Monday, February 26, 2024
Homeराज्यराज्यस्तरीय महासंस्कृती महोत्सवाचा रामटेक येथून थाटात शुभारंभ...

राज्यस्तरीय महासंस्कृती महोत्सवाचा रामटेक येथून थाटात शुभारंभ…

Share

रामायण नृत्यनाटीकेने महोत्सवाची सुरुवात, हेमा मालिनीच्या माता सितेच्या भूमिकेने रसिक मंत्रमुग्ध, नेहरू मैदानात हजारोच्या संख्येत रसिकांची उपस्थिती, आज सुरेश वाडकर यांचे गीतगायन

रामटेक – राजु कापसे

प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म, बालपण, गुरुकुलातील शिक्षण, सीता स्वयंवर, १४ वर्षांचा वनवास असे रामायणातील एकाहून एक सरस प्रसंग अभिनेत्री हेमा मालिनी व त्यांच्या चमूने नृत्य नाटीकेद्वारे सादर करीत हजारोंच्या संख्येने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करीत दाद मिळवली. रामटेक येथील गर्दीने तुडुंब भरलेल्या नेहरू मैदानात रामायणातील विविध प्रसंग आज जिल्हावासीयांनी ‘याचि देही याची डोळा’ अनुभवले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने  आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा आज प्रभू श्रीरामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामटेक येथून थाटात शुभारंभ झाला. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या रामायणावर आधारित नृत्य नाटीकेने महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली.या महोत्सवाला पहिल्याच दिवशी रसिकांचा हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी खा. कृपाल तुमाने, आ. ॲड. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपायुक्त खुशाल जैन
पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवई, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्य कार्यक्रमस्थळी भव्य आकाराचा स्टेज उभारण्यात आला. या स्टेजवर आज स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या हेमा मालिनी व त्यांच्या चमूने नृत्यनाट्याचे सादरीकरण केले.

स्वतः अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या महानाट्यामध्ये सीतामाईची भूमिका साकारली होती. या नाटकाचे भूषण लखंद्री यांनी दिग्दर्शन केले. संगीत आणि स्वर रवींद्र जैन यांचा तर गायन सुरेश वाडकर, सुधा कृष्णमूर्ती, सुशील कुमार यांनी केले आहे. नाट्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली.

तत्पूर्वी, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना खा. कृपाल तुमाने म्हणाले की, संपूर्ण जिल्हावासीयांना या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक मेजवानी मिळाली आहे. रामटेकमध्ये राज्यातील पहिला महोत्सव आयोजित करण्यात आल्याचा या भागाचा खासदार म्हणून आनंद असल्याचे ते म्हणाले.

आ. आशिष जायस्वाल म्हणाले की, रामटेक नगरीत महासंस्कृती महोत्सव होत असल्याचा आनंद आहे. राज्यात पहिल्यांदा हा महोत्सव नागपुरात होत असल्याचा आनंद आहे. पुढील चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भविष्यातही असेच आयोजन करण्यात येईल, असे आमदार जयस्वाल यावेळी म्हणाले.

दरम्यान, उद्या, दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

अवघे मैदान ‘सांस्कृतिक’मय

संपूर्ण मैदानावरील आजचे वातावरण ‘सांस्कृतिक’ मय झाल्याचे पाहायला मिळाले.
मैदानावर भल्या मोठ्या आकाराच्या एलईडी वॉल उभारण्यात आली. अयोध्येतील राम मंदिराची ५२ फुट उंच प्रतिकृती आणि यज्ञकुंडही परिसरात उभारण्यात आले आहे.

महोत्सवासाठी प्रवेश निःशुल्क

19 ते 23 जानेवारी दरम्यान रामटेक येथील नेहरू मैदानावर होत असलेल्या या पाच दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती मिळत आहे.  आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांच्या सहभाग या महोत्सवात आहे. पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: