Homeराज्य….आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर…आकोट न्यायालयाचा आदेश…

….आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर…आकोट न्यायालयाचा आदेश…

Share

आकोट – संजय आठवले

तब्बल सव्वा लाखाची लाच स्वीकारल्यानंतर अटक करण्यास आलेले अधिकाऱ्यांचे अंगावर वाहन नेऊन स्वीकारलेल्या लाचेसह घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या आरोपी पोलीस अधिकाऱ्यास आकोट न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

त्यामुळे या प्रकरणातील याप्रकरणी लाच प्रतिबंधक विभाग अमरावती यांची मोठी नाचक्की झाली असून त्यांचे चांगलेच हसे झाले आहे. या प्रकरणाची शहरात सर्वत्र चर्चा असून लाच प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांच्या ह्या निष्काळजी वर्तनावरून अनेक तर्क काढले जात आहेत.

घटनेची हकीगत अशी आहे कि, तक्रारदार रवींद्र राधाकिसन कासट रा. नर्सिंग कॉलनी आकोट यांनी लाच प्रतिबंधक विभाग अमरावती यांचे कार्यालयात दि. ५.४.२०२४ रोजी समक्ष हजर राहून तोंडी तक्रार दिली कि, तक्रारदार आणि त्याची पत्नी सौ. संगीता या दोघांचे विरुद्ध आकोट शहर पोलीस स्टेशन येथे सावकारी कायद्यानुसार अपराध दर्ज आहे.

त्याप्रकरणी न्यायालयात कमजोर चार्जशिट पाठविणे आणि अटकपूर्व जामीन मंजूर होईपर्यंत त्यांना अटक न करणे याकरिता राहुल सुरेशराव देवकर सहा. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आकोट शहर यांनी दीड लक्ष रुपये लाचेची मागणी केली आहे.

त्यावर लाच प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी दि.६.४.२०२४ रोजी या संबंधाने पडताळणी केली. त्यानिमित्त्याने तक्रारदार व पंच हे दर्यापूर मार्गा निकटच्या कोल्हे हॉस्पिटल नजीक गेले. त्या ठिकाणी केलेल्या पडताळणीत राहुल देवकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून देवकर यांचेवर सापळा कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.

त्यानुसार त्याच ठिकाणी सापळा लावण्यात आला. त्यावेळी देवकर यांनी आपल्या लाल रंगाचे चार चाकी वाहन क्रमांक एम एच २४ डी इ ४२५५ यात बसूनच या कामाबाबत चर्चा केली. चर्चेत तडजोड झाल्याने देवकर यांनी सवा लाख रुपये लाच स्वीकारली.

त्यानंतर त्यांनी आपले वाहन सुरू केले. त्यावेळी मोहीम फत्ते झाल्याचा इशारा तक्रारदाराने केला. त्यावर लाच प्रतिबंधक पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुढे होऊन देवकर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्यावर लाच प्रतिबंधक कारवाई झाल्याचे देवकर यांचे ध्यानात आले. हे ध्यानात येतात त्यांनी आपले वाहन न रोखता ते भरधाव वेगाने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे अंगावर घातले.

ते पाहून पथक अधिकारी केतन मांजरे पोलीस निरीक्षक लाच प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी देवकर यांना वाहन थांबविण्याचा इशारा केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून देवकर यांनी आपले वाहन सरळ पथकाचे अंगावर घातले. त्यावेळी केतन मांजरे यांनी बाजूला उडी घेतल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर लाचेची रक्कम आणि वाहन घेऊन देवकर दर्यापूरच्या दिशेने भरधावनिघून गेले.

या घटनेने क्षणभर भांबावलेल्या पथकाने भानावर येऊन देवकर यांचा पाठलाग केला. परंतु बऱ्याच लांबपर्यंतच्या परिसरातही देवकर पथकाला आढळून आले नाहीत. म्हणून पथकाने आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देवकर यांचे विरोधात लाच घेणेप्रकरणी गुन्हा दाखल केला.

त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे दि. १०.४.२०२४ रोजी देवकर यांनी अटकपूर्व जामीनाकरिता आकोट जिल्हा व सत्र न्यायालय येथे याचिका दाखल केली. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांचे न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली. त्यावेळी सरकार पक्षाचे वतीने देवकर यांचे अटकपूर्व जामीनास कडाडून विरोध करण्यात आला.

सरकार पक्षाने युक्तिवाद केला कि, राहुल देवकर यांनी रवींद्र कासट याचे कडून सवा लक्ष रुपयांची लाच स्वीकारली आहे. त्या अनुषंगाने आकोट शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेची ही रक्कम जप्त करावयाची आहे. ही रक्कम घेऊन पळून जाणेकरिता देवकर यांनी वापरलेले वाहनही जप्त करावयाचे आहे. त्यांचे आवाजाचे नमुने घ्यावयाचे आहेत.

देवकर यांनी तक्रारदाराचे नातेवाईकांना फोन द्वारे धमकावून लाच मागितली असल्याने त्याबाबतही तपास करावयाचा आहे. आरोपीस जामीन मिळाल्यास ते पंच आणि तक्रारदार यांचेवर दबाव आणू शकतात. तसेच तपासात हस्तक्षेप करू शकतात. भ्रष्टाचार करून देवकर यांनी आणखी काही धनसंचय केला का? याचाही तपास करावयाचा आहे. त्यामुळे राहुल देवकर यांना अटकपूर्व जामीन देऊ नये.

यावर आरोपीचे वकील ॲड. हातेकर आणि ॲड. मनोज वर्मा यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद मुळातून खोडून काढला. आपले युक्तिवादात या वकीलद्वयांनी मांडले कि, राहुल देवकर यांनी लाच स्वीकारलेलीच नाही. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे लाच प्रतिबंधक विभागाने दि.६.४.२०२४ रोजी लावलेल्या अगोदरचे दिवशी हाच ट्रॅप लावण्यात आला होता.

परंतु तो प्रयत्न फसला होता. त्यामुळे चिडून लाच प्रतिबंधक विभागाने हा ट्रॅप लावल्याचे कुभांड रचले आहे. कारण आदल्या दिवशी आपलेवर ट्रॅप लावला हे कळल्यावर दुसरेच दिवशी सतर्क असलेल्या देवकर यांनी लाच स्वीकारणे शक्यच नाही.

दुसरे म्हणजे ‘देवकर हे पळून जात आहेत, त्यांना रोखा’ अशा आशयाची कोणतीही सूचना लाच प्रतिबंध विभागाने दर्यापूर व अन्य मार्गावरील एकाही पोलीस ठाण्यास दिली नाही. वास्तविक असे करणे अनिवार्य होते सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ट्रॅप चे वेळी संबंधिताशी लेन देन करतेवेळी तक्रारकर्त्याची अंगझडती घेणे अनिवार्य आहे.

त्याचे जवळ काय काय चीज वस्तू आहेत त्याचा पंचनामा करावा लागतो. सापळा सफल झाल्यावरही हीच प्रक्रिया करावी लागते. तक्रारदार बोलणी करण्यास जातेवेळी केलेल्या मूळ पंचनाम्यात नमूद बाबींपैकी सापळा सफल झाल्यावर लाच स्वीकारणारास दिलेली रक्कमच केवळ दुसऱ्या पंचनामात कमी होऊ शकते.

परंतु या प्रकरणात तक्रारदाराची अशी दोनदा अंगझडती घेण्यात आलेले नाही. यावरून आरोपीचे वकील ॲड. हातेकर व ॲड. मनोज वर्मा यांनी हा ट्रॅप नसून हे रचलेले कारस्थान असल्याचा युक्तिवाद केला. हे दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी याप्रकरणी राहुल देवकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.


Share
Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: