Tuesday, June 18, 2024
spot_img
Homeराज्यडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

सन 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसामुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन प्रस्ताव नविन विहीर व इतर बाबीसाठी 7/12, होल्डीग, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, व बॅक पासबुक इत्यादी कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची सिंचनाची आवश्यकता विचारात घेऊन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रातर्गंत व क्षेत्राबाहेर) अंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देवून त्यांचे उत्पनात वाढ करुन जीवनमान उंचावणे व शेतकऱ्यांना स्वंयपूर्ण करण्यासाठी या योजना राबविण्यात येत आहेत.

योजनेच्या अटी व शर्ती

लाभार्थी शेतकऱ्यानी या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज विहीत नमुन्यात करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणारा लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असावा. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. अर्जदाराकडे त्यांच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे.

शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वत: च्या नावे जमीन धारणेचा सातबारा दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. अशा शेतकऱ्यांनी सबंधीत तहसीलदार यांचेकडून उत्पन्नाचा अदयावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) या दोन्ही योजनेंतर्गत लाभ दयावयाचे घटक व देय अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे राहील. नवीन विहीर 2 लाख 50 हजार रुपये. जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग- 20 हजार रुपये. पंपसंच 20 हजार रुपये, वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये.

शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण- 1 लाख रुपये. सुक्ष्म सिंचन संचात ठिबक सिंचन 50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये. परसबाग (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनु.जमातीसाठी)-500 रुपये. पीव्हीसी/एचडीपीई पाईप (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत अनु.जमातीसाठी)- 30 हजार रुपये (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजुर असलेल्या मापदंडानुसार किमतीच्या शंभर टक्के किंवा उच्चतम मर्यादा 30 हजार रुपये.) याप्रमाणे लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: