Friday, May 3, 2024
Homeराजकीयवंचित आघाडीने केला कास्तकार पॅनलशी घरोबा….थेट बाळासाहेबांचे आदेश असल्याचा दावा….वंचितांचे अनेक नेते...

वंचित आघाडीने केला कास्तकार पॅनलशी घरोबा….थेट बाळासाहेबांचे आदेश असल्याचा दावा….वंचितांचे अनेक नेते अडचणीत…

Share

आकोट – संजय आठवले

आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची धांदल सुरू झालेली असतानाच वंचित बहुजन आघाडीने या मैदानात नव्यानेच उतरलेल्या कास्तकार पॅनलशी हात मिळवीत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेने अनेक वर्षांपासून शेतकरी पॅनलचे धुरीणत्व करणारे अनेक वंचित नेते अडचणीत आले असून कास्तकार पॅनलशी आघाडी करण्याच्या बाळासाहेबांच्या फतव्यावर ते काय भूमिका घेतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

काहीच दिवसांपूर्वी आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित झाली. त्याबरोबर या घोषणेची प्रतीक्षा करणाऱ्या राजकारण्यांची एकच लगबग सुरू झाली. या निवडणुकीचा इतिहास पाहू जाता, ही निवडणूक दरवेळी सहकार आणि शेतकरी पॅनल या दोघांचे दरम्यान लढविली जात असे. परंतु यावेळी शेतकरी हिताची अनेकांना ऊबळ आल्याने हां हां म्हणता दोनाचे चार झाले आणि मैदानात चौरंगी लढ्याची चिन्हे दिसू लागली.

परंपरागत सहकार आणि शेतकरी पॅनल सोबतच कास्तकार आणि जय किसान पॅनल हेही शड्डू ठोकित मैदानात तैनात झाले. तितक्यात प्रत्येक क्षेत्रात पक्षीय जोर आजमाईश करणाऱ्या वंचित आघाडीने या भाऊगर्दीत आपलाही सहभाग नोंदविला. नेहमीच या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा मुलाधार असलेल्या दलित वर्गाचे मतदार निर्णायक भूमिकेत असतात.

मात्र ही निवडणूक बहुधा पक्षाच्या नव्हे, तर पॅनलच्या नावाने लढविली जाण्याची रुढी असल्याने अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच ही दलित मतेही या ना त्या पॅनलमध्ये विखुरल्या स्वरूपात राहत आलेली आहेत. हीच अवस्था ग्रामपंचायत निवडणुकांचीही होती. मात्र निवडून आलेले पॅनल नेहमीच मोठ्या राजकीय पक्षांच्या विशेषता सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जात असल्याने वंचित आघाडीला आपल्या ताकदीचा अंदाज लागत नव्हता.

त्याने वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत ‘एकला चलो रे’ चा नारा देत निवडणूक पक्षाचे नावावर लढविली आणि त्याचे सुपरीणामही दिसून आले. त्याने हुरूप बळावल्याने बाळासाहेबांनी सहकार क्षेत्रातील निवडणूकही पक्षाचे नावावर लढण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत वंचित आघाडीने आपला दावा दाखल केला.

मात्र अनेक कारणांमुळे वंचित आघाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच जागांवर उमेदवार देण्यास कमी पडली. त्यामुळे आपल्याशी जुळवून घेणाऱ्या पॅनलशी हात मिळवणी करण्याचा वंचितचा मनसुबा होता. राज्यातील राजकारणाची घडी पाहू जाता, वंचित ने वरच्या स्तरावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी घरठाव केला आहे. तेच सूत्र पाहू जाता आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही वंचित उद्धव ठाकरे यांच्याच गटाशी हस्तांदोलन करणार असा कयास होता.

दरवेळी उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडे हे पॅनल उभे करीत आलेले आहेत. सहकार गटाचे कट्टर विरोधक म्हणून वंचितचे नेते गावंडे यांच्याच पॅनल सोबत राहिलेले आहेत. त्याने यावेळीही हे नेते शेतकरी पॅनलच्या पारड्यात बाळासाहेबांचे वजन टाकतील असा राजकीय होरा होता. मात्र दरवेळी संजय गावंडे यांची सोबत करणारे अतुल म्हैसने यांचे आणि संजय गावंडे यांचे आता फाटले आहे. परिणामी म्हैसने यांनी कास्तकार पॅनल नावाचा सवतासुभा निर्माण केला आहे.

त्यातच ते ठाकरे सेनेच्या सहकार क्षेत्रातील आघाडीचे राज्य पदाधिकारी आहेत. त्यामुळे सेनेच्या नावावर दोन सुभेदार आपापला दावा मजबूत करीत आहेत. अशा स्थितीत वंचित कोणत्या बाजूला कूस वळवते याची उत्सुकता होती. ही उत्सुकता शिगेला पोचली असतानाच वंचितने कास्तकार पॅनलला आलिंगन दिले आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता कळले कि, अतुल म्हैसने हे ठाकरे सेनेच्या सहकार आघाडीत पदाधिकारी असल्याने वरच्या स्तरावरून त्यांच्याशीच हस्तांदोलन करण्याचा निर्णय वंचित ने घेतला.

हा निर्णय दस्तूरखुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनीच घेतला असल्याचा वंचितने खुलासा केला आहे. सोबतच कास्तकार पॅनलशी मैत्री केल्याचा निर्णय स्वतः वंचितचे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर करावा असा आदेशही बाळासाहेबांनी दिला. त्यामुळे वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे,

आकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, मनोहर शेळके, संजय पुंडकर, एडवोकेट भूषण घनबहादूर, राहुल इंगळे यांनी आकोट शहरात पत्र परिषद घेऊन वंचित आघाडी व कास्तकार पॅनलची दिलजमाई झाल्याची घोषणा केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: