Homeगुन्हेगारीआकोट तहसीलदारांना ग्रासले शहरी जमीन अकृषिक करण्याच्या दुर्धर व्याधीने…चक्क जीवन प्राधिकरणची जागाच...

आकोट तहसीलदारांना ग्रासले शहरी जमीन अकृषिक करण्याच्या दुर्धर व्याधीने…चक्क जीवन प्राधिकरणची जागाच अकृषिक केली…या अवैध अकृषिकीकरणाने नागरिकांची प्रचंड फसवणूक….

Share

आकोट संजय आठवले

आकोट शहरात शेतजमिनी अकृषीक करून त्यातील भूखंड विक्रीचे धंद्याने कमालीचा जोर पकडला असून अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आकोट तहसीलदार शहरी हद्दीतील शेत जमिनी अकृषिक करीत असल्याने यातील भूखंड खरेदीदारांची प्रचंड फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. पैशांच्या हव्यासापोटी या तहसीलदारांनी चक्क जीवन प्राधिकरणचे भूखंड अकृषीक केल्याने तर त्यांनी नागरिकांना फसविण्याचे जाळेच निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात अनेक लोकांनी विविध ठिकाणी दाद मागितलेली आहे. परंतु तहसीलचे प्रांगणात कायद्याला सुळावर टांगून बेकायदेशीर कृत्य करीत चौखूर उधळलेला आकोट तहसीलदारांचा वारू कोणासही आवरेनासा झाला आहे. तहसीलदारांच्या या बेताल वागण्याने नगर रचनाही धोक्यात येऊ लागली आहे.

गत अनेक वर्षांपासून आकोट शहरात शेतजमिनी अक्रूषिक करून त्यातील भूखंड विक्रीचा धंदा सुखनैव सुरू आहे. परंतु सद्यस्थितीत या धंद्याने कमालीची उसळी घेतल्याचे जाणवत आहे. आकोट तहसीलदार निलेश मडके यांचे बेताल वागण्यानेच ही उसळी घेतली असून त्यांचेच कृपाप्रसादाने ह्या धंद्याला चार चांद लागलेले आहेत. त्यांनी अकृषिक केलेल्या आकोट बोर्डी मार्गालगतच्या आकोट भाग १, गट क्र. ३७/१, ४५/१, ४५/२, ४७/३ या शहरी हद्दीतील जमिनीची प्रकरणे प्रचंड गाजत असतानाच आता आकोट भाग २ मधील गट क्रमांक ६८५/२ चे प्रकरण ऐरणीवर आले आहे. ही शेतजमीनही शहरी हद्दीत आहे. या शेतजमिनीची अकृषिक करण्यापूर्वी कोणतीही मोजणी करण्यात आलेली नाही. सक्षम अधिकाऱ्याकडून अभिन्यास मंजूर करून घेतलेला नाही. कोणत्याही शासकीय कार्यालयाचे अभिप्राय मागविलेले नाहीत. पालिका नगर रचना विभागाचे मतही विचारात घेतलेले नाही. जराशीही खुली जागा (ओपन स्पेस) सोडलेली नाही. केवळ अकृषिक धारकाने आणलेला साध्या कागदावरील अभिन्यास मंजूर करून ह्या प्रकरणास तहसीलदार आकोट यांनी मान्यता दिली आहे.
धक्कादायक म्हणजे ईतक्या नियम बंधनांचा कडेलोट करूनच तहसीलदार थांबले नाहीत. तर ह्या अकृषिक प्रकरणात त्यांनी चक्क जीवन प्राधिकरण विभागाचे मालकीची तब्बल १९ गुंठे जागा अकृषीक धारकाचे नावे अकृषिक करून दिली आहे.

जीवन प्राधिकरण विभागाने g/L. AD case No/47/ 75-76 भूमी संपादन नियम १६-१७ अन्वये ही १९ गुंठे जागा तिचा मुआवजा देऊन खरेदी केली होती. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाचा फेरफार घेऊन सातबारावर नोंद करणेकरिता तत्कालीन तहसीलदार यांनी दिनांक १५.५.२००१ रोजी आदेश पारित केला होता. त्या आदेशाचे आधारे या १९ गुंठ्यांची नोंद जीवन प्राधिकरणचे नावे झालेली होती.

असे असल्यावरही आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन विद्यमान तहसीलदार निलेश मडके यांनी जीवन प्राधिकरणची ही १९ गुंठे जमीन सदर अकृषिक धारकाचे नावे चढविण्याचा प्रताप केला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे या अकृषिक धारकाने हे भूखंड विकूनही टाकले आहेत. चिंतेची बाब म्हणजे ही खरेदी घेणार्‍या ग्राहकाने हात मजुरी करून व पाई पाई गोळा करून हा सौदा घेतला आहे. भविष्यात जीवन प्राधिकरणची कुंभकर्णी झोप उडाल्यावर या विभागाने आपल्या जमिनीचा शोध घेतला, तर ह्या रहमत खानचे उध्वस्त होणे ही काळ्या पाषाणावरील पांढरी रेषा आहे. अकृषिकधारक भूखंड विकून मोकळा होईल. निलेश मडके ही बदलून जातील. पुढे पदोन्नतही होतील. पण घर उध्वस्त झालेला रहमत खान मात्र चिल्या पिल्ल्यांसह उघड्यावर येईल. आणि तेव्हा त्याचा वाली कुणीच नसणार हेही नक्की. अशा हात मजुरी करणाऱ्या कैकांनी आपली जमापुंजी लावून हे भूखंड खरेदी केले आहेत. त्यामुळे कायद्याला बळी देण्यासोबतच तहसीलदार मडके यांनी अनेक मानवी जीवने बेचीराख करण्याचा विडा उचलला की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हेच सामाजिक भान ठेवून एका सामाजिक कार्यकर्त्यांने या प्रकरणाची तक्रार थेट जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचेकडे केल्याची माहिती आहे. त्या संदर्भात सुनावणीही सुरू झालेली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाने बाधित झालेल्या एडवोकेट मनोज वर्मा यांनी आकोट न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यांनी या अकृषिकीकरणाने स्वतःला झालेल्या पिडेबाबत न्यायालयात न्याय मागितलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या प्रकरणात जीवन प्राधिकरणचे आकोट उपविभागीय अधिकारी गजानन जनार्दन खराटे यांना प्रतिवादी केलेले आहे. त्यांनी या संदर्भात न्यायालयात आपले म्हणणे सादर केलेले आहे. जीवन प्राधिकरणाने सन १९७५-७६ मध्ये शहराला पेयजल पुरवठा करणेकरिता बोअरवेल तसेच रस्त्याकरिता एकूण १९ गुंठे जागा संपादित केली होती. या ठिकाणी कूपनलिका तयार करण्यात आली होती. तिथेच विद्युत पॅनल बोर्ड, काँक्रीटचा ओटा, चौफेर लोखंडी अँगलसह तारेचे कुंपण करण्यात आले होते. परंतु वान प्रकल्पाचे पाणी सुरू झाल्याने येथील संयंत्रे काढून घेतली गेली. मात्र कूपनलिका, लोखंडी अँगलसह चौफेर कुंपण, कुपनलिकेचे केसिंग व पाईप तिथेच ठेवण्यात आलेत.

परंतु आता हे सारे नेस्तनाबूत करून टाकण्यात आले आहे. असे गजानन खराटे यांनी न्यायालयास कळविले आहे.
यावरून आकोट तहसीलदार निलेश मडके यांना आकोट शहराच्या हद्दीतील शेतजमीनी अकृषिक करण्याच्या दुर्धर व्याधीने ग्रासले असल्याचे दिसत आहे. सोबतच या व्याधीच्या इलाजासाठी निधी गोळा करण्याकरिता ते कोणतेही बेकायदेशीर कृत्य करीत असल्याचेही दिसत आहे. त्याच अनुषंगाने आता शहरातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या मालकीच्या जागांची सुरक्षा करण्याची गरज निर्माण झाली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: