Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यदेवेंद्र फडणवीस ठरतायत भाजपच्या निवडणूक प्रचारातला हुकमी एक्का..!

देवेंद्र फडणवीस ठरतायत भाजपच्या निवडणूक प्रचारातला हुकमी एक्का..!

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये फडणवीसांचा प्रचार भाजपला फायदेशीर ठरला

मुंबई : उत्तर भारतातल्या तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपने बहारदार विजय मिळवत काँग्रेससह विरोधकांचा धुव्वा उडवला. भाजपच्या प्रचारातल्या अनेक स्टार प्रचारकांनी या प्रचारात मोलाची भूमिका बजावली असून यातल्या एका स्टार प्रचारकाचं महाराष्ट्र कनेक्शन पुढे आलंय. देवेंद्र फडणवीसांनी 4 राज्यांमध्ये मिळून 23 ठिकाणी प्रचार सभा आणि रोड-शो केले होते. यातल्या 14 ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधल्या भाजप विजय साकार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे नेते म्हणून महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे येतंय. फडणवीसांनी विधानसभा निवडणूक रणधुमाळीच्या काळात 4 राज्यांत घेतलेल्या 23 प्रचारसभा आणि रोड-शो घेतले होते. त्यांच्या या सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.

तसंच, प्रत्यक्ष प्रचारसभा आणि रोड-शोंव्यतिरक्तही याठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी स्थानिकांच्या थेट भेटी घेऊन चर्चा केल्या होत्या. याचं थेट फळ निवडणूक निकालांमध्ये भाजपला मिळालेलं दिसलं. फडणवीसांनी घेतलेल्या 23 प्रचारसभा आणि रोड-शोंपैकी 14 ठिकाणी भाजपला यश आलंय.

23 ठिकाणी प्रचार आणि 14 ठिकाणी विजय
देवेंद्र फडणवीस यांच्या 4 राज्यात सभा आणि भाजपा विजयी झालेल्या जागांची माहिती पुढे आली आहे. मध्यप्रदेशात एकूण 8 मतदारसंघात त्यांचे झंझावाती दौरे झाले. यात धार, इंदोरचे 3 मतदारसंघ, महू, बुरहाणपूर असे मतदारसंघ 6 भाजपने जिंकले. राजस्थानमध्ये फडणवीसांनी प्रचार केलेल्या एकूण 6 मतदारसंघांपैकी केसरी, नासिराबाद, अजमेर उत्तर, सांगानेर अशा 4 जागा भाजपला मिळाल्या. तर छत्तीसगढमध्ये त्यांनी प्रचार आणि रोडशो 5 मतदारसंघात केले.

यापैकी रायपूर दक्षिण, रायपूर उत्तर, रायपूर पश्चिम, रायपूर ग्रामीण इथे भाजप विजय साकार केला. तेलंगणामध्ये मात्र, 4 ठिकाणी प्रचार करूनही एकाही ठिकाणी भाजपला विजय मिळवला नाही. विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीसांचं कार्ड प्रभावीपणे चालत असल्याचं लक्षात आल्याने केंद्रीय भाजपने त्यांना पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

मतदानाचा टक्का वाढला
बिहार, गोवा राज्यांमध्ये प्रचाराची कमाल दाखवलेल्या फडणवीसांनी उत्तर भारतात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवल्याची चर्चा सध्या पक्षात सुरू आहे. त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचं पुढे येतंय.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांनी झंजावाती दौरे केले होते. 2014 साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांच्याभोवती महाराष्ट्रासह राज्याच्या राजकारणात एक वलय प्राप्त झालंय. याचा फायदा भाजपला यावेळच्या प्रचारसभांसाठीही झाला. राजकीय जाणकारांकडून आणि काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांनी योग्य ठिकाणी प्रचारासाठी जाण्याचं सुतोवाच केल्याचं समजतंय.

देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती का?
देशातल्या राजकारणात आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता पक्षातूनही तितकीच ताकद मिळतेय. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

भाजपच्या केंद्रातल्या महत्त्वाच्या बैठका – निर्णयांमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सहभागी असतात. म्हणून अलिकडेच त्यांच्या दिल्ली वाऱ्याही वाढल्याचं दिसून आलंय. मात्र, त्यांचा सगळा भर हा महाराष्ट्रावरच असून सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी महत्त्वाचे निर्णय तेच घेत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात नियमित होत असते. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारचे आधारस्तंभ असलेले फडणवीस केंद्रीय भाजपमध्येही महत्त्वाचे नेते म्हणून उदयाला येत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: