Friday, June 14, 2024
spot_img
Homeविविधलाखो भाविकांनी घेतला बाल हनुमंताच्या दर्शनाचा आनंद...

लाखो भाविकांनी घेतला बाल हनुमंताच्या दर्शनाचा आनंद…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील बेलोना येथे वर्षातून केवळ तीन दिवस दर्शनाचा लाभ मिळत असलेल्या तालुक्यातील बेलोना येथील बाल हनुमंताच्या दर्शनाचा आनंद लाखो भाविकांनी लुटला. त्रिदिवसीय रथ यात्रेत विदर्भ , मध्यप्रदेश येथील भाविकांनी चैतन्यमय वातावरणाचा अनुभव घेतला. सायंकाळी बाजार चौकात गोपालकाल्याने रथ यात्रेची सांगता झाली. पुढील वर्षी मार्गशिष महिन्यातील पौर्णिमेला आता बाल हनुमंताचे दर्शन होईल.

बेलोना रथ यात्रेला २६० वर्षांची जुनी परंपरा आहे. बुधवार ७ डिसेंबर ला यात्रेची सुरवात झाली. पहाटे बंदिस्त बालमूर्ती हनुमंताचे आगमन झाले. दुपारी रुद्राभिषेक, पूजापाठ भजन कीर्तन झाले. सायंकाळी स्वयंभू बालमूर्तीची लाकडाच्या नक्षीकाम केलेल्या रथात स्थापना करण्यात आली. महाआरतीनंतर रात्री मिरवणूक निघून संपूर्ण गाव रथाने पादाक्रांत केले. गुरुवार ८ डिसेंबर ला रथात विराजमान मूर्तीचे दर्शनाकरिता जीवना नदीच्या काठावर विठ्ठल रुखमींनी मंदिर परिसरात रथाला स्थिर ठेवण्यात आले होते.

भाविकांनी यावेळी मूर्तीचे दर्शन घेण्याकरिता एकच गर्दी केली होती. आज ९ डिसेंबर ला सकाळी विठ्ठल रुखमींनी मंदिर परिसरातून अनेक दिंड्या , भजन मंडळे, बँड पथक, ढोल ताशे पथक तसेच विविध देव देवतांच्या वेशभूषेतील सजीव देखावे आदींच्या सहभागात रथात विराजमान बाल हनुमंताची मिरवणूक काढण्यात आली. गावातील निश्चित मार्गाने मार्गक्रमित करीत सायंकाळी ५ वाजता ही मिरवणूक बाजार चौकात आली. तेथील प्रभू श्रीराम मंदिराजवळ रथ पोहचताच गोपालकाल्याची( लाही ) उधळण करण्यात आली.

गोपाळ काल्याची उधळण होतानाच दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. गोपाळ काल्या नंतर यात्रेत सहभागी ६९ दिंड्या , भजन मंडळे, बँड पथक, ढोल ताशे पथक यांचा यात्रा उत्सव मंडळाकडून यथोचित सन्मान करण्यात आला. रात्री १२ वाजता यथोचित पूजापाठ करून बालमूर्ती हनुमंतांच्या मूर्तीला रेशमी कापडात गुंडाळून बंदिस्त करून विठ्ठल रुखमींनी मंदिराच्या गाभार्यात ठेवल्या जाईल. या मूर्तीचे दर्शन पुढील वर्षी मार्गशिष महिन्याच्या पौर्णिमेलाच होईल.

गेल्या एक महिन्यापासून रथयात्रेची जय्यत तैयारी गावकऱ्यांनी केली होती. संपूर्ण गावात रंगीबेरंगी इलेक्ट्रिक लायटिंग ची सजावट करण्यात आली होती. गावकर्यानी गावातील प्रत्येक घराची आपल्या परीने रंगरंगोटी , स्वच्छता करून यात्रेकरूंच्या स्वागतास सज्ज झाले होते. प्रत्येक घरी येणाऱ्या यात्रेकरूंचे स्वागत होत असल्याचे चित्र होते. येणाऱ्या पाहुण्यांना चहापाणी व जेवणाकरिता आग्रह केला जात होता. प्रत्येक घर पाहुण्यांनी तुडुंब भरली होती. प्रेम , चैतन्य, आनंदाचा वावर दिसत होता.

रथ यात्रे दरम्यान जागोजागी स्वयंसेवकांनी यात्रेकरू करिता चहा पाणी, भाजी पुरी, हलवा पुरी, महाप्रसादाचे स्टॉल लावूंन यात्रेकरूंची सेवा करीत होते. रस्त्याच्या दुतर्फा व जीवना नदीच्या काठावर अनेक वस्तूंची दुकाने, झुले व मनोरंजनात्मक दुकाने थाटली होती. गावाच्या प्रत्येक गल्ली बोळातही स्त्री पुरुष, म्हातारे , युवक , बालकांची तुडुंब गर्दी होती. तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्यप्रदेश यासह इतरही राज्यातील लाखो भाविकांनी बालमूर्ती हनुमंताच्या दर्शनाचा आनंद मिळविला.

यात्रेतील अपार गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरांनी अनेक भाविकांच्या मोबाईल व खिशातील पैशावर हात मारला. पोलीस निरीक्षक जैपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे व पोलीस चमूने तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता तर वाहतूक पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम करीत होते.

यात्रेचा पौराणिक इतिहास
श्रीक्षेत्र बेलोना येथील रथ यात्रा ही २६० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यावेळी एक पडक्या घराला आग लागली. आग विझविण्याकरिता गावकरी जमा झालेत . त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु त्या घराच्या आवारातील विहिरीमधून विचित्र आवाज यायला लागले. त्याचा गावकर्यानी शोध घेतला असता भुंकण्यासारखा “भू भुत्कार” असा आवाज यायला लागला.

शोधांती चमत्कारीकरिता दिव्य मूर्ती आढळली. ही मूर्ती बाल हनुमंताची असल्याची खात्री होताच तिची विधिवत पूजाअर्चा करून मिरवणूक काढण्यात आली . तेंव्हा पासून दरवर्षी या रथयात्रे चे आयोजन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: