Saturday, May 4, 2024
Homeराज्यपातुर | खुनाच्या आरोपातून पत्नी व मुलीची निर्दोष मुक्तता...

पातुर | खुनाच्या आरोपातून पत्नी व मुलीची निर्दोष मुक्तता…

Share

पातुर – निशांत गवई

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयातील ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुनिल एम. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी पत्नी नामे पिंकी उर्फ सायबा तेजराव भोसले (राठोड) व मुलगी नामे तेजसा इतेश चव्हाण (पवार) या आरोपींची त्यांनी त्यांचे अनुक्रमे पती व वडील नामे तेजराव फुकराम भोसले (राठोड) यांचा खुन केल्याच्या आरोपातून दि. १६ / १२ / २०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली.

आरोपींची बाजु अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असलेले लोक अभिरक्षक कार्यालयाचे उप मुख्य लोक अभिरक्षक ॲड. देवानंद डी. गवई यांनी मांडली. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अश्या प्रकारे आहे की, फिर्यादी सौ. सुलक्षणा फुकराम भोसले (राठोड) यांनी दि. १८/०३/२०२१ रोजी पो.स्टे बार्शिटाकळी जि. अकोला येथे रिपोर्ट दिला होता की, त्यांचा मुलगा तेजराव भोसले यांची पहीली पत्नी अम्रिका हीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याने निधण झाले असुन तेजराव याने दुसरे लग्न त्याची साळी सायबा हिच्याशी केले होते.

दि. १७ /०३ /२०२१ सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा तेजराव भोसले व सुन सायबा यांचे जेवण बनविण्याच्या कारणावरून भांडण झाले व त्यांनी एकमेकांना मारहाण केली, त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी व कुटूंबातील सदस्यांनी त्यांची समजुत घालून भांडण सोडवीले.

त्यानंतर संध्याकाळी ७ वा. च्या सुमारास त्यांची सुन सायबा नात सौ. तेजसा इतेश चव्हाण व नात जवाई इतेश चव्हाण हे तेजराव भोसले राहत असलेल्या ठीकाणी झोपडीवर रेल्वे स्टेशनच्या बाजुला बार्शिटाकळी येथे आले. तेजसा हिने तेजरावला म्हटले की, “तु माझ्या आईला जिवाणे मारले, मी तुला सोडणार नाही, तुलाही जिवाणे मारतो’ असे म्हणुन सौ. तेजसा व इतेशा यांनी तेजराव यास लोटपाट करुन जमीनीवर पाडले.

इतेश चव्हाण याने बाजुला ठेवलेली सायकल उचलुन फिर्यादीचा मुलगा तेजराव याच्या अंगावर टाकली. तसेच तेजरावची दुसरी पत्नी सौ. सायबा हिने सुध्दा दगड उचलुन तेजरावच्या छातीवर मारला व तेजसा व इतेश चव्हाण यांनी सुध्दा दगडानी तेजराव याच्या दोन्ही पायावर व डोक्यावर मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी व तिचे पती फुकराम भोसले (राठोड ) व शेजारी राहणारे दायी पवार, बबल्या भोसले व त्याची पत्नी नामे पिक्चर बबल्या भोसले यांनी त्यांना आवरले.

सदर मारहाणीमध्ये तेजराव याच्या छातीला, पायाला व डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन रक्तस्त्राव झाला. त्यांनतर फिर्यादी व तिचे पती यांनी तेजराव यास दि. १८ / ०३ / २०२१ रोजी सकाळी ७ च्या सुमारास अकोला येथे सरकारी दवाखान्यामध्ये उपचाराकरीता नेले असता तो मरण पावला.

सदर रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे मृतक तेजराव भोसले (राठोड) याची पत्नी नामे पिंकी उर्फ सायबा तेजराव भोसले (राठोड ) व मुलगी नामे तेजसा इतेश चव्हाण ( पवार ) या आरोपीं विरूध्द दि. १८/०३ /२०२१ रोजी भांदवी च्या कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना त्वरीत दि. १८/०३/२०२१ रोजी अटक केली होती.

तेव्हा पासुन दोन्ही आरोपी महीला न्यायालयीन कोठडीत अकोला कारागृहात बंदीस्त होत्या. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन बोरगांव मंजु यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व तपास करुन आरोपीकडून गुन्हात वापरलेले हत्यार दगड व सायकल त्याच प्रमाणे रक्तांनी माखलेले आरोपींचे व मृतक तेजराव याचे कपडे जप्त केले व गावातील साक्षीदारांचे जाब जबाब नोंदवुन विद्यमान ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुनिल एम. पाटील यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सदर प्रकरणात वि. न्यायालयाने एकुण नऊ साक्षीदार तपासले. परंतु आरोपीचे वकील अॅड. देवानंद डी. गवई यांनी आरोपी नामे पिंकी उर्फ सायबा तेजराव भोसले (राठोड ) व तेजसा इतेश चव्हाण ( पवार ) याच्यावर आरोप असलेले भांदवीचे कलम ३०२ चे आरोप खोडुन काढतांना मृतक तेजराव फुकराम भोसले ( राठोड ) याला दारु पिण्याचे व्यसन होते व तो गुंडगिरी प्रवृत्तीचा व भांडखोर स्वभावाचा होता व तो नेहमी दारु पिवुन गावातील लोकांना व घरातील सदस्यांना पैश्याची मागणी करुन अश्लिल भाषेत शिवीगाळ करायचा व मारहाण करुन त्रास देत होता व त्याचे गावातील ब-याच लोकांसोबत वादविवाद होते.

कोणीतरी अज्ञात लोकांनी त्याला त्याच्या नेहमीच्या जाचाला व त्रासामुळे कंटाळुन त्याला मारहाण केली व त्याची पत्नी नामे पिंकी उर्फ सायबा तेजराव भोसले (राठोड ) व मुलगी नामे तजसा इतेश चव्हाण ( पवार ) यांना पोलीसांनी कश्याप्रकारे भांदवी च्या कलम ३०२, ३४ मध्ये अडकविले असे न्यायालयास युक्तीवादा व्दारे व साक्षीदारांच्या उलट तपासणी व्दारे पटवुन दिले.

वि. ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री सुनिल एम. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीचे वकील अॅड. देवानंद डी. गवई यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी विरुध्दचा गुन्हा सिध्द न झाल्यामुळे पुराव्या अभावी आरोपी नामे पिंकी उर्फ सायबा तेजराव भोसले (राठोड) व तेजसा इतेश चव्हाण ( पवार ) याची भांदवी च्या कलम ३०२, ३४ मधुन दि. १६/१२/२०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली.

लोक अभिरक्षक कार्यालय, अकोला हे अकोला जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्दारे कार्यान्वित झालेले असून येथे फौजदारी प्रकरणामध्ये गरजू व आर्थिदृष्टया दुर्बल घटकातील आरोपींना नियुक्त तज्ञ वकीलांमार्फत निशुल्क सेवा पुरविण्यात येते तसेच यापुर्वी लोक अभिरक्षक कार्यालयाव्दारे फौजदारी प्रकरणामध्ये अनेक आरोपींनी विधी सहाय्य घेऊन लाभ घेतला आहे अशी माहीती एन. एन. उंबरकर, मुख्य लोक अभिरक्षक यांनी दिली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: