Homeराजकीयपदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीमध्ये 'ट्विस्ट'...अ‍ॅड. संतोष गावंडे यांच्या आरोपाची विभागीय स्तरावर दखल...

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीमध्ये ‘ट्विस्ट’…अ‍ॅड. संतोष गावंडे यांच्या आरोपाची विभागीय स्तरावर दखल…

Share

अकोला – अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची करण्यात आलेली मतदार नोंदणी हि पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याविरुद्ध ‘युवाविश्व’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. संतोष गावंडे यांनी केलेली तक्रार विभागीय आयुक्तांनी ग्राह्य धरत पाचही जिल्हाधिका-यांना माहिती कळविण्याचे आदेश दिल्याने या नोंदणी मध्ये ट्विस्ट आला असून या मतदार संघात आणि इच्छूक उमेदवारांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत नियमानुसार पदवीधर मतदारांची जूनी यादी रद्द करण्यात आली असून, त्याठिकाणी मतदारांना नवीन नोंदणी करणे गरजेचे होते. हि नोंदणी प्रक्रिया निवडणूक आयोगामार्फत स्थानिक नोडल अधिकारी यांनी राबविण्याचे निर्देश होते.

मतदार नोंदणी नियम 1960 च्या नियम 31(3) अन्वये हि नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते, ज्यानुसार संस्थाप्रमुखास त्याचे संस्थेचे व कुटुंबाच्या सदस्याला त्याचे कुटुंबाचे अर्ज सादर करता येतील याव्यतिरिक्त एकत्रित स्वरुपातील अर्ज मग ते व्यक्तिशः सादर केलेले असोत किंवा पोस्टाद्वारे सादर केलेले असोत मतदार यादीत समावेश करण्यासाठी मतदार नोंदणी अधिका-याकडून विचारात घेतले जाणार नाहीत.

अशी स्पष्ट सुचना कायद्यामध्ये असतांना प्रत्येक मतदार नोंदणी अधिका-याने हा नियम धाब्यावर बसवून, राजकीय पक्ष व इच्छूक उमेदवारांनी आपली दुकाने थाटून, मतदारांची कागदपत्रे सामाजिक माध्यमांद्वारे जमा करून त्यावर खोटी स्वाक्षरी आणि काही विशिष्ट नावाने राजपत्रित अधिकारी म्हणून खोटे शिक्के मारुन लाखो मतदारांची चुकिच्या पध्दतीने, बेकायदेशीर पणे नोंदणी करुन घेतली. विशेष म्हणजे काही मतदारांना माहिती नसतांनाही त्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

याविरुद्ध तक्रार अ‍ॅड. गावंडे यांनी विभागीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोग यांचेकडे केलेली आहे. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पाचही जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांना लेखी नोंदणीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सदर पदवीधर मतदारसंघात सुरू असलेला हा लोकशाही हत्येचा प्रकार त्वरित थांबवावा तसेच यामधील सर्व दोषी आढळणाऱ्या व्यक्तिंवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 31 अन्वये कार्यवाही करण्याची मागणी अ‍ॅड. गावंडे यांनी केलेली आहे. लोकशाही मुल्यांना वाचविण्यासाठी हि लढाई शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचा निर्धार तक्रारकर्ते अ‍ॅड. संतोष गावंडे यांनी व्यक्त केला आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: