Monday, May 6, 2024
Homeराज्यपेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव सप्ताह २०२२ चे थाटात उद्घाटन...

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव सप्ताह २०२२ चे थाटात उद्घाटन…

Share

सिल्लारी येथे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली वन ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन

राजू कापसे

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी येथील अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्रामध्ये आज वन्यजीव सप्ताह 2022 चे थाटात उद्घाटन करण्यात आले, या उद्घाटन कार्यक्रमास रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती होती, सोबत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक श्रीमती ए. श्रीलक्ष्मी या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, तसेच या कार्यक्रमास श्रीमती शांताताई कुमरे (जिल्हा परिषद सदस्य)आणि श्री. संजय नेवारे (पंचायत समिती सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती होती.

वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती आपल्या प्रस्ताविकेत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक श्री अतुल देवकर यांनी करून दिली पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील खुमारी आणि चारगाव या गावात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास समितीला यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते प्रत्येकी रुपये 25 लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात काम करणाऱ्या प्राथमिक बचाव दलाच्या झिंझेरिया, घोटी आणि खापा येथील सदस्यांचे मानव-वन्यजीव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात बोलताना आ. श्री. जयस्वाल यांनी बफर क्षेत्रातील युवकांना जंगलाधारित रोजगार निर्मिती आणि वन्य प्राण्यांकडून शेतीवर होणारे नुकसान कमी करण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत सखोल विश्लेषण केले तसेच निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना उपजीविका संसाधने निर्माण करण्याबाबत आश्वस्थ केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक श्रीमती श्रीलक्ष्मी मॅडम यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पात चालू असलेल्या विविध संरक्षण-संवर्धनात्मक कामे तसेच बफर क्षेत्रात चालू असलेल्या रोजगार निर्मिती कामांची माहिती दिली, यावेळी शांतताई कुमरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत जंगलाला लागून असलेल्या आदिवासीबहुल क्षेत्रातील अडचणी आणि त्यावर करता येणाऱ्या उपाययोजना याबाबत आपले मत व्यक्त केले.

वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने अमलतास येथे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या नावाने वनग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले या वन ग्रंथालयाच्या माध्यमातून बफर क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होईल अशी आशा यावेळी आमदार महोदयांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास व्याघ्र प्रकल्पातील काम करणाऱ्या विविध महिला बचत गटाचे सदस्य, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, निसर्ग मार्गदर्शक, जिप्सी चालक-मालक तसेच वनविभागाचे सर्व अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, पूर्व पेंच श्री. मंगेश ताटे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी (ए.नि) श्री. जयेश तायडे यांनी केले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: