Thursday, November 30, 2023
Homeगुन्हेगारीअकोला | त्या फरार १३ आरोपींना वनविभागाने जारी केले समन्स...चौकशी करता २...

अकोला | त्या फरार १३ आरोपींना वनविभागाने जारी केले समन्स…चौकशी करता २ डिसें. रोजी हजर राहण्याचे फर्मान…हजर न झाल्यास…

Spread the love

अकोट- संजय आठवले

तेल्हारा तालुक्याच्या सौर ऊर्जा प्रकल्पातील वन्य पशु शिकार प्रकरणी फरार झालेल्या त्या १३ ही आरोपींना वनविभागाने समन्स जारी करून २ डिसेंबर रोजी वनविभागाचे आकोट कार्यालयात हजर राहण्याबाबत सूचित केले आहे. तसे न झाल्यास फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याकरिता पोलीस विभागाची मदत घेण्यात येणार आहे. परंतु या संदर्भात अधिक माहिती घेतली असता या सौर प्रकल्पाशी संबंधित तीनही कंपन्यांच्या उच्चस्तरीय घटकांना या घटनाक्रमाबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान हा प्रकल्प कुणालाच विकल्या नसल्याचेही उच्चस्तरावरून सांगण्यात आल्याने या ठिकाणी आलेल्या कंटेनर्सबाबत गुढ निर्माण झाले आहे.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बुद्रुक येथील सौर ऊर्जा प्रकल्पात वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी या प्रकल्पातील १६ जणांवर वनविभागाने वन गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील ३ आरोपी जामीनावर सुटले असून अद्याप १३ आरोपी फरार झालेले आहेत. या फरार आरोपींना वनविभागाने समन्स जारी केले आहेत. त्यानुसार या सर्व आरोपींना २ डिसेंबर रोजी वनविभागाच्या आकोट कार्यालयात चौकशी करिता हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. त्या दिवशी हजर न झाल्यास या आरोपींच्या शोधार्थ पोलीस विभागाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

या दरम्यान या प्रकल्पाची पाहणी केली असता, आज रोजी या ठिकाणी निर्मनुष्य वातावरण आहे. येथे एकही कर्मचारी हजर नसून करोडो रुपयांचे साहित्य तसेच पडलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेच्या प्लेट्स चे नव्याने पॅकिंग होत असल्याचे आढळून आले. याचे कारण जाणून घेतले असता कळले की, ह्या प्लेट्स आधी ज्या कापडी आवरणात ठेवलेल्या होत्या, त्यात अडकल्यानेच हरीण व काळवीट यांची शिकार झालेली आहे. तो पुरावा नष्ट करून आता त्या प्लेट्स जाड खाकी कागदाच्या आवरणात पॅक केल्या जात होत्या. परंतु पुरावा नष्ट होऊ न देण्यासाठी वनविभागाने हे काम बंद पाडले. त्यामुळे पॅकिंगचे काम अर्धवट स्थितीतच राहिले. हल्ली तिथे कोणीच मनुष्य प्राणी नसल्याने हा सारा पसारा अस्ताव्यस्त पडलेला आहे. या संदर्भात या प्रकल्पाची आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या आयरन हाईड जनरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई व इंडिगो जनरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या दोन्ही कंपन्यांचे संयुक्त व्यवस्थापक चिराग वगेरिया यांचेशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. प्रकल्प विकासाची जबाबदारी असलेल्या सोलर ईरा पुणे या कंपनीचे मालक पवन रणपिसे यांचेशी संपर्क साधला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांचे एक अधिकारी संदीप हंबीर यांचेशी वार्तालाप झाला. त्यांचेशी चर्चा करताना कळाले की, त्यांना या घटनाक्रमाची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यासोबतच या प्रकल्पाच्या विक्री बाबत प्रकल्प निर्मात्यांचा कोणता मनसुबाही नाही. त्यांच्या ह्या स्पष्टोक्तिने आता प्रकल्प स्थळी आलेल्या कंटेनर्स बाबत गुढ वाढले आहे. सोबतच हे कंटेनर्स इथे कुणाचे सांगण्यावरून आले? कशासाठी आले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

याखेरीज ह्या प्रकल्पातर्गत होणाऱ्या काही लबाडीची ही माहिती मिळाली. या प्रकल्पाकरिता शेती देणाऱ्या काही शेतकऱ्यांना त्यांचे परिवारातील कुण्या एकाला नोकरीत सामावून घेण्याचे आमीष दाखविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अद्याप त्यावर कोणतीच अंमलबजावणी झालेली नाही. या प्रकल्पाचे पश्चिमेला ई क्लासची मोठी जमीन आहे. त्यातील काही जमिनीवर या प्रकल्पाने कब्जा केल्याचे आजूबाजूचे शेतकरी सांगतात. ह्याच जमिनीतील तलावही प्रकल्पासाठी बुजवण्यात आला आहे. प्रकल्पानिकटचा नालाही काही ठिकाणी सपाट करून त्याचा प्रवाह दुसरीकडे वळविण्यात आला आहे. ह्या सपाट जागेवर प्रकल्पाने कब्जा केला आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या ह्या माहितीवरून या प्रकल्पांतर्गत वनविभागा सोबतच महसूल विभागाचे ही नियम बंधने तोडली केल्याचे दिसते. त्यामुळे वनविभागासह महसूल विभागानेही या प्रकल्पाची चौकशी करणे गरजेचे बनले आहे.


Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: