Sunday, April 28, 2024
Homeराज्यसांगली जिल्ह्यातील ४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया...

सांगली जिल्ह्यातील ४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया…

Share

स्वतंत्र बस ने बालके मुंबईकडे रवाना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या शुभेच्छा…

सांगली – ज्योती मोरे

सांगली आयुष्यमान भव योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून जिल्ह्यातील 46 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एस.आर.सी.सी. रुग्णालय, मुंबई येथे या बालकांवर हृदय शस्त्रक्रिया होणार आहेत. बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, औषधोपचार, निवास, भोजन व्यवस्था या सर्व सोयी शासन मोफत करत आहे.

त्यामुळे कोणीही चिंता करू नये. सर्व बालकांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी होवून ती तंदुरूस्त होवून येतील असा दिलासा देवून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बालक व पालकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी बालकांना स्वतंत्र बसने मुंबईकडे पाठविण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस, व्यवस्थापक कविता पाटील तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, एस.आर.सी.सी. रुग्णालय, मुंबई येथील डॉक्टर मुलांच्या बॉडीचा फिटनेस बघून हृदय शस्त्रक्रिया करतील. ज्या मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी काही अडचण आहे, अशा मुलांना औषधोपचार करून त्यांच्याही हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जातील. सर्व मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया व्यवस्थित होतील याची काळजी डॉक्टर्स, हॉस्पीटल, प्रशासनाबरोबर आम्ही सर्वजण घेत आहोत.

पालकांनी मुलांबरोबरच त्यांच्या तब्बेतीचीही काळजी घ्यावी. येत्या मंगळवारी किंवा बुधवारी एस.आर.सी.सी. रुग्णालयात येवून तेथील डॉक्टर्स यांच्याबरोबरही बालकांवर केल्या जाणाऱ्या हृदय शस्त्रक्रियेसंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असून आजअखेर 1 हजार 520 लाभार्थ्यांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.

15 हजार 40 लाभार्थी बालकांवर इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या असून 120 कर्णबधिर लाभार्थी बालकांवर 10 लाख इतक्या खर्चाच्या कॉकलिअर इम्पलांट या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबिरामध्ये तपासणी केलेल्या 205 लाभार्थी बालकांपैकी 60 लाभार्थी बालकांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदर्शनास आले.

त्यापैकी एस.आर.सी.सी. रुग्णालयाने संदर्भित केलेले 30 लाभार्थी बालक आणि यापूर्वी शस्त्रक्रिया प्रलंबित असलेल्या बालकांपैकी तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणारे 16 लाभार्थी बालक अशा 46 लाभार्थी बालकांवर या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मंजूर अनुदानातून करण्यात येणार असून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त अनुदान हे मुंबईतील खाजगी सेवाभावी व धर्मादाय संस्था यांच्याकडून एस.आर.सी.सी. हॉस्पिटलकडे उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: