Friday, May 17, 2024
Homeराज्यकृत्रिम हौदांचा पांढरा हत्ती…श्रीगणेशाच्या विटंबनेचा अघोरी प्रकार थांबवा..!

कृत्रिम हौदांचा पांढरा हत्ती…श्रीगणेशाच्या विटंबनेचा अघोरी प्रकार थांबवा..!

Share

‘गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, रंगपंचमी या सण-उत्सवांच्या वेळी प्रदूषण होते’ अशी एक धारणा जाणीवपूर्वक समाजात निर्माण करण्यात आली आहे. याच्याशी आपले निधर्मी शासन आणि प्रशासनही १०० टक्के सहमत आहे. हे त्यांच्या वर्षभर राबवण्यात येणार्‍या मोहिमा, जागृती अभियान, विविध अहवालांचे प्रकाशन, विविध कृती कार्यक्रम यांतून स्पष्ट होते.

तर दुसरीकडे बकरी ईदच्या वेळी होणारी लाखो प्राण्यांची कत्तल असो, ताबूतांचे विसर्जन असो, मशिदींवरील वाजणारे भोंगे असोत, राज्यभरातील अनेक पशुवधगृहातून होणारो प्राण्यांची कत्तल असो वा ख्रिस्ती नववर्षांनिमित्त होणारी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजीद्वारे केलेले सेलेब्रेशन असो, यांच्यामुळे प्रदूषण होत नाही किंवा किंबहुना या दृष्टीने या धार्मिक सण-उत्सवांकडे पाहिलेच जात नाही.

त्यामुळे त्याविषयी कोणीच चकार शब्द काढत नाही, हे दुर्दैवी आहे. या लेखातून अशीच काही महत्वाची सूत्रे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून वाचकांनी बोध घेऊन योग्य अयोग्य याचे चिंतन करावे.

गणेशोत्सव आल्यावर ‘गणपती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते’ अशी खोटी माहिती देऊन समाजाची दिशाभूल करून गेली काही वर्षे कृत्रिम हौदाची संकल्पना संपूर्ण राज्यात कमी अधिक प्रमाणात राबवली जात आहे.

१. प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती प्रदूषणकारी नाहीत !

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या (पी.ओ.पी.च्या) गणेशमूर्तींमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, असे अनेक वैज्ञानिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिप्सम नावाच्या खडकातील पाण्याचा अंश बाहेर काढला की, त्याची जी पावडर बनते, त्याला ‘प्लॉस्टर ऑफ पॅरिस’ किंवा ‘कॅल्शियम सल्फेट’ म्हणतात. हा पदार्थ अल्कली नाही, तसेच ॲसिडिकही नाही, तर तो न्युट्रल आहे. तो औषधातही वापरला जातो.

एवढेच नव्हे, तर पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतही त्याचा वापर होतो. पी.ओ.पी. संथ पाण्यात विरघळायला दीड ते दोन महिने लागतात. नदीच्या पाण्यात सात ते आठ दिवसांत तो विरघळतो. विरघळल्यावर त्याची मातीच बनते. ती माती वाळवल्यावर त्याला पुन्हा घट्टपणा वा चिकटपणा रहात नाही. त्यामुळे ‘पीओपी’मुळे पाण्याचे झरे बंद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ही वैज्ञानिक तथा शास्त्रीय माहिती अनेक संकेतस्थळांवर, तसेच गुगल केमिस्ट्रवरही पाहू शकतो.

२. गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण अत्यंत नगण्य; त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही !

महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका, २३८ नगरपालिका, १३१ नगर पंचायती, ७ कटक मंडळे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) द्वारे ५० टक्क्यांहून अधिक मैला, घनकचरा थेट नदी वा नैसर्गिक जलस्त्रोतात सोडला जातो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार वर्ष २०२०-२१ मध्ये महाराष्ट्रात प्रतिदिन निर्माण होणार्‍या २२ हजार ६३२ टन घनकचर्‍यापैकी केवळ १५ हजार टन घनकचर्‍यावर प्रक्रिया केली जाते अर्थात् जवळजवळ दररोज ८ हजार टन अत्यंत प्रदूषणकारी घनकचरा कुठलीही प्रक्रिया न करता नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडला जातो. त्यातून किती भयंकर प्रदूषण होत असेल, याची कल्पनाही करता येत नाही.

हे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘‘सांडपाणी व्यवस्थापन व नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक वर्षी एकूण भांडवली खर्चापैकी २५ टक्के तरतूद करून या प्रकल्पावर खर्च करण्यास सांगितले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही, हे वरील प्रदूषणावरून दिसून येते. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याची पूर्तता केलेली नसल्याचे प्रदूषण मंडळाचेही म्हणणे आहे.

त्या तुलनेत वर्षातून एकदा येणार्‍या सर्व गणेशमूर्तींचे मिळून वजन निश्चितच अत्यंत म्हणजे अत्यंत कमी असेल. तरी शासनाची उपाययोजना म्हणजे ‘नान्हीला बोळा अन् दरवाजा उघडा’, अशी झाली आहे. थोडक्यात गणेशमूर्ती विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतात जाणारी माती आणि रंग अत्यंत नगण्य असून त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.

या मूर्तींवरील रासायनिक रंगांमुळे जे अत्यल्प प्रदूषण होते, ते थांबवण्यासाठी शासनाने रासायनिक रंगांच्या जागी नैसर्गिक रंगांनी मूर्ती रंगवण्याची सक्ती केल्यास तेही थांबू शकेल. वर्ष २००८ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी म्हटले होते, ‘‘गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण वगैरे काही होत नाही आणि होत असले, तरी ते अगदी नगण्य आहे.’’

३. कृत्रिम हौदाबाबत काही वर्षांपूर्वी विविध महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्था यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली असता पुढील माहिती समोर आली होती.

अ. कृत्रिम हौदातील गणेमूर्तींचे विसर्जन पुन्हा नैसर्गिक जलस्रोतातच; मग कृत्रिम हौदाचा पांढरा हत्ती कशासाठी? : गणेशमूर्ती कृत्रिम हौदात पूर्णपणे विरघळत नसल्याने त्याचे पुनर्विसर्जन करावेच लागते. हे करतांना ज्या समुद्र, नदी वा नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्यावर प्रतिबंध घातला जातो,

मात्र कृत्रिम हौदा विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे रात्रीच्या वेळी समुद्र, नदी वा नैसर्गिक जलस्त्रोतातच गुपचुप विसर्जन केले जाते, असे अनेकदा उघड झाले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनीही याचा वारंवार छायाचित्रांसह भांडाफोड केला आहे. जर शासनाने याची वस्तुनिष्ठ माहिती घेतली तर याचे भीषण सत्य समोर येईल.

जर नदी, तलाव, समुद्र, खाणी वा नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करायचे, तर कृत्रिम हौदाचा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ? जनतेच्या डोळ्या ही धुळफेक कशासाठी ? शेवटी प्रशासन जे तथाकथित प्रदूषण टाळू इच्छित होते. ते प्रदूषण असल्या फसव्या कृतींमुळे एक टक्कादेखील कमी झालेले नाही. उलट जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे.

हे पैसे संबंधित महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्याकडून सव्याज वसूल केले पाहिजेत. दरवर्षी कृत्रिम हौदासाठी लाखो ते कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. दरवर्षी कृत्रिम हौदांची संख्या वाढतच आहे.

त्यासाठी जाहिराती, पत्रके, पोस्टर्सबाजी याचा खर्च वेगळा ! एवढेच नव्हे, तर यासाठी दिली जाणारी कंत्राटे. यातून जनतेच्या पैशाचा अपव्यय होत नाही का ? याचा शासनाने वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून हे अशास्त्रीय कृत्रिम हौद कायमचे बंद करायला हवेत.

आ. घनकचरा विभागाच्या गाड्यांतून श्रीगणेशमूर्तींच्या वाहतुकीतून होणारी श्रीगणेशाची घोर विटंबना ! : कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या गणेशमूर्त्यांची वाहतूक काही महापालिका आणि नगरपालिका या घनकचरा विभागाच्या डंपरमधून, ट्रॅक्टरमधून मिळेल त्या प्रकारच्या ट्र्क अथवा तत्सम वाहनातून करीत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या कृती करणे हे महापाप असून हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावणारे आहे. तरी अशा प्रकारे होणारी भगवान श्रीगणेशाची घोर विटंबना शासनाने तातडीने थांबवायला हवी.

इ. कृत्रिम हौदातील गणेमूर्तींचे पुनर्विसर्जन करतांना होणारी विटंबना थांबवा ! : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या गणेशमूर्त्यांच्या पुनर्विसर्जनासाठी शासनाची कोणताही ठोस कार्यपद्धती वा धोरण ठरलेले नाही. परिणामी कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणावर विटंबना होत आहे. यात कुठल्याही प्रकारे गणेशमूर्तीचे पावित्र्य राखले जात नाही.

कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती काढण्यासाठी जेव्हा शासकीय कर्मचारी त्यात उतरतात, तेव्हा त्यांच्या पायाखाली अनेक गणेशमूर्ती येऊन त्याचे हात-पाय भंग होऊन त्यांची विटंबना होते. हे अत्यंत गंभीर असून हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावणारे आहे. तसेच कृत्रिम हौदात विसर्जित गणेशमूर्ती दगडांच्या खाणीमध्ये पुनर्विसर्जन करण्याची वा मूर्तींचा चुरा करण्याची वा मातीत गाडण्याच्या ज्या अघोरी व अनिष्टकारी संकल्पना होत्या, त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळे त्या योजना बारगळल्या आहेत.

आता तर अजून नवीन नवीन पर्याय काढले जात असून काही ठिकाणी मूर्तींचा पुनर्वापर करता यावा यादृष्टीने प्रशासन नियोजन करते असे प्रसिद्धीमाध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तामधून लक्ष्यात येते. एकूणच गणेशमूर्तींचे पावित्र्य राखणे आणि नागरिकांच्या धर्मभावना न दुखावता हे सर्व करणे आवश्यक आहे.

४. विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींतील चैतन्य सर्वदूर पसरून समाजाला चैतन्य मिळते !

हौदातून गणेशमूर्ती काढतांना त्यांचे पावित्र्य राखले जात नाही, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, काही अधार्मिक आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी असे ‘तत्त्वज्ञान’ मांडतात की, गणेशमूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना केली की, प्राण येतात आणि उत्तरपूजा झाल्यावर प्राण निघून जातात. त्यामुळे ती मातीच रहाते. तिचे काही केले तरी चालते.

धर्म न मानणारी, देवतांचे अस्तित्त्व, मंत्रांचे सामर्थ्य न मानणारी माणसे ‘प्राणप्रतिष्ठापना’ आणि ‘प्राण निघून जाणे’ या संकल्पना येथे मात्र मान्य करतात. कोट्यवधी गणेशभक्तांसाठी वा सामान्य माणसासाठी गणपती विसर्जन झाल्यावरही साक्षात् प्राणप्रिय भगवंत, परमेश्वरच असतो. म्हणूनच विसर्जनानंतर गणेशमूर्तीची थोडीशी माती घरी आणून लोक तिचा पूजा-आरती करतात. ती माती पवित्र समजून कपाळाला लावतात.

तसेच घरात लावलेले देवीदेवता, राष्ट्रपुरूष वा पूर्वज यांचे फोटो प्राणप्रतिष्ठा केलेले नाहीत म्हणून ते आपण पायाखाली तुडवतो का? याचा विचार झाला पाहिजे. उद्या महापालिका आयुक्त, महापौर वा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोणी मातीचे ढेकूळ दिले, तर निश्चितपणे खिडकीतून खाली फेकून दाखवू शकतील; परंतु त्यांना प्राणप्रतिष्ठा पना केलेली वा उत्तरपूजा केलेली गणेशमूर्ती आणून दिली तर ते खिडकीतून खाली फेकू शकतील का?

त्या मूर्तीचे हात-पाय तोडणे, फोडणे, मातीत टाकणे, पायाखाली घेणे हे त्यांना शक्य आहे का? याचा शासन आणि लोकप्रतिनिधींनी विचार करणे गरजेचे आहे. धर्मशास्त्रात वाहत्या पाण्यात मूर्तीविसर्जनामुळे मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पसरते, याचा समाजाला लाभ होतो, असे सांगितले आहे. ही धार्मिक कृती असल्याने ती धर्मशास्त्रानुसार करणे, हे क्रमप्राप्त आहे. त्यात पालट करायचा असेल, तर तो धर्मशास्त्रातील तज्ञ अधिकारी व्यक्तीच (उदा. शंकराचार्य) सांगू शकतात.

५. गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला अनेक पर्यावरणवादी आणि प्रशासनयांचा विरोध : गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला अनेक पर्यावरणवादी आणि प्रशासन हे विरोध करतात. तसेच अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे.

६. फिरत्या हौदांची नवीन संकल्पना उदयास येणे हा धर्मश्रद्धांवर आघातच !: कोरोना महामारीच्या काळात त्याचे कारण देत बहुतेक सर्व ठिकाणचे विसर्जन घाट पूर्णपणे बंद करण्यात आले होते त्यातून एक नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे फिरते हौद.

सध्या तोच प्रकार पुढे सुरु असून संपूर्ण शहरात ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर यामध्ये टाक्या ठेवून ही वाहने शहरातून फिरविणे आणि भाविकांना यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास सांगणे. विसर्जन घाट बंद करून फिरते हौद करणे यातून कंत्राटदारांची मौज मजा झाली आहे.

या माध्यमातून जमविलेल्या मूर्तींचे नेमके काय केले जाते हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. विसर्जनाच्या नंतर मात्र मूर्तींची संख्या आणि कोणत्या खाणीत विसर्जन केले अश्या बातम्या येतात एवढेच काय ते लक्ष्यात येते. अश्या माध्यमातूनही धर्मश्रद्धा या पायदळी तुडविल्या जात आहेत हे भक्तांनी लक्ष्यात घ्यायला हवे.

हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत आणि धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन हे वाहत्या पाण्यात करण्यासाठी गणेशभक्तांना आठकाठी आणू नये. तसेच शासनाने अशास्त्रीय कृत्रिम हौदातील ही अघोरी प्रथा तत्काळ बंद करावी. मूर्तीदान स्वीकारण्याचा प्रशासन वा अंनिसवाले कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे मूर्तीदानाची पद्धत बंद व्हायला हवी.

अतिशय महत्वाचे म्हणजे गणेशमूर्ती विसर्जनाविषयी वर्ष २०१० च्या ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या सूचनेनुसार ‘‘गणेशमूर्ती विसर्जनासाठी जलाशयामध्ये वा तळ्यामध्ये एका कोपर्‍याला लोखंडी तारेच्या जाळीने बांधलेली दगडी भिंत तयार करून त्या ठिकाणी गणेशभक्तांना गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी पर्याय करून देऊ शकतो. अशा प्रकारे स्तुत्य उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका गेली अनेक वर्षे राबवत आहे.

हा तलाव वर्षानुवर्षे टीकतो. यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय पण होणार नाही. तसेच रासायनिक रंग, अविघटनशील पदार्थ यांऐवजी पारंपारिक शाडूची माती, नैसर्गिक रंग यांपासून बनवलेल्या गणेशमूर्तीला शासनाने आतापासूनच प्रोत्साहन द्यावे. हे करण्यासाठी बुद्धीदाता श्रीगणरायाने शासनाला सुबुद्धी द्यावी, हीच त्याच्या चरणी प्रार्थना! श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: