Saturday, May 4, 2024
Homeराज्यआयटीआय आकोटला २४ तास अखंड विज पुरविण्यास कार्यकारी अभियंता यांचा होकार…'महाव्हाईस'च्या शिष्टाईची...

आयटीआय आकोटला २४ तास अखंड विज पुरविण्यास कार्यकारी अभियंता यांचा होकार…’महाव्हाईस’च्या शिष्टाईची फलश्रुती…

Share

आकोट – संजय आठवले

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट येथे स्थानिक महावितरण कडून कायमस्वरूपी मोफत वीज जोडणी उपलब्ध करून देणे बाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशावर सन 2016 पासून कोणतीच कार्यवाही न झाल्याने महा व्हाईसने कार्यकारी अभियंता महावितरण आकोट यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या आठ दिवसात आकोट आयटीआयला २४ तास अखंड वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. ह्या वीजपुरवठ्याने आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.

आकोट मतदार संघाचे तत्कालीन आमदार सुधाकरराव गणगणे यांचे भगीरथ प्रयत्नांनी आकोट येथे १९२० साली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली. सुरुवातीला ह्या प्रशिक्षणाचे स्थळ गव्हर्मेंट हायस्कूलच्या मागील दगडी शाळेत होते. परंतु ही जागा अनेक बाबतीत गैरसोयीची असल्याने सुधाकर गणगणे यांनी पोपटखेड मार्गावरील १९ एकर जागा अधिग्रहित करण्यात यश प्राप्त केले. त्यानंतर ह्या जुन्या आयटीआय चे १९९० साली नवीन ठिकाणी स्थानांतरण करण्यात आले.

आज रोजी ह्या ठिकाणी १४ ट्रेड व ३० युनिट कार्यरत आहेत. दरवर्षी ६२४ प्रशिक्षणार्थी येथे प्रशिक्षण घेत आहेत. अशा स्थितीत आकोट शहरातील व ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत राहावा, तसेच नियमित योग्य दाबाचा वीजपुरवठा करणे शक्य व्हावे याकरिता महावितरण आकोटला आकोट शहर व ग्रामीण भागाशी संपर्क करणारे मध्यवर्ती ठिकाण हवे होते. त्यावेळी या आयटीआय मधील जागा महावितरणला देण्याचे शासन स्तरावर ठरविण्यात आले.

त्यानुसार राज्य शासनाने दिनांक २० जून २०१६ रोजी शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार आयटीआयच्या १९ एकर जागेतील दीड एकर जागा महावितरणला देण्यात आली. त्यावर महावितरणने आपले युनिटही उभारून कार्यान्वित केले. परंतु या शासन निर्णयातील आयटीआय बाबतच्या लाभांना मात्र कानावेगळे केले गेले.

शासन निर्णयातील कलम ६ व ७ मध्ये स्पष्टपणे आदेशित केले आहे की, विज उपकेंद्र उभारणीकरिता महावितरण कंपनीला संस्थेची दीड एकर जागा देण्यात येत असल्याने महावितरण कंपनीकडून संस्थेस कायमस्वरूपी वीज जोडणी मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. संस्थेतील विद्यार्थी प्रशिक्षणार्थी यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्याकरिता व अभ्यास करण्याकरिता महावितरण ने ही वीज सुविधा मोफत उपलब्ध करून द्यावी. शासन निर्णयात असे असले तरी महावितरण ने आपले हित साधले.

परंतु आयटीआय ला शासनाने निर्देशित केलेली वीज सुविधा मात्र पुरविलीच नाही. परिणामी येथील प्रशिक्षणात मोठा अडसर निर्माण झाला. अखंड वीज सेवा नसल्याने येथील संगणक युनिट बंदच ठेवण्यात आले. त्याने प्रशिक्षणार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्याकरिता आयटीआय आकोट ने महावितरण अकोला व आकोट यांचेशी बराच पत्रव्यवहार केला. अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीही घेतल्या. मात्र या समस्येवर कोणताच इलाज केला गेला नाही.

ही माहिती मिळताच महाव्हाईसने कार्यकारी अभियंता अनिल उईके महावितरण आकोट यांच्याशी समक्ष चर्चा केली. त्यांनी ह्या शासन निर्णयाचे वाचन केले. आणि त्यावर ताबडतोब अमल करण्याची तत्परता दर्शविली. उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल यांचेशी संपर्क साधून त्यांना वीज जोडणी बाबत त्वरित कार्यवाही करण्यासही त्यांनी फार्मावले.

याबाबतचा योग्य तो प्रस्ताव व अन्य प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी सहाय्यक अभियंता अजय वसू यांचे कडे देण्यात आली. त्यानंतर ही वीज आपूर्ति येत्या आठ दिवसात सुरळीत करण्याचे आश्वासनही उईके यांनी दिले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: