Thursday, May 2, 2024
Homeराज्यप्रख्यात गडमंदीरावर 'जय श्रीराम' च्या निनादात पार पडला रामनवमी सोहळा...

प्रख्यात गडमंदीरावर ‘जय श्रीराम’ च्या निनादात पार पडला रामनवमी सोहळा…

Share

  • गडमंदिरावर विद्युतदिव्यांची रोषणाई, दिंडी, पायीवारी पालख्यांनी दुमदुमले रामटेक
  • कडकडत्या उन्हातही हजारो भाविकांनी घेतले प्रभु श्रीरामाचे दर्शन

रामटेक – राजु कापसे

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रख्यात रामनगरीतील गडमंदीरावर काल दि. १७ एप्रील ला दुपारी १२ वाजता ‘ जय श्रीराम ‘ निनादात श्रीरामाचा जन्म सोहळा थाटात पार पडला. यावेळी संपूर्ण गडमंदीर परिसर टाळ दिंड्यांचा गजर आणि जयश्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

मंगळवार (ता. १६) ला आयचित मंदिरातून निघालेली पायीवारी बुधवारी रामटेक शहरात दाखल झाली. राखी तलाव चौकात वारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वारकरी श्रीरामांचा गजर करीत नाचत गुलाल उधळत गात होते. १७ एप्रील ला दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सवाचा सोहळा विधीवत पुजा अर्चना करून धार्मिक वातावरणात साजरा झाला. नगरपालिकेने वारीच्या मार्गाची साफसफाई केली होती. गडमंदीरावर येणाऱ्या विविध वारींचे जागोजागी भाविकांकडून स्वागत करण्यात आले.

मंदिरात सर्व वारकऱ्यांची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वत्र भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि दुपट्टेधारी भाविकांनी लक्ष वेधले होते. गडमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. गडमंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांसाठी काही सेवाभावी व्यक्तींकडून जागोजागी पिण्याच्या पाण्याची तथा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

रामजन्मोत्सवादरम्यान गडमंदीरावर दरवर्षी प्रमाणे यंदाही ह.भ.प. रामभाऊजी पडोळे महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. नागपुर तथा इतर ठिकाणांहून अनेक दिंड्या, पायदळ वारी गडमंदीरावर येत असतात त्यात वयोवृद्ध नागरीकांपासुन तरुण मुलांचा समावेश असतो. देवलापारवरुन देखील एक पायी वारी रामनामाचा जयघोष करीत गडमंदीरावर येत असते.

राम नवमी च्या दिवशी गडमंदीरावरील ‘ सीतामाई अन्नछत्र ‘ येथे भोसला देवस्थान कडुन तथा पार्किंग परीसरात मठ वाल्यांकडुन हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. एकुणच रामनवमी चा संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व थाटात पार पडला.

या दिवशी भोसला देवस्थान च्या रिसीव्हर एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांचे मार्गदर्शनात निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे योग्य आयोजन व नियोजन केले होते . पोलीस प्रशासणानेही चोख बंदोबस्त लावलेला होता.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: