Sunday, May 5, 2024
Homeराज्यअकोल्याची भाकरी परतवली जाणार…मवीआ वंचितच्या सोयरीकची चर्चा…बाळासाहेबांची दावेदारी पक्की…भाजप स्थितीवर नजर ठेवून…मोका...

अकोल्याची भाकरी परतवली जाणार…मवीआ वंचितच्या सोयरीकची चर्चा…बाळासाहेबांची दावेदारी पक्की…भाजप स्थितीवर नजर ठेवून…मोका पाहून टाका मारणार…

Share

आकोट – संजय आठवले

लोकसभा निवडणूक हाकेच्या अंतरावर आलेली असतानाच बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यावरील आपली दावेदारी पक्की केली असून मविआ आणि वंचितच्या सोयरीकची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या साऱ्या स्थितीवर नजर ठेवून भाजप एकीकडे जनमत चाचणी करीत असून कोणत्या स्थितीत कोणता पत्ता टाकायचा याचा खल करीत आहे. त्यामधून यंदा अकोल्याची भाकरी परतवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

राजकीय कयासानुसार राम मंदिराचे उद्घाटन झाल्यावर कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. त्याकरिता सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षही रणनीती तयार करण्याचे कामास भिडले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघातही ही तयारी जोरात सुरू आहे. तयारीच्या या शर्यतीमध्ये वंचित आघाडीने बाजी मारली असून वंचित सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून आपली उमेदवारी सर्वप्रथम घोषित करित बाजी मारली आहे.

या घोषणे सोबत वंचितचे कार्यकर्ते त्यांना नेमून दिलेल्या मोहिमा फत्ते करण्यात गुंतले आहेत. लोकसभेनंतर लगेच विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्यावर डोळा ठेवून आपले कार्य लक्षणीय ठरावे याकरिता इच्छुक उमेदवार तन-मन-धनाने कार्यप्रवण झाले आहेत.

वंचित आघाडी वगळता अन्य पक्षात लोकसभा उमेदवारी बाबत कोणतीच निश्चिती नसल्याने तिथे इच्छुकांकडून दमाने वाटचाल सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेसमधील सर्वाधिक इच्छुक डॉ. अभय पाटील यांनी अख्ख्या मतदार संघाचा प्राथमिक दौरा आटोपला आहे. या दरम्यान त्यांनी गावोगावी आपली चमू तयार केली आहे. त्यातच काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्यास ते स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दुसरीकडे प्रशांत गावंडे हे सुद्धा सातत्याने जनतेसमोर राहण्यात प्रयत्नशील आहेत. त्याकरिता त्यांचे जनचर्चा, जनसंवाद, जनजागरण असे लोकाभिमुख उपक्रम राबविणे सुरू आहे. विशेष म्हणजे विद्यमान केंद्र सरकार नकोच अशी ठाम भूमिका स्वीकारलेल्या जिल्ह्याभरातील राजकीय लोकांची एक मोठी मोट त्यांनी बांधली आहे.

काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर हे सुद्धा लोकसभा उमेदवारी करिता इच्छुक आहेत. परंतु स्वतःची स्वतंत्र मोहीम सुरू करण्याऐवजी ते काँग्रेस पक्षाने दिलेल्या उपक्रमांचे माध्यमातून आपली वाटचाल करीत आहेत. अशा स्थितीत मविआ आणि वंचित आघाडीचे मनोमिलन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास अकोला मतदारसंघ आंबेडकरांनी घोषणा केल्यानुसार शत प्रतिशत त्यांचे वाट्यास जाणार आहे.

त्यामुळे काँग्रेसमधील हे इच्छुक खट्टू होऊन स्थितीवर नजर ठेवून आहेत. मविआ सोबत वंचितची दिलजमाई झाल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा जागा वाटपाचा गुंता निर्माण होणार आहे. आणि त्यावर वंचितसह मविआतील सर्वच घटक पक्षांमध्ये अनिश्चिततेचे सावट राहणार आहे. त्यामुळे मविआ आणि वंचित या दोन्ही आघाड्यांच्या सोयरिककडे या भाजपनेही आपली नजर रोखलेली आहे.

वर्तमान स्थितीत भाजपच्या मनात ओबीसी कार्ड प्रयोग करण्याचा मनसुबा घाटत आहे. वास्तवात वर्तमान खासदार संजय धोत्रे यांचे परिवारातून लोकसभा उमेदवार द्यावा असा सूर धोत्रेंच्या गोटातून आळविला जात आहे. त्यानुसार सौ. सुहासिनी संजय धोत्रे किंवा त्यांचा पुत्र अनुप धोत्रे यांचेकरिता विद्यमान आमदार रणधीर सावरकर आग्रही आहेत.

मात्र भाजपने ठरविलेल्या वंशवाद हटाव या नव्या धोरणामुळे आणि ओबीसी कार्ड खेळण्याचे मानसिकतेमुळे धोत्रे परिवार लोकसभा उमेदवार शर्यतीत पिछाडीस जाण्याची शक्यता आहे. या जागी भाजप श्रेष्ठी नवीन नावांचा विचार करीत असल्याची आपली खबर आहे.

या नावांमध्ये जुने जाणते भाजप नेता नारायणराव गव्हाणकर, नई उमंग नई तरंग असलेले एडवोकेट विशाल गणगणे, विद्यमान आमदार आकाश फुंडकर आणि पुनर्वसनाचे प्रतीक्षेत असलेले डॉ. रणजीत पाटील ही नावे प्रामुख्याने विचाराधीन आहेत. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे नंतर अकोला मतदारसंघात अनेक वर्षे कुणबी समाज नेतृत्वाला मुकलेला आहे.

ती उणीव नारायणराव किंवा आकाश फुंडकर यांचे माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. परंतु दुसरीकडे भाजपकडून संपूर्ण महाराष्ट्रात अद्यापपर्यंतही माळी समाजाला लोकसभा उमेदवारी दिलेलीच नाही. मात्र यावेळी भाजपने माळी समाजाची केलेली ही उपेक्षा अकोला मतदारसंघात एडवोकेट विशाल गणगणे यांचे लोकसभा उमेदवारीने भरून काढू शकते.

तिसरीकडे डॉक्टर रणजीत पाटील हे फडणवीस यांचे उजवा हात मानले जातात. गतकाळात ते मुख्य प्रवाहातून काहिसे दूर झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन होण्याकरिता त्यांचे नावाचाही विचार सुरू आहे. ही नावे चर्चेत असली तरी उमेदवारी देण्याकरिता भाजप श्रेष्ठींची नजर मविआ वंचित ऐक्यावर खिळलेली आहे.

हे ऐक्य झाल्यास किंवा न झाल्यास उद्भवलेल्या परिस्थितीनुसार भाजप आपला डाव टाकणार आहे. हे ऐक्य झाल्यास आंबेडकर लढतील तेव्हा त्यांना ओबीसी नारायणराव गव्हाणकर, एडवोकेट विशाल गणगणे हे आव्हान देतील. आणि मविआ वंचित स्वतंत्र लढल्यास त्यांना डॉक्टर रणजीत पाटील टक्कर देतील अशी मोका पाहून टाका मारण्याची योजना भाजपकडून आखली जात आहे.

त्यातच भाजपने आपल्या उमेदवारांची नावे घोषित करणेकरिता नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार पराभूत झालेल्या जागांवर भाजप येत्या वर्षाच्या सुरुवातीलाच उमेदवारांची घोषणा करून त्यांना कामास लागण्याचे आदेश देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्या ठिकाणी उमेदवारी करिता रस्सीखेच नाही ती नावे घोषित केली जाणार आहेत.

तर ज्या ठिकाणी उमेदवारीकरिता प्रचंड चढाओढ आहे तिथे अंतिम टप्प्यात उमेदवारांची नावे उघड केली जाणार आहेत. त्यामुळे अकोला मतदार संघाची वर्णी अंतिम टप्प्यात लागणार आहे. अशा ह्या शक्य अशक्यतेच्या भोवऱ्यात कोण गरगरतो आणि कोण सकुशल बाहेर पडतो हे पाहणे रोचक ठरणार आहे.

परंतु या साऱ्या घमासानामध्ये सारे काही वंचितच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यासोबतच अकोला लोकसभा मतदारसंघात भाकरी परतवली जाणार हेही नक्की झाले आहे.


Share
Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: