Friday, May 17, 2024
Homeराजकीयआमदार भारसाखळे यांना धक्का…हिवरखेड नगरपंचायतीच्या रणभूमीत उतरले आजी-माजी सैनिक….मागणी मान्य न झाल्यास...

आमदार भारसाखळे यांना धक्का…हिवरखेड नगरपंचायतीच्या रणभूमीत उतरले आजी-माजी सैनिक….मागणी मान्य न झाल्यास तीव्र लढ्याची केली रणगर्जना…

Share

आकोट – संजय आठवले

आकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हिवरखेड नगरपंचायत होण्यावर आणलेल्या स्थगितीने निर्माण झालेला तिढा सोडविण्याकरता या मुद्द्याच्या लढाईत आता आजी-माजी सैनिकही उतरले असून हिवरखेड नगरपंचायतचा प्रश्न त्वरित निकाली न निघाल्यास तीव्र स्वरूपाचा लढा लढणार असल्याची रणगर्जना या आजी-माजी सैनिकांनी केली आहे. आजी-माजी सैनिकांची ही भूमिका आमदार भारसाखळेंकरिता मोठा धक्का आहे.

हिवरखेड ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा मुद्दा दिवसा गणिक तीव्र होत चालला आहे. या मुद्द्यावर शासन दरबारी आक्षेप घेणाऱ्यांनीही आपले आक्षेप मागे घेऊन नगरपंचायतीचे समर्थन केले आहे. शेतकरी, उद्योजक, राजकारणी, विद्यार्थी, युवावर्ग, व्यापारी या सर्वच स्तरातील लोकांचे या मुद्द्यावर एकमत झालेले आहे. परंतु आमदार भारसाखळे हे मात्र हिवरखेड नगरपंचायत होऊ न देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे हिवरखेडवासियांमध्ये अत्यंत चिड निर्माण झाली असून या मुद्द्यावर हिवरखेडकर “करेंगे या मरेंगे” या भूमिकेवर येताना दिसत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून येथील युवा व्यावसायिक धीरज बजाज यांनी याप्रकरणी शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. “ही नगरपंचायत करतो” असे शासनाद्वारे अभिवाचन देऊन पत्रकार अर्जुन खिरोडकर यांचे आमरण उपोषण प्रशासनाने सोडविलेले आहे. परंतु एकीकडे लोकशाहीतील ही अस्त्रे शासनाने निष्प्रभ ठरविली आहेत. तर दुसरीकडे मात्र संविधानास मंजूर नसलेले सत्ताशाहीचे एक पत्र शासनाने डोईवर घेतले आहे. परिणामी आमदार भारसाखळे यांनी शाईने लिहिलेल्या एका पत्रामुळे हिवरखेडकरांनी स्वरक्ताने लिहिलेली शेकडो पत्रे कचरापेटीत टाकली गेली आहेत. हे चित्र अतिशय क्लेशदायक, संतापजनक व संविधान विरोधी आहे. वास्तविक लोकशाहीमध्ये व्यापक जनभावना विचारात घेऊन निर्णय घेणे अनिवार्य असताना, केवळ एकाच्या अहंकारापायी जनभावना चिरडण्याचा प्रकार शासन करीत आहे. शासनाच्या ह्या हुकूमशाहीने देशाच्या सीमेवर तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या हिवरखेड परिसरातील आजी-माजी सैनिकांचे रक्त तापले आहे.

त्यामुळे हिवरखेड येथील आजी-माजी सैनिक संघाने ह्या रणसंग्रामात उडी घेतली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या भावना अवगत केल्या आहेत. आमदार भारसाकळेंनी याप्रकरणी आणलेल्या स्थगितीबाबत या सैनिकांनी तीव्र नापसंती दर्शविली आहे. ही स्थगिती ताबडतोब उठवून हिवरखेड नगरपंचायत निर्मितीची अधिसूचना त्वरित काढण्याची विनंती या सैनिकांनी केली आहे. या मागणीचा विचार न झाल्यास यासंदर्भात तीव्र लढा लढण्याचा निर्धारही या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

आजी-माजी सैनिकांच्या या पत्राने या लढ्याची गंभीरता वाढली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यमान मोदी सरकार देशाच्या सैनिकांबाबत नेहमीच आदर सन्मान असल्याचे भासवीत असते. तीच बतावणी मोदी सरकारचे पिल्लू असलेले शिंदे फडणवीस सरकारही करीत आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारकडून या सैनिकांच्या भावनांचा सन्मान होणे अपरिहार्य आहे. परंतु तसे न झाल्यास देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांपेक्षा शिंदे फडणवीस यांना देशातील जनभावना पायदळी तुडविणारा आपला एक आमदार अधिक महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित होईल. ज्याद्वारे संविधानाचाही उपमर्द होईल. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पत्रावर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

आजी माजी सैनिकांच्या या पत्रावर अध्यक्ष- दिपक कवळकार, उपाध्यक्ष- सुनिल निंबोकार, गोपाल भोंगाळे, कार्याध्यक्ष- विनोद बांगर, सचिव-विनोद बहाकर तथा राजेंद्र गावंडे,
विलास देउळकार, गणेश देउळकार, रमेश येनकर, प्रकाश रेखाते, गणेश झगडे, सुरेश अस्वार, सिध्दार्थ वाकोडे, अशोक मसुरकार, अनिल भुडके, गजानन लोखंडे, अशोक विध्वांस, तुळशिराम वरटकार, राजाभाऊ देशमुख, गोपाल निंबोकार, सुधाकर मोरोकार, अरुण सपकाळ,अर्जुन सुरळकार, नरेश कराळे, राजेश वानखडे, देविदास इंगळे, रमेश काळे,
रामदास राहाटे, अभिमन्यु सावदेकर, अरुण इंगळे, भाऊदेव काइंगे, रामभाऊ चव्हाण, संतोष भटकर, राजेश इंगळे, नरेश बांगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: