Friday, May 17, 2024
Homeराज्य१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' कार्यक्रम...

१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम…

Share

एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार.

मुंबई – गणेश तळेकर

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे.

या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई येथे होणार आहे.

यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. १५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे व त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे.

अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे.

स्पर्धेची रोख पारितोषिके
एकांकिका स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २,००,०००/- (खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस) अथवा सर्वोत्कृष्ट १,००,०००/-, उत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्तम रू. ५०,०००/-, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रू. २५,०००/-

बालनाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्कृष्ट रू. ५०,०००/-, उत्तम रू. २५,०००/-, तर तीन उत्तेजनार्थ रू. १०,०००/-

नाट्य अभिवाचन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-
नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-

एकपात्री / नाट्यछटा स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्कृष्ट रू. १०,०००/-, उत्तम रू. ५,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. २,५००/-
लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु. १५,०००/-, रु. १०,०००/- , रु. ५०००/- व स्मृतीचिन्ह. बालनाट्य स्पर्धेसाठी रु. ७५००/-, रु. ५०००/-, २५००/- देण्यात येणार आहेत.

तसेच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस देखील भरघोस अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत , तंत्रज्ञ यांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रू. १०००/- तर बालनाट्यासाठी रू. ५००/- व इतर सर्व स्पर्धांसाठी रू. १००/- राहील.

या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विविध स्पर्धांची माहिती, नियामवली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख व सहयोगी प्रमुख यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्थां, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: