्थानिकांसह दुरदुरुन भावीक भक्तगण दर्शनार्थी, दिंड्या, पालख्या रामनगरीत दाखल होत असतात. तेव्हा याची जाण ठेवुन काही स्वयंसेवी संस्था, भावीक, नागरीकांनी त्यांच्यासाठी ठिकठिकाणी शरबत तथा महाप्रसाद वितरणाचे आयोजन केलेले होते. शितलवाडी, गांधी चौक, किरणपाटी तथा गडमंदीरावर असे स्टॉल लावण्यात आलेले होते. दरम्यान शितलवाडी टी पॉईंट जवळ येथील सार्वजनीक मित्र मंडळाकडुन दुपारच्या सुमारास शरबतचे व सायंकाळच्या सुमारास महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते.

यादरम्यान येथे उद्धव ठाकरे प्रणीत शिवसेनेचे विजय बरबटे व मौदा चे देवेंद्र गोडबोले हे कार्यकर्त्यांसमवेत बाईक रॅली दरम्यान आले होते. त्यांना येथे शरबत चा गारवा देण्यात आला. वापर झाल्यावर ग्लास तथा प्लेट उचलुन स्वच्छतेचा संदेश सुद्धा स्टॉल लावणाऱ्यांकडुन यावेळी दिल्या जात होता.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: