Homeव्यापार२ महिन्यांत तब्बल १३ दिवस राहतील देशातील बँका बंद… कर्मचारी टप्प्याटप्प्याने जाणार...

२ महिन्यांत तब्बल १३ दिवस राहतील देशातील बँका बंद… कर्मचारी टप्प्याटप्प्याने जाणार संपावर… १९/२० जानेवारीला देशभरात सार्वत्रिक संप…

Share

आकोट – संजय आठवले

देशभरातील विविध बँकांमध्ये कंत्राटी पद्धतीने बाहेरून कर्मचारी बोलाविण्याची पद्धत बंद करून रिक्त पदांवर कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करीत देशभरातील बँक कर्मचारी डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने संपावर जाणार असून १९ व २० जानेवारी २०२४ रोजी सार्वत्रिक संपावर जाणार आहेत. या दरम्यान बँकांचे व्यवहार प्रभावित होणार असल्याने बँक ग्राहकांनी या तारखांची माहिती घेऊन व्यवहार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत देशातील सर्वच बँकांमध्ये खालच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. महत्त्वाची कामे करणारे मनुष्यबळही झपाट्याने रोडावत चालले आहे. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सेवानिवृत्ती स्वीकारल्याने तसेच मृत्यू झाल्याने बँकांमध्ये असंख्य पदे रिक्त झालेली आहेत. सद्यस्थितीत होतही आहेत. मात्र या रिक्त पदांवरिल भरती ठप्प पडलेली आहे. त्यामुळे बँकांमधील रिक्त पदांची नियमित कामेही प्राप्त कर्मचाऱ्यांनाच करावी लागत आहेत.

त्यामुळे मनुष्यबळ कमी आणि कामे मात्र गडगंज अशी स्थिती आहे. त्या कारणाने साहजिकच या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेतले जात असले तरी अशा कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाची कामे करविल्या जात नाहीत. त्यामुळे महत्त्वाची कामे करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दोन ते तीन टेबलवरील कामे करावी लागत आहेत. यामुळे ग्राहकांनाही अतोनात त्रास होत आहे. आपल्या लहानशा कामांकरिता त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. या सोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची गोपनीयताही धोक्यात आलेली आहे.

या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून ऑल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशन (ए आय बी इ ए) ने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता कंत्राटी पद्धती बंद करून कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करणे तथा रिक्त पदांवर नियमित भरती करणे या दोन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. असोसिएशनच्या अधिसूचनेनुसार डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत विविध तारखांना संप केला जाणार आहे.

यातील प्रथम टप्प्यात ४ ते ११ डिसेंबर दरम्यान एक एका दिवशी देशभरातील काही ठराविक बँकांच्या शाखांमधील कर्मचारी संपावर जातील. तर जानेवारी २ ते ६ दरम्यान एका दिवशी ठराविक राज्यातील सर्व बँकांच्या सर्व शाखांमधील कर्मचारी संप करणार आहेत. तर तिसर्‍या टप्प्यात १९ व २० जानेवारी या दोन तारखांना देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी एकत्रितपणे संपात उतरणार आहेत.

असोसिएशनने दिनांक ४ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या या संपाचे बॅंकनिहाय वेळापत्रक तयार केलेले आहे. त्यानुसार ४ डिसेंबर- पीएनबी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, ५ डिसेंबर- बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, ६ डिसेंबर- कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ७ डिसेंबर- इंडियन बँक, युको बँक, ८ डिसेंबर युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व 11 डिसेंबरला सर्व खाजगी बँकांचा संप राहील.
यासोबतच असोसिएशनने राज्यनिहाय वेळापत्रकही तयार केले आहे. त्यानुसार-
२ जानेवारी- तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुड्डूचेरी, अंदमान निकोबार, आणि लक्षद्वीप.
३ जानेवारी- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दीव आणि दमन.
४ जानेवारी- राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड.
५ जानेवारी- दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू- काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश.
६ जानेवारी- पश्चिम बंगाल, ओडिशा बिहार झारखंड आसाम त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.
यानंतर १९ व २० जानेवारी या दोन दिवशी संपूर्ण देशातील बँक कर्मचारी सामूहिक संपावर जाणार आहेत.


Share
Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: