Monday, May 6, 2024
Homeराज्यमंत्रालयात दलालांचा मुक्त वावर आणि सामान्य जनतेवर कठोर निर्बंध…नाना पटोले

मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर आणि सामान्य जनतेवर कठोर निर्बंध…नाना पटोले

Share

मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही.

शासन जनतेच्या दारी जाते तर मग जनता शासनाच्या दारी का येते?

भारत मातेपेक्षा नरेंद्र मोदी मोठे आहेत का?

मुंबई – राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही.

आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गुजरातमध्ये एक हुकूमशाही व्यवस्था सुरु झाली तीच व्यवस्था २०१४ पासून केंद्रात आली आणि आता हीच हुकूमशाही व्यवस्था महाराष्ट्रात आली आहे. मंत्रालयात दररोज हजारो लोक आपल्या कामांसाठी येतात, स्थानिक प्रशासनाकडे हेलपाटे घालूनही त्यांचे काम होत नाही.

मंत्री फक्त आश्वासने देऊन मोकळे होतात पण त्याची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटी लोक मंत्रालयात येतात, काहीजण आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करतात. कोणीही आत्महत्या करु नये हीच आमची भूमिका आहे पण लोक जीव देण्यापर्यंत का जातात? याचा सरकारने विचार करायला हवा.

शासन आपल्या दारी म्हणत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी व केवळ जाहीरातबाजी केली जात आहे प्रत्यक्षात या कार्यक्रमातून काही साध्य होत नाही म्हणून तर लोक मंत्रालयात येतात. काम होत नाही म्हणूनच आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलतात, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मर्यादित करणे त्यासाठी जाचक अटी घालणे ही हुकूमशाहीप्रवृत्ती आहे.

हे जाचक नियम लागू न करता सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश सुलभ करण्यावर सरकारने भर द्यावा. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मोठ्या रांगा लागतात, त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी नाहीत, जनता ही राजा आहे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे.

आजच्या मंत्रालयाला पूर्वी सचिवालय नाव होते, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्याचे नाव बदलून मंत्रालय असे केले, त्यामागे सर्वसामान्य जनतेला या वास्तूशी जोडण्याचा त्यांचा उदात्त हेतू होता. सरकार जनतेसाठी आहे, मंत्री महोदयांनी ते प्रशासनाच्या मदतीने चालवणे अपेक्षित आहे. असे असताना केवळ सुरक्षेचे कारण पुढे करुन व गर्दी कमी करायची यासाठी प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा प्रकार संताप आणणारा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

सरकारचा दलाल कंत्राट वाटप करतो.

राज्यातील येड्याच्या सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो. जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरु आहे. अशा दलालांना मंत्रालयात मुक्त वावर आहे आणि सर्वसामान्य जनतेला निर्बंध लावले जात आहेत. सरकारच्या या दलालाचा भांडाफोड काँग्रेस पक्ष लवकरच करणार आहे.

जातीनिहाय जनगणना करा, सर्व समाजाचे प्रश्न मार्गी लागतील.

भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून समाजात तेढ निर्माण करणारे विषारी बिज पेरले आहे, त्याचा आता काटेरी वृक्ष झाला आहे. भाजपा कोणत्याच समाजाला काहीच देणार नाही ते फक्त आश्वासने देतात. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेस पक्ष, सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी केली आहे.

मोदी सरकारने जातनिहाय जनगणना केली तर सर्व समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल पण भाजपा जातनिहाय जनगणना करणार नाही. महागाई, बेरोजगारी या जनतेच्या मुळ प्रश्नावर मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणून ते समाजात तेढ निर्माण करुन मुख्य विषयांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतात.

भारतमातेपेक्षा नरेंद्र मोदी मोठे आहेत का?

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, हे बेगडी आहे. भाजपा कोणाचाच नाही तो फक्त सत्तेचे भुकेला आहे, सत्तेसाठी ते काहीही करु शकतात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अहमदनगर शहरातील दौऱ्यात भारत मातेच्या घोषणा दिली जात असताना या घोषणा थांबवून बावनकुळे यांनी नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. भाजपला भारतमाता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे वाटतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

कांद्याप्रश्नी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत असताना त्याचा निर्यात कर ४०% वाढवून भाव पाडले व शेतकऱ्याला मिळणारे पैसे हिरावून घेतले. टोमॅटोला चांगला भाव मिळत होता पण पुन्हा बाजारात भाव पाडले.

शेतकऱ्याचा माल बाजारात येताच भाव पाडून शेतकऱ्याचे पैसे मिळणार नाहीत याची व्यवस्था केली जाते. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेती साहित्यावर जीएसटी लावला जातो, खते, बियाणे, डिझेलचे दर वाढवले जात आहेत. भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही, असेही नाना पटोले म्हणाले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: