Friday, May 3, 2024
Homeराज्यहवा डॉ.अभय पाटीलांची…तरीही धाकधूक बाळासाहेब आंबेडकरांच्या खेळीची…तर पीछेहाट निश्चित अनुप धोत्रेंची…काय म्हणताहेत...

हवा डॉ.अभय पाटीलांची…तरीही धाकधूक बाळासाहेब आंबेडकरांच्या खेळीची…तर पीछेहाट निश्चित अनुप धोत्रेंची…काय म्हणताहेत जिल्ह्यातील समीकरणे?

Share

आकोट – संजय आठवले

अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार अगदी शिगेला पोहोचला असून बैठका, सभा, घरभेटी, पदयात्रा यांची पूरती रेलचेल सुरू आहे. अशा गदारोळात संपूर्ण मतदारसंघात मविआ उमेदवार अभय पाटील यांची जोरदार हवा वाहत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार पिछाडीस गेला असून प्रमुख लढतीत वंचित उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांचे नावाची जोरदार चर्चा होत आहे. मात्र मत देण्याचे दिनांकापर्यंत जिल्ह्यात कोणती समीकरणे घडतात आणि कोणती बिघडतात याकडे बारकाईने नजर ठेवून असणाऱ्यांना बाळासाहेब आंबेडकरांबाबत धाकधूक निर्माण झालेली आहे.

ढोबळ मानाने अकोला लोकसभा मतदारसंघ मराठा, कुणबी, माळी, बौद्ध, मुस्लिम आणि हिंदी भाषिक या बहुल समूहांसोबतच तेली, कोळी, धनगर, मातंग, चर्मकार, सुवर्णकार, बारी, आदिवासी हे समूह मतांवर प्रभुत्व ठेवून आहेत. परंतु उमेदवारी करिता दरवेळी मराठा, कुणबी, माळी, बौद्ध, मुस्लिम या बहुल घटकांचाच सर्व पक्षांकडून विचार केला जातो. यावेळीही तोच प्रयोग केला गेला. परंतु यावेळी होणाऱ्या प्रयोगात एक वैशिष्ट्य आहे. ते असे कि, यावेळी देशातील दोन सर्वाधिक बलाढ्य आणि प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांकडून मराठा घटकातीलच उमेदवारांना लढतीत उतरवलेले आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.

कोणत्याही एका बहुल घटकासमोर अन्य बहुल घटकातीलच उमेदवार नेहमी उभा ठाकलेला आहे. परंतु अनेक वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींनी यावेळी राज्यातील राजकारणात झपाट्याने बदल होत चाललेला आहे. परिणामी त्याचा अकोला जिल्ह्यातील राजकारणावरही मोठा प्रभाव पडला आहे. त्यातच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने यावेळी अनेक समीकरणे बिघडली. काही नवीन समीकरणे घडली. तर काही भविष्यात घडण्याची संभावना आहे. साहजिकच ह्या घडण्या – बिघडण्याचा परिणाम मतदारांवर होणार आहे. आणि त्यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.

वर्तमान स्थितीत मराठा मतदार मुख्यत्वे दोन ठिकाणी विभाजित झाला आहे. त्यातील मोठा धडा डॉ. अभय पाटील यांचे पारड्यात तर लहान भाग अनुप धोत्रे यांचे वाट्याला जाण्याची अटकळ लावली जात आहे. त्यातच बाळासाहेब आंबेडकर यांचे मराठा मतदारांशी बऱ्यापैकी सूत जुळले आहे. अनेक प्रसंगातून मराठ्यांप्रतीचा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर उघड झाला आहे. त्यांच्या पक्षात मोजक्याच का होईना पण मराठ्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांचेकरवी मराठा मतदारांना खेचण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून निश्चित केल्या जाणार आहे. असे झाले तर मराठा मतदार तीन ठिकाणी विभागणार आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे आंबेडकरांचे आघाडी संदर्भात मविआशी बोलणे सुरू होण्याचे प्रारंभीच शरद पवार यांनी ‘अकोला बाळासाहेबांकरिता सोडा’ अशी मनीषा व्यक्त केलेली होती. त्यानंतर त्यांनी या संदर्भात ‘आपण काँग्रेस श्रेष्ठींशी बोलू’ असे वक्तव्य केले होते. परंतु बाळासाहेबांचे मविआशी सूत जुळले नाही. त्यानंतर बारामती मध्ये अडचणीत आलेल्या पवार साहेबांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करून आंबेडकरांनी त्यांना मोठा दिलासा दिला. अकोला जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील झाडून सारे दिग्गज पवार साहेबांचे अनुयायी आहेत. त्यांचेच सांगण्यावरून सहकार गटाने सन १९९८-९९ मध्ये बाळासाहेबांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे आता बारामतीतील मदतीची कृतज्ञता म्हणून हा गट आंबेडकरांकडे झुकला तर मराठा घटकातून आंबेडकरांना मोठी रसद मिळू शकते.

आणखी महत्त्वाचे म्हणजे ‘आंबेडकरांकरिता अकोला सोडा’ या पवारांच्या इच्छेला मविआने मान दिला नाही. उलट काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरांबाबत बरीच ताठर भूमिका घेतली. आंबेडकरांनी ही तोच कित्ता गिरविला. परिणामी दोघांचेही अहम् ताणले जाऊन आघाडीत मिठाचा खडा पडला. आणि पटोले यांनी डॉ. अभय पाटलांची उमेदवारी खेचून आणली. त्यामुळे अकोल्याबाबत पवार साहेबांची नाराजी होणे साहजिक आहे. त्यात शरद पवार आणि नाना पटोले यांचे सूर फारसे जुळत नाहीत. या बिघडलेल्या सुरांवर सहकार गटाने ताल धरल्यास आंबेडकर मोठ्या प्रमाणात मराठा मते खेचू शकतात.

त्यानंतरची महत्त्वपूर्ण भूमिका कुणबी घटकाची ठरते. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी संजय धोत्रे यांना बोट धरून राजकारणात समोर आणले. त्यांचे नंतर धोत्रे यांनी सतत दोन दशके जिल्ह्यावर अधिराज्य गाजविले. परंतु कामाची धमक दाखवण्यात मात्र ते सपशेल नापास ठरले. त्यातच भाजपाने घराणेशाहीला मोडता घालण्याचे सुतवाच केले. परिणामी भाजपच्या उमेदवारीकरिता सर्वात बलिष्ठ दावेदार म्हणून कुणबी घटकाच्या आशा पल्लवीत झाल्या. पण भाजपाने अननुभवी धोत्रे पुत्राला उमेदवारी दिल्याने कुणबी घटक मनोमन दुखावला गेला आहे.

त्या दुखण्याची प्रचिती नारायणराव गव्हाणकर यांच्या उमेदवारी घोषित करण्यामध्ये झाली. काही लटपटी करून ते बंड शमविले गेले. परंतु कुणबी घटकाच्या मनातील सल मात्र अजूनही धारदार आहे. त्यातच आंबेडकर यांनी या घटकाला मागील व चालू काळात काही ना काही दिलेले आहे. पुढेही देऊ शकतात. त्यामुळे हा घटक आंबेडकर, पाटील व धोत्रे अशा तीन ठिकाणी विखुरण्याचे संकेत आहेत.

त्यानंतरचा तिसरा प्रभावशाली बहुल घटक आहे माळी. भाजपातील हा घटक तसा अनुप धोत्रेंबाबत नैराश्यात आहे. त्यातच मराठा आरक्षण आंदोलनाची भर पडली आहे. माळी समाजाचे मोठे नेते छगन भुजबळ यांना मराठा मोर्चाने मोठे टार्गेट केल्याने हा समाज मराठ्यांबाबत बरीच कटुता बाळगून आहे. त्यातच सन १९९१ मध्ये सुधाकरराव गणगणे आणि सन २००४ मध्ये लक्ष्मणराव तायडे या दिग्गजांना लोकसभा निवडणुकी दरम्यान मराठा मतदारांनी पूर्णतः नाकारलेले होते. ती खदखद माळी मतदारांचे मनात आजही घर करून आहे. परिणामी या घटकातील कडवे पक्षनिष्ठ परंपरेने भाजप आणि काँग्रेस कडे जातील पण तितक्याच प्रमाणात बाळासाहेब आंबेडकरांनाही या घटकांकडून मोठे सहकार्य होऊ शकते. त्यामुळे माळी हा घटकही तीन ठिकाणी विखुरण्याचे संकेत आहेत.

चौथा बहुल घटक आहे बौद्ध. हा घटक मात्र आंबेडकरांना आपल्या देवाचा नातू मानित असल्याने स्वभाविकपणे एकसंधपणे आंबेडकरांच्या पारड्यात जाणार आहे. त्यासोबतच मुस्लिम घटक भाजपाकडे जाऊ शकत नाही. परंतु गत चार दशकांपासून या घटकांनी आंबेडकरांना मात्र वेळोवेळी भरीव मदत केलेली आहे. त्यातच असदुद्दीन ओवैसी यांनी आंबेडकरांना समर्थन दिलेले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेसने एकाही मुस्लिमाला उमेदवारी न दिल्याचा भावनिक प्रचार आंबेडकर करीत आहेत. त्यामुळे परंपरागत काँग्रेस जवळ असलेली मुस्लिम मते आंबेडकर आणि अभय पाटील ह्या दोघांच्याही पारड्यात जाणार आहेत.

त्यानंतर क्रमांक येतो हिंदी भाषिक या महत्त्वपूर्ण घटकाचा. या घटकाचा कल प्रामुख्याने भाजपाकडे राहिलेला आहे. त्यामुळे या घटकातून अनुप धोत्रे यांना निश्चितपणे भरीव मदत होणार आहे. परंतु काँग्रेस आणि वंचितही या घटकाला भगदाड पाडू शकते. त्यामुळे अभय पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे पेटीतही या घटकातील मतांची भर पडणार आहे. अर्थात ही मते ही कमी अधिक प्रमाणात तीन जागी विभागली जाणार आहेत. या बहुल घटकांनंतर येणारे तेली, कोळी, धनगर, आदिवासी, न्हावी, बारी, मातंग, चर्मकार, सुवर्णकार, कुंभार या लहान लहान घटकांचाही विजयात निर्णायक वाटा राहिलेला आहे. परंतु लढतीतील उमेदवारांच्या प्रभावावर या घटकांचे गणित अवलंबून आहे.

वास्तविक या घटकांवर मोदीचे आणि हिंदुत्वाचे मोठे गारुड आहे. परंतु मागील काळात मोदीचा खोटेपणा, सुडाचे राजकारण, भ्रष्टाचाराला देत असलेले संरक्षण, त्यानंतर मागील खासदार यांचा नाकर्तेपणा, विद्यमान भाजप उमेदवाराची प्रभावहीन छवी, राज्यात फडणवीस यांनी केलेली पक्षीय तोडफोड, ते दाखवीत असलेला अहंकार यामुळे हा सामान्य परंतु समजदार मतदार ऊबगलेला आहे. त्यामुळे या घटकांना जवळ करण्याची काँग्रेस आणि वंचितकडे मोठी नामी संधी आहे. या संधीचे सोने करणाराच विजयाचा भागीदार ठरू शकतो.

या साऱ्या बदलत्या समीकरणांमुळे भाजप पिछाडीस गेल्याचे दिसत आहे. तर डॉ. अभय पाटील यांची हवा वाहत असल्याचे चित्र आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांचे ‘मिशन कामयाब’ हे अतिशय थंड डोक्याने आणि विचारपूर्वक सुरू असल्याने प्रकटपणे दिसत नसले तरी अभय पाटील यांचेसमोर हे तगडे आव्हान उभे ठाकलेले आहे.


Share
Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: