Saturday, May 4, 2024
Homeराजकीयआमदार खासदारांच्या विनंत्या अन् अकोटकरांचा टाहो...पालकमंत्री महोदय, जरा ऐकून घ्याल का हो?...

आमदार खासदारांच्या विनंत्या अन् अकोटकरांचा टाहो…पालकमंत्री महोदय, जरा ऐकून घ्याल का हो?…

Share

आकोट – संजय आठवले

अकोला आकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पूल खचल्याने या मार्गावरील वाहतुकीकरिता निर्धारित केलेला पर्यायी मार्ग हा अतिशय खर्चिक वेळकाढू व खडतर आहे. त्यामुळे अकोला आकोट अशी शटल रेल्वे सेवा सुरू करणे बाबत अकोला जिल्ह्याचे खासदार, अकोला पूर्व आणि आकोटचे आमदार यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. परंतु अशा विनंत्या अनेकवार केल्यावरही त्यांचा काहीच असर न झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी शिष्टाई करावी असा जनमानस आहे.

यंदा कधी नव्हे इतका निसर्ग राजा कोपला. पूर्णा मायनेही रौद्ररूप धारण केले. त्याने गांधीग्राम चा पूल जमिनीत धसला. परिणामी हा पूल वाहतुकीस बंद झाला. अख्खा आकोट तालुका व निम्मा अकोला तालुका अडचणीत आला. कधीतरी होऊ घातलेले हे अघटीत आज झाले. परंतु जानमालाची कोणतीही हानी न होता झाले, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पण ह्या समाधानावर कुरघोडी करणाऱ्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्याकरिता गरज आहे थेट कार्यवाहीची.

बाधित रयतेला दिलासा देण्याची. मुख्य अडचण निस्तरेपर्यंत अन्य सारे पर्याय खुले करण्याची. आज रोजी प्रशासनाने पूर्णा नदीच्या आकोटकडील भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग निर्धारित केला आहे. परंतु हा मार्ग लांबचा असल्याने खर्चिक आहे. मुक्कामावर पोहोचण्यास वेळ घेणारा आहे. अशा स्थितीत अकोला आकोट शटल रेल्वे सेवा हा उत्तम पर्याय आहे. अकोला ते आकोट पर्यंत या मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी या मार्गाने रेल्वेची धाव चाचणीही घेण्यात आली आहे.

ती यशस्वी झाल्याचा निर्वाळा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीही दिलेला आहे. त्यामुळे अकोला आकोट शटल रेल्वे सेवा सुरू होण्यास कोणताही अडचण नाही. गत दोन वर्षापासून अकोटकर ही सेवा सुरू करण्याकरिता आग्रही आहेत. मध्यंतरी या शटल सेवेची समयसारणीही तयार करण्यात आली होती. ती रेल्वेच्या पोर्टलवर झळकलीही होती. परंतु मध्येच कुठेतरी माशी शिंकली आणि ती समयसारणी गुंडाळली गेली. वास्तविक आकोट हा मोठा तालुका आहे.

येथील व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, व्यावसायिक तथा अन्य प्रवासी मोठ्या प्रमाणात अकोला येथे जा करतात. त्यामुळे ही शटल रेल्वे सेवा सुरू होण्यास काही हरकत नाही. आता तर भूमार्ग बंद झाल्याने ही शटल रेल्वे सेवा आकोटकरांची निकड बनली आहे. तरीही ही सेवा सुरू होत नाही. हे मग्रूर लालफितेशाहीचे प्रतीक आहे.

आता ह्या लालफितेशाहीच्या मग्रुरीला मुसके बांधण्याकरिता अकोलाचे खासदार संजय धोत्रे, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे हे मान्यवर पुढे सरसावले आहेत. या तिघांनीही रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंना ही सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. अख्खा आकोट तालुका आणि निम्मा अकोला तालुका यांचा गुदमर बघता आमदार खासदारांची ही मागणी मान्य होणे अतिशय अनिवार्य आहे.

वास्तविक गत दोन वर्षांपासून ही विनंती सातत्याने नामदार दानवेंकडे केली जात आहे. परंतु त्यावर दखल मात्र घेतली जात नाही. “काहीही मागणी करतात साले” असे म्हणून विषय कानावेगळा करण्याचा नामदार दानवे यांचा स्वभाव आहे. मात्र आता त्यावर अकोला जिल्ह्यात एक हुकमी इलाज आहे. तो इलाज म्हणजे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी धोत्रे, सावरकर, भारसाकळे या त्रयीच्या विनंत्या अन् आकोटकरांचा टाहो नामदार दानवेंच्या कानी घालणे गरजेचे आहे.

त्यांच्याकडून मागोवा घेतला गेल्यास ही शटल रेल्वे सेवा त्वरित सुरू होऊ शकते. यासोबतच हे प्रकरण धसास लावणारा दुसरा हुकमी इलाज खुद्द आकोटातच आहे. तो इलाज म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला जिल्हा प्रमुख मोहनराव आसरकर. वास्तविक संघाची मंडळी राजकारणात हस्तक्षेप करीत नाही. परंतु अकोला आकोट रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रश्न राजकीय नाही. तो सामाजिक आहे. लोकांना दिलासा देण्याचा आहे.

त्यामुळे मोहनराव आसरकर यासंदर्भात शब्द टाकू शकतात. थेट रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांना गळ घालू शकतात. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात यशस्वी प्रयत्न करावेत अशी अनेक सुजाण व विचारवंत आकोटकरांची मागणी आहे. या साऱ्या बाजूंचा साकल्याने विचार करता, आमदार खासदारांच्या विनंत्या व आकोटकरांचा टाहो पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री दानवेंच्या कानी घालून अकोला आकोट ही शटल रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरीत आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: