Monday, May 27, 2024
Homeराज्यमूर्तीजापुर | धम्म मंगलम् द्वारे विविध ठिकाणी ध्यान साधना शिबिरे संपन्न...

मूर्तीजापुर | धम्म मंगलम् द्वारे विविध ठिकाणी ध्यान साधना शिबिरे संपन्न…

धम्म मंगलम् संस्था मूर्तिजापूर अंतर्गत, म्यानमार येथील पा ओक जागतिक ध्यान साधना केंद्रातील भिक्खू संघाच्या उपस्थितीत विविध ठिकाणी ध्यान साधना शिबिर संपन्न झाले.

19 जानेवारी 24 रोजी म्यानमार येथील आदरणीय भंते धम्मसारा, आदरणीय भंते जगारा, आदरणीय भन्ते चंदलोका यांचे मुंबई येथे आगमन झाले. त्यानंतर 20 आणि 21 जानेवारी रोजी कल्याण पूर्व येथे दोन दिवसीय, त्यानंतर 22 आणि 23 जानेवारी रोजी जुईनगर, नवी मुंबई येथे दोन दिवसीय ध्यान साधना शिबिर संपन्न झाले.

त्यानंतर आदरणीय भिक्खू संघाने अजिंठा लेणींना भेट दिली. अकोला येथे 25 जानेवारी रोजी एकदिवशीय ध्यान साधना शिबिर 550 साधकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 26 जानेवारी ते 28 जानेवारी अशा कालावधीमध्ये आदरणीय भिक्खू संघ चित्त विवेका ध्यान साधना केंद्रावर मुक्कामी असताना शेजारील छोट्या खेड्या गावांमध्ये त्यांनी बुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे भिक्खु पिण्डपात करुन उदरनिर्वाह करीत त्याप्रमाणे केले.

शेवटी 29 आणि 30 जानेवारी रोजी दोन दिवसीय ध्यानसाधना शिबिराचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते. यादरम्यान आदरणीय भंते धम्म सारा यांनी थेरावाद बुद्धिझम मधील तथागत भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजेच निर्वाणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्या धम्मदेसनेतुन सांगितला.

आनापानासती, बुद्धानुसती, मरणानुसती, शरीराच्या 32 भागावरील ध्यान तसेच मैत्री ध्यान ह्या विविध पद्धती त्यांनी सोप्या भाषेमध्ये शिकविल्या. दान शील भावना करुन विपश्यनेपर्यंत कसे पोहोचता येते आणि त्यानंतर निर्वाणाच्या मार्ग कसा प्राप्त होते हे आदरणीय भन्ते धम्म सारा यांनी पीपीटी सादरीकरण आणि तक्त्याद्वारे साधकांना समजावून सांगितले. या दुर्मिळ संधीचा जवळपास दीड हजार साधकांनी लाभ घेऊन पुण्य अर्जित केले.

धम्म मंगलम ही संस्था तथागत भगवान बुद्धांची शिकवण शुद्ध स्वरुपात पोहोचविण्याचे कार्य गेल्या सोळा वर्षापासून अविरतपणे करीत आहे. तसेच म्यानमार,श्रीलंका आणि थायलंड या देशांमधील थेरावाद बुद्धिझम परंपरा आपल्याकडे भारतामध्ये रुजावी यासाठी या तीन देशांतील भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली चित्त विवेका ध्यान साधना केंद्राची उभारणी शेलु नजीक, तालुका मूर्तिजापुर, जिल्हा अकोला येथे निसर्गरम्य वातावरणामध्ये करण्याचे काम सुरू आहे.

यापूर्वी सुद्धा श्रीलंकन भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर ध्यान साधना शिबिरांची आयोजन या संस्थेद्वारे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे धम्म मंगलम द्वारे चित्त विवेका ऑनलाईन ध्यान साधना सत्रामध्ये 2020 पासुन करोना काळापासून घरबसल्या ऑनलाईन ध्यान साधना शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दररोज सकाळच्या ध्यानसाधना सत्रामध्ये साधक उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घेतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments