Friday, May 17, 2024
Homeराजकीयकरोडोच्या इमारतीमध्ये थेंबही नाही पाण्याचा…यासाठीच घेतला काय सोहळा लोकार्पणाचा?…आमदार भारसाखळे यांना नागरिकांची...

करोडोच्या इमारतीमध्ये थेंबही नाही पाण्याचा…यासाठीच घेतला काय सोहळा लोकार्पणाचा?…आमदार भारसाखळे यांना नागरिकांची पृच्छा…

Share

आकोट – संजय आठवले

काँग्रेसच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या परंतु भाजपच्या काळात पूर्णांशाने ताब्यात आलेल्या जागेवर प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला असून या ठिकाणी करोडो रुपयांची लागत लावून भव्य इमारत उभी करण्यात आलेली आहे. मात्र या इमारतीमध्ये पेयजलाची अद्याप व्यवस्थाच करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

तर दुसरीकडे जेथून ह्या पेयजलाची व्यवस्था होणार असल्याची चर्चा आहे ते ठिकाण पाहिल्यावर तेथील पाणी पशुही पिणार नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे केवळ मतांची बेगमी करण्याकरिता आमदार भारसाखळे यांनी लोकांच्या जीविताशी खेळ मांडला असल्याचे दिसत आहे.

माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांचे कार्यकाळात आकोट शहरात प्रशासकीय इमारत उभी करुन महसूल विभागाशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीमध्ये आणण्याची कवायत सुरू झाली. ती २०२४ मध्ये पूर्ण होऊन अखेर ही इमारत कार्यान्वित झाली आहे. शासकीय अंदाजपत्रकानुसार या इमारती करिता तब्बल १९ करोड ५० लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत.

त्यानुसार अतिशय भव्य आणि दिमाखदार अशी वास्तू बनलेली आहे. थोड्याच दिवसात निवडणूक आचारसंहिता लागणार आहे. त्याकरिता येथील सोयी अर्धवट असल्यावरही विकास पुरुष म्हणविल्या जाणाऱ्या अर्धवटराव आमदार भारसाखळे यांनी घाईघाईने या इमारतीचा लोकार्पण सोहळा आटोपला आहे.

हा खटाटोप भारसाखळे यांनी जनमत प्रभावित करण्याकरिता केला. परंतु ह्या खटाटोपाचे बूमरॅंग झाल्याचे सद्यस्थितीत दिसत आहे. ही वास्तू उभी होऊन तिथे कामकाजही सुरळीत सुरू करण्यात आले आहे. येथे कामानिमित्त तेल्हारा व आकोट तालुक्यातील लोकही येत आहेत. इमारत पाहून ते भांबावूनही जात आहेत. मात्र आपली कामे करणेकरिता पहिला माळा, दुसरा माळा असे हेलपाटे घेतल्यावर घशाला कोरड पडते. तेव्हा मात्र त्यांचे भांबावलेपण संपून त्याची जागा तीव्र संताप घेत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या ठिकाणी पेयजलाची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. कामाकरिता येणाऱ्या लोकांची तर सोडा परंतु चक्क अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिताही ही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना पेयजल चक्क विकत आणावे लागत आहे.

सद्यस्थितीत उन्हाचा चटका सुरू झाला आहे. त्यात हे तहसील कार्यालय शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे वाहनाशिवाय येणे म्हणजे मोठीच परीक्षा. ऑटो करिता पैसे नसलेल्या गरीब लोकांना तर येथे पायदळ वारीच करावी लागते. साहजिकच येथे आल्याबरोबर पेयजलाची आवश्यकता भासते. म्हणून येथे आल्यावर पाणी पिऊ असे म्हणणारे येथे येताच अनुभवतात तो पेयजलाचा ठणठणाट. त्यातही कुठे पाणी विकत घेण्याची सोय नाही.

त्यामुळे ही इमारत पाहून प्रथम भांबावून गेलेल्या लोकांचा संताप अनावर होत आहे. येथे उपाहारगृह सुरू होण्याची प्रक्रिया ही अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांचेसह नागरिकांचीही पाण्याकरिता मोठी आबाळ होत आहे.

याबाबत सूत्राद्वारे कळले कि, ही इमारत बांधणेकरिता या ठिकाणी एक बोरवेल तयार करण्यात आलेली आहे. त्यातील पाणी इमारतीच्या छतावरील टाक्यात भरून ते पाणी पिण्याकरिता वापरले जाणार आहे. परंतु गोम अशी आहे कि, हे पाणी क्षारयुक्त असल्याने पिण्यास योग्य नाही. त्यावर सांगितले गेले कि, एक मशीन आणून त्याद्वारे हे पाणी पिणे योग्य केले जाणार आहे.

या खुलाशाने दिलासा मिळण्यापेक्षा या इमारतीच्या बांधकामातील मोठी बदमाशी उघड झाली आहे. ती अशी कि, ही इमारत बांधणेकरिता याच बोरवेलचे पाणी वापरण्यात आले आहे. शासनाचेच नियमानुसार कोणत्याही बांधकामाकरिता क्षारयुक्त व खारट पाण्याचा वापर करता येत नाही. अशा पाण्याने बांधकाम पूर्णपणे मजबूत होत नाही. बांधकामावर क्षारांचा अनुचित परिणाम होऊन बांधकामाचे वयोमान कमी होते.

असे असल्यावरही हे क्षारयुक्त व खारेपाणी या इमारतीचे बांधकामाकरिता वापरण्यात आले आहे. या बांधकामावर देखरेख करण्याचे काम प्रवीण सरनाईक, कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला यांचे होते. येथे उल्लेखनीय आहे कि, हे अधिकारी आमदार भारसाखळे यांचे खास मर्जीतील आहेत. त्यांनीच सरनाईकांची वर्णी अकोला येथे लावून घेतलेली आहे. त्यामुळे हे काम नियमानुसार काटेकोर होणे अपेक्षित होते.

परंतु तसे न होता कंत्राटदारास बांधकामाकरिता आणाव्या लागणार्‍या गोड्या पाण्याचा खर्च वाचवून सरनाईक यानी कंत्राटदाराप्रती आपली आत्मीयता प्रदर्शित केली आहे. अर्थात या खर्चाची विल्हेवाट कशी झाली असेल याची कल्पना चाणाक्ष वाचकांना आम्ही देण्याची गरज नाही. जिज्ञासू वाचकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रयोगशाळेत जाऊन खाऱ्या आणि गोड पाण्याचा नियम जाणून घ्यावा.

एकीकडे कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांची अशी कर्तव्य दक्षता? ध्यानात आली. परंतु दुसरीकडे याच बोरवेलचे पाणी या इमारतीमध्ये येणारांची तहान भागणार आहे, हे ऐकून अतिशय धक्का बसला. याचे कारण म्हणजे ह्या बोरवेलची जागा. ही बोरवेल या इमारतीच्या पिछाडीस आहे.

समोरून ही इमारत जितकी देखणी दिसते तितकीच विद्रुपता या इमारतीचे पिछाडीस आहे. या ठिकाणी आताच मोठे गटार साचलेले आहे. त्यामध्ये अनेक विषारी झुडपे वाढण्यास सुरुवात झालेली आहे. केर कचराही मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला आहे. स्वच्छता या शब्दाने लाजेने मान खाली घालावी अशी येथील अवस्था आहे.

या सर्वात कहर म्हणजे या इमारतीमध्ये निर्माण होणारे सर्व प्रकारचे सांडपाणी वाहिन्यांद्वारे याच ठिकाणी सोडण्यात आलेले आहे. म्हणजेच इमारतीमधील प्रसाधनगृहात येणारांनी केलेल्या लघुशंकेचे पाणी या ठिकाणी साचणार आहे. आणि संताप जनक म्हणजे ते सांडपाणी याच ठिकाणी झिरपून बोरवेल मध्ये, तेथून पाण्याच्या टाकीत व तेथून नागरिकांच्या पोटात जाणार आहे.

परंतु याची दखल ना आमदार भारसाखळे यांनी घेतली ना प्रवीण सरनाईक यांनी घेतली ना कंत्राटदाराने ना या इमारतीमधील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली म्हणजे जनमत प्रभावित करून मते मिळविणेकरिता विकासपुरुष आमदार प्रकाश भारसाखळे यांनी चक्क मतदारांच्याच जीवाशी खेळ मांडला असल्याचे दिसून येत आहे.

येथे विशेष उल्लेखनीय म्हणजे या इमारतीचे समोरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी आहे. तेथून येथील जलापूर्तीची जोडणी घेता येणे सहज शक्य आहे. परंतु तसे न करता या घातक ठिकाणातील बोरवेल मधून पेयजल घेण्याची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावरून “अपना काम तो जमता फिर भाड मे जाये जनता” अशा उक्तीनुसार भारसाखळे यांची वाटचाल असल्याचे दिसत आहे.

ही वास्तविकता समजल्यावर या प्रशासकीय इमारतीमध्ये आलेल्या एका ग्रामस्थाने जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, म्हणजे दर्यापूर येथून आकोटात येऊन आमचेच मूत्र आम्हाला पाजून भारसाखळे आमची मते घेत आहेत तर”. ही प्रतिक्रिया ऐकून तरी अर्धवटराव भारसाखळे यांनी येथील पेयजलाची समस्या सोडवावी असे लोक बोलत आहेत.


Share
Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: