Saturday, May 4, 2024
Homeगुन्हेगारीअपराधी पुत्राऐवजी बातमीत पित्याचे नावाचा उल्लेख...तब्बल चार महिन्यांनी पोलिसात तक्रार…पत्रकाराने व्यक्त केली...

अपराधी पुत्राऐवजी बातमीत पित्याचे नावाचा उल्लेख…तब्बल चार महिन्यांनी पोलिसात तक्रार…पत्रकाराने व्यक्त केली दिलगिरी…

Share

आकोट – संजय आठवले

धनादेश अनादरण प्रकरणी दोषी ठरविण्यात येऊन आकोट न्यायालयाने दंडासह धनादेशाची दुप्पट रक्कम व दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावलेल्या रविराज युवराज मोरे याचे संदर्भात लिहिलेल्या बातमीमध्ये अनावधानाने त्याचे पित्याचे नावाचा उल्लेख झाल्यावरून पत्रकाराने बदनामी केल्याची तक्रार तब्बल चार महिन्यांनी करण्यात आली असून अपराधी पुत्राच्या मात्या पित्यांना झालेल्या मानसिक त्रासाबाबत पत्रकाराने दिलगिरी व्यक्त केली आहे.

घटनेची हकीगत अशी कि, शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक शशिकांत बजरंगलाल अग्रवाल यांनी निर्माण केलेल्या पुष्प संकेत निवासी संकुलातील फ्लॅट क्रमांक ३०२ ची त्यांनी विक्री केली. हा फ्लॅट रविराज युवराज मोरे नामक एका तथाकथित पत्रकाराने खरेदी केला. खरेदी व्यवहार पूर्ण करतेवेळी रविराज मोरे याने शशिकांत अग्रवाल यांना ७,५०,००० व २,५०,००० असे दोन धनादेश दिले. निर्धारित वेळी हे दोन्ही धनादेश विक्रेत्याने वटविणेकरिता बँकेत जमा केले. मात्र त्या धनादेशातील रक्कमच बँकेत जमा नसल्याने हे दोन्ही धनादेश अनादरीत झाले

त्यामुळे सदर कथित पत्रकाराने आपल्याला गंडविल्याची अग्रवाल यांची खात्री पटली. म्हणून मग त्यांनी न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी आकोट व्ही. एम. रेडकर यांचे न्यायालयात कलम १३८ निगोशिएशन इन्स्ट्रुमेंट कायद्यानुसार दोन दावे दाखल केले. न्यायालयाने हे दोन्ही दावे मान्य करून त्यांचे निरसन करणेकरिता प्रकरण सुरू केले. त्याकरिता वादी व बचाव पक्षांचे वतीने त्यांचे बयान व साक्षी पुरावे नोंदविण्यात आले.

यामध्ये फिर्यादी शशिकांत अग्रवाल यांनी स्वतःची साक्ष नोंदविली. सोबतच आपले बयानाचे पुष्ट्यर्थ त्यांनी सक्षम पुरावाही नोंदविला. त्यामध्ये सदर दोन्ही धनादेश खरेदीखताचे मोबदल्यापोटी खरेदीदाराने आपल्याला दिल्याचे त्यांनी नमूद केले. याउलट आरोपी रविराज मोरे याने हे आरोप फेटाळून लावले आणि हे दोन्ही धनादेश केवळ सुरक्षितता म्हणून देण्यात आले असा बचाव केला. आपले बयानाचे पुष्ट्यर्थ त्याने आणखी तीन साक्षीदार कैलास वसंतराव अकर्ते, ज्ञानदेव कचरूजी मांडवे आणि स्वप्निल सुरेश मोरे यांचे पुरावे नोंदविले.

सदर प्रकरणात दोन्ही पक्षांकडून अंतीम युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर आकोट न्यायालयाने फिर्यादीचे साक्षपुरावे ग्राहय धरले. आणि आरोपीचा बचाव सक्षम नसल्याचा निष्कर्ष नोंदविला. आणि आरोपी रविराज युवराज मोरे याला दोन्ही प्रकरणामध्ये दोषी ठरविले. त्यानंतर आरोपी रविराज युवराज मोरे याला संक्षिप्त फौ.मु.नं. ११६७/२०१६ प्रकरणी एक वर्षाचा कारावास व धनादेश रक्कम रू.७,५०,०००/- च्या दुप्पट रू. १५,००,०००/- व रु.१०,०००/- दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.तसेच संक्षिप्त फौ. मु. क्र. ११६७/२०१६ प्रकरणी एक वर्षाचा कारावास व धनादेश रक्कम रू.२,५०,०००/- च्या दुप्पट रू.५,००,०००/- व रु. १०,०००/- दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. प्रविण दे. वानखडे यांनी यशस्वी बाजू मांडली.

या प्रकरणाची बातमी संजय आठवले यांनी महाव्हाईस न्यूज मध्ये प्रकाशित केली. या बातमीमध्ये रविराज युवराज मोरे हा उल्लेख पाच वेळा करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही बातमी आणि त्यातील घटना संगती ही त्याचेच संदर्भात आहे हे ओघाने लक्षात येते. त्यावेळी हा इसम फरार झाल्याने तो फरार असल्याचे लिहिते वेळी अनावधानाने “रविराज युवराज मोरे हा फरार आहे” असे लिहिणे ऐवजी “युवराज मोरे हा फरार आहे” असे लिहिले गेले.

वास्तविक साहित्यिक भाषेत याला मुद्रण दोष असे म्हणतात. वृत्तपत्रीय क्षेत्रात असे दोष वारंवार होत असतात. बोलताना होणाऱ्या दोषास वाचा दोष म्हटले जाते. उदाहरणच द्यायचे झाल्यास अगदी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेकडूनही त्यांचे भाषणात “बेटी बचाव बेटी पढाव” ऐवजी “बेटी बचाव बेटी पटाव” असा उल्लेख झाला होता. म्हणजेच दैनंदिन व्यवहारात असे मुद्रण आणि वाचा दोष नेहमीच होत राहतात हे ध्यानात येते. परंतु याबाबत काहीही माहिती नसल्याने अपराधी रविराज मोरे ह्याची आई सौ. शोभा युवराज मोरे यांनी या बातमीमुळे आपली बदनामी झाली असून समाजात तोंड दाखवण्यासही जागा राहिलेली नाही. आमच्यावर आत्महत्येची पाळी आली आहे. संजय आठवले यांनी सुपारी घेऊन मोरे परिवाराला गावाबाहेर हाकलण्याचा डाव रचला आहे.

आम्हाला स्वसंरक्षणार्थ कायदा हातात घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशा आशयाची तक्रार आकोट पोलिसात दाखल केली. उल्लेखनीय म्हणजे रविराज युवराज मोरे ह्याला दोषी ठरवून आकोट न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची ही बातमी प्रकाशित झाल्यावर तब्बल चार महिन्यांनी ही तक्रार करण्यात आली. त्यामुळे या लोकांना या बातमीचा त्रास तब्बल चार महिन्यांनी झाल्याचे दिसून येते.

वास्तविक आपला पुत्र रविराज ह्याने शशिकांत अग्रवाल यांची फसवणूक केली नसती आणि त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली नसती तर ही बातमीच आली नसती म्हणजे ही चूकही झाली नसती आणि आपल्याला त्रासही झाला नसता हे शोभाबाई यांनी समजून घ्यायला हवे होते. परंतु कुणी काय समजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सौ. शोभा युवराज मोरे यांनी संजय आठवले यांचे विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावर झालेली चूक कबूल करणे आणि त्यावर दिलगिरी व्यक्त करणे हे सभ्यपणाचे लक्षण असल्याने संजय आठवले यांनी दिलगिरी व्यक्त केली.

त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत संजय आठवले यांनी पुराव्याखेरीज कोणतीही बातमी लिहिलेली नाही. अगदी रविराज मोरे याचेवर दाखल अनेक गुन्ह्यांची बातमीही त्यांनी सबळ पुराव्यांचे आधारे लिहिली होती. त्यांनी कुणालाही फसवून त्याची लुबाडणूक केलेली नाही. त्यांनी कोणत्याही महिलेचा अनादर करून स्वतःवर गुन्हे दाखल करवून घेतलेले नाहीत. त्यांचेवर कुठेही फसवणुकीचे खटले दाखल नाहीत. स्वतःवर असे गुन्हे दाखल असताना ते कधीही आमदार भारसाखळे यांचे कार्यक्रमात उजळ माथ्याने वावरलेले नाहीत.

निर्दोष, पीडित लोकांना न दुखावता आणि अपराध्यांना न सोडता ते सचोटीची पत्रकारिता करीत आहेत. आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या असंख्य वाचकांना हे उत्तम प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे यातील खरा प्रकार नेमका काय आहे? हे वाचकांनीच ठरवावे.


Share
Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: