Sunday, April 28, 2024
Homeराज्यसावरगाव च्या सरपंच प्रगती ढोणे अपात्र...

सावरगाव च्या सरपंच प्रगती ढोणे अपात्र…

Share

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या ग्राम पंचायत सावरगाव येथील सरपंच प्रगती ढोणे यांनी बोगस पद्धतीने ई-टेंडर पद्धत राबविणे,मृतक व्यक्तींच्या नावाने लाभ देणे,ग्राम पंचायत नोटिस न देता विशेष सभा घेणे,शासकीय कामांमध्ये अनियमितता तसेच ठराव मंजूर नसतांना कामे करणे त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत अपर विभागीय आयुक्त,नागपूर डॉ.माधवी खोडे चवरे यांनी त्यांना अपात्र ठरविले असून सोमवार दिनांक 12/06/2023 ला तसा आदेश पारित केला.

मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव ग्राम पंचायत चे उपसरपंच राजू गिरडकर यांनी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) अंतर्गत ग्राम पंचायत सावरगाव च्या सरपंच प्रगती ढोणे यांनी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याविषयी अप्पर आयुक्त, नागपूर विभाग,नागपूर यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.

त्यामधे गैरअर्जदार यांचे विरोधात 11 मुद्दे तक्रार अर्जात होते. गैरअर्जदार सरपंच प्रगती ढोणे या 2018 च्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या.

प्रस्तुत प्रकरणात अर्जदार राजू गिरडकर यांचे तक्रारीतील 11 मुद्द्यांपैकी 5 मुद्द्यांमध्ये दोषी आढळल्या असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,नागपूर यांनी सादर केला.

त्यामधे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) मध्ये अशी तरतूद आहे की, जो कोणी सदस्य किंवा कोणताही सरपंच किंवा उपसरपंच आपली कर्तव्य पार पाडतांना केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल किंवा लांछनास्पद वर्तणुकीबद्दल किंवा कर्तव्य पार करण्याबाबत केल्याबद्दल किंवा आपले कर्तव्य पार पाडताना असमर्थ असल्याबाबत दोषी असल्याबाबत दोषी असेल अथवा आपली कर्तव्य पार पाडण्यात दुराग्रहाने हेळसांड करीत असेल,तर अश्या सरपंच, उपसरपंच, सदस्यास अधिकारपदावरून काढता येईल.

अशाप्रकारे काढून टाकण्यात आलेल्या सरपंच किंवा उपसरपंचास आयुक्तांच्या स्वेच्छानिर्णयानुसार पंचायततीतून काढून टाकता येईल. अशी तरतूद असल्याचे नमूद करून खालीलप्रमाणे अहवाल मा.अप्पर आयुक्त, नागपूर विभाग,नागपूर यांना सादर केला.

1) मुद्दा क्रमांक 1-अ नुसार ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक 08/01/2019 ठराव क्रमांक 10/2 नवीन आरोग्य केंद्राच्या इमारती मध्ये पाण्याची टाकी लाऊन मिळण्याबाबत चा ठराव पारित करण्यात आला व मासिक सभेच्या प्रोसेसिंगची प्रत मंजुरीकरिता सादर न करता मासिक सभा दिनांक 29/06/2019 विषय क्रमांक 12 नवीन आरोग्य केंद्राच्या इमारती मध्ये पाण्याची टाकी लाऊन मिळण्याबाबत ठराव पारित झाला नसतांना व तसा ठराव इतिवृत्तामध्ये नोंद नसतांना सुद्धा सरपंच यांनी जिल्हा कार्यालयास ठराव सादर केला.

2) मुद्दा क्रमांक 7 नुसार विशेष सभा आयोजित केल्याबाबत सभेची स्थळ प्रत उपलब्ध नाही. त्यामुळे विशेष सभेची नोटिस सर्व सदस्यांना तामील करण्यात आली नाही.

3) मुद्दा क्रमांक 09 नुसार सन 2019-20 दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत भूमिगत नाली बांधकाम करतांना 35 मीटर नाली तोडण्यात आली.सदर नाली तोडताना ठराव पारित करण्यात आला नाही.सदर बाब नियमबाह्य असून त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

4) मुद्दा क्रमांक 10 नुसार दिव्यांग व्यक्ति जीवंत आहे किंवा मरण पावले ह्याची खातरजमा न करता 4 लाभार्थ्यांना त्यांच्या मृत्यूनंतर लाभ दिलेला आहे.

5) मुद्दा क्रमांक 11 नुसार ई-टेंडरिंगची प्रक्रिया प्रोसेस 2 मध्ये पूर्णपणे पार न पाडता मे.त्रिमूर्ती बिल्डींग मटेरियल यांना टेंडर मिळण्याकरिता ई-टेंडरिंगची प्रक्रिया बोगस पद्धतीने राबविली. असा अहवाल सादर केला.

या प्रकरणातील अंतिम सुनावणी दिनांक 22/05/2023 रोजी घेण्यात आली. सुनावणीस अपीलार्थी यांचे कडून वीरेंद्र गुलाबराव ढगे व गैरअपीलार्थी यांचे भोजराज धंदाले अधिवक्ता हजर होते. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण घेण्यात आला. प्रकरणात दाखल तक्रार अर्जदार,गैरअपीलार्थी यांचा लेखी युक्तिवाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,

नागपूर यांचा चौकशी अहवाल व अभिप्राय यांचे अवलोकन केले असता वरील मुद्द्या मध्ये सरपंच ग्राम पंचायत सावरगाव कु.प्रगती ढोणे दोषी असून ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1)नुसार कार्यवाहीस पात्र आहे व त्यांना अपात्र करण्यात येत आहे करिता अर्जदार राजू गिरडकर यांचा तक्रार अर्ज मान्य करण्यात येत असल्याचा निर्णय अप्पर आयुक्त नागपूर विभाग, नागपूर डॉ.माधवी खोडे-चवरे यांनी सोमवार दिनांक 12/06/2023 ला दिला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: