Thursday, May 2, 2024
Homeगुन्हेगारीअकोल्यात २०० कोटींचा जमीन घोटाळा..? भाग १

अकोल्यात २०० कोटींचा जमीन घोटाळा..? भाग १

Share

शैक्षणिक ट्रस्टला हाताची धरत 200 कोटींची जागा गिळंकृत करण्याचा काही राजकारणी आणि बिल्डरांचा डाव. शैक्षणिक संस्थेसाठी राखीव असलेली शहरातील 10 एकर जागा ट्रस्टने बेकायदेशीरपणे काढली विक्रीला.

अकोला शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका जमीनीती विक्री सध्या वादग्रस्त ठरत आहे. अकोल्यातील गोरक्षण रोडवर ‘होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ची दहा एकर जागा आहे. ही जागा सोसायटीने विक्रीला काढली आहे. ही जागा होमिओपॅथी कॉलेजसाठी प्रस्तावित असतांना जमीन विक्रीची निविदा काढल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

शहरात सर्वाधिक महागडी जमीन असलेल्या भागांपैकी गोरक्षण रोड हा भाग समजला जातो. ही जमीन बेकायदेशीरपणे विकण्याची तयारी करण्यात आल्याचा आरोप अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकारांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकार, जिल्हाधिकारी आणि विभागीय सहायक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या 200 कोटी बाजारभाव असलेली ही जागा फक्त 50 ते 60 कोटींत विकण्याचा घाट घातला जात आहे.

शहरात स्वत:ची जागा असतांना सध्या संस्थेद्वारा चालवलं जाणारं ‘होमिओपॅथी कॉलेज’ अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका भाड्याच्या इमारतीत चालवलं जात आहे. *’होमिओपॅथी महाविद्यालया’ची जागा खाजगी बिल्डरांना विकण्याचा संस्थेचा डाव! :* शहरात चांगलं आणि अद्ययावत होमिओपॅथी महाविद्यालय असावं असं अकोला येथील ‘होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ला वाटत होतं. त्याच अनुषंगाने 1959 सालाच्या काही काळ आधी ही सोसायटी स्थापन करण्यात आली.

यातूनच तेंव्हाच्या माजी विश्वस्तांनी अकोला शहरातील गोरक्षण मलकापूर मार्गावर 1959 मध्ये एक जागा नाममात्र मोबदल्यात विकत घेतली. मौजे मलकापूर येथे शेत सर्व्हे नंबर 13 मधील 10 एकर जागा 31 मार्च 1959 मध्ये विकत घेतली गेली. वैद्यकीय शिक्षणाच्या उदात्त हेतूने जागेचा वापर होत असल्याने शिवशंकर जानी या दानशूर व्यक्तीने तेंव्हा अगदी नाममात्र दरात आपल्या 10 जागेची खरेदी या संस्थेला खरेदी करून दिली. ही जागा त्याकाळी मुख्य शहरापासून काहीशी दुर होती. ही 10 एकपेक्षा अधिक असलेली जागा 4 लाख 34 हजार 865 चौरस फुट म्हणजेच 4 हेक्टर 4 आर एव्हढी आहे.

Viju bhau

या जागेत होमिओपॅथी महाविद्यालय आणि यामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा, मुलांचे वस्तीगृह, रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान व इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन करून ठेवले होते. पुढे ही 10 एकर जागा पुढे ‘एकवीरा देवी मैदान’ नावाने ओळखली जाऊ लागली. मात्र, या जागेवर होमिओपॅथी महाविद्यालयाचं बांधकाम न झाल्याने ती तशीच मोकळी होती. गेल्या वीस वर्षांत अकोला शहराचा विकास आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले.

यामुळे अतिशय उच्चभ्रू आणि महागडा भाग समजल्या जात असलेल्या गोरक्षण मार्गावरील ही 10 जागा शहराच्या अगदी मध्यात आली. या मैदानाच्या आजूबाजूला मोठमोठे बंगले, कॉम्प्लेक्स, गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिलेत. त्यातूनच शहरासह अमरावती विभागातील काही भूमाफीया, राजकारणी आणि बिल्डर्स यांची नजर या जागेवर पडली. त्यातच आता ही जागा संस्थेच्या संचालक मंडळातील काहींना हाताशी धरून बळकावण्याचा घाट काही लोकांकडून घातला जातो आहे. ही जागा आता विकण्यासाठी ट्रस्टने जाहीर निविदा काढली आहे. सदर संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत पंजीबद्ध आहे.

या अधिनियमातील तरतुदीनुसार कोणत्याही जमिनीची व्यवहार करण्यापूर्वी किंवा त्याची लिलाव विक्री प्रकाशन करण्यापूर्वी धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. या संस्थेने सदर परवानगी मिळवलेली आहे किंवा नाही याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. *निविदा काढतांना नियम बसवलेत धाब्यावर! : या 10 एकर जागेची निविदा काढतांना त्यात मोठ्या प्रमाणात त्रृटी ठेवत गोंधळ घालण्यात आला आहे. मुळात या संपुर्ण 10 एकर जमिनीला अकृषक करतांना त्याचा तात्पुरता ‘लेआऊट नकाशा’ महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. हे करीत असतांना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असते.

मात्र, निविदा काढतांना सर्वच नियम धाब्यावर बसवले गेलेत. निविदा प्रक्रियेत जागेचा ‘लेआऊट नकाशा’ मंजूर झालेला असतांना विक्री मात्र एकरानुसार करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथील जागेचे भाव सध्या सरकारी रेडीरेकनरनुसार 14 हजार 50 रूपये प्रति चौरस मीटर आहे. मात्र, प्रत्यक्षात येथील बाजारभाव 20 ते 25 हजार रूपये प्रतिचौरस फुट आहे. त्यातच निविदेत जागेचा प्रस्तावित भावच नमूद न केल्याने ट्रस्टने जागेची किंमत किती ठेवली?, हे स्पष्ट होत नाही.

निविदा दाखल करतांना मालमत्तेच्या नमूद किंमतीच्या 10 टक्के रक्कम अमानत रक्कम म्हणून भरावी लागते. त्यामूळे मूळ किंमत निविदेत टाकली नसल्याने आलेल्या निविदा फेटाळण्याचा ‘चोर दरवाजा’ ट्रस्टने उघडा ठेवला का?, असा प्रश्न विचारला जात आहे. *जागा विक्रीच्या निर्णयापासून ‘ट्रस्ट’चे अनेक सदस्य अनभिज्ञ! :*या जागा विक्रीचा निर्णय ‘अकोला होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी’ या ट्रस्टमधील सर्व विश्वस्थांच्या एकमताने घेतला गेल्याचा दावा ट्र्स्टच्या अध्यक्ष-सचिवांकडून केला जात आहे. मात्र, यात काहीच सदस्यांना हाताशी धरून हा व्यवहार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

1959 मध्ये नाममात्र दरात जागा देणारे जानी कुटुंबियांचे सदस्य आणि ‘ट्र्स्ट’च्या विश्वस्थांपैकी एक असलेले विजय जानी यांनी या संपुर्ण प्रकाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात संचालक मंडळाची कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही संपुर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जागेवर भूमाफीया, राजकारणी आणि बिल्डरांचा डोळा! :*’ट्रस्ट’च्या माध्यमातून ही जागा घशात घालण्याचा अनेकांचा डाव आहे. यात काही भूमाफीया, राजकारणी आणि बिल्डरांचा समावेश आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही लोक या व्यवहारात गुंतल्याची चर्चा आहे. मोठे जनप्रतिनिधी, बड्या पक्षांचे मोठे पदाधिकारी या कटकारस्थानात सामिल असल्याची चर्चा अकोला शहरात आहे.

अकोला होमिओपॅथी एज्युकेशन ट्रस्ट’ या प्रश्नांची उत्तरे देणार का?. संस्थेने महाविद्यालय बांधण्यासाठी राखीव ठेवलेली जागा विकण्याचा घाट का अणि कुणाच्या म्हणण्यानुसार घातला जातोय?. निविदा प्रकाशीत करतांना त्यात विक्री चौरस फुटांऐवजी एकराने करणार असल्याचं का नमुद केलं गेलं?. जर असं करायचे होते तर महापालिकेकडून तात्पुरता लेआऊट नकाशा का मंजूर केला गेला?. निविदेत जमिनीची मुळ किंमत का लिहिली गेली नाही?.

काही निविदा आल्या असतांना त्या जाणीवपुर्वक का स्वीकारल्या गेल्या नाहीत?. # हे सर्व करीत असतांना प्रत्येक ठिकाणी आवश्यक असलेल्या धर्मदाय आयुक्तांच्या परवानग्या वेळोवेळी घेण्यात आल्यात का?. होमिओपॅथी महाविद्यालयासाठी असलेल्या अकोल्यातील या जमीन विक्रीचा उद्देश निश्चितच चांगला नाही. आधीच अकोल्यात चांगल्या शैक्षणिक संस्था बोटावर मोजण्याइतपत असतांना या माध्यमातून शिक्षणाच्या मुळ हेतूलाच नख लावण्याचा हा प्रयत्न आहे. अकोल्यातील दलाल, भूमाफीया, राजकारणी आणि बिल्डरांची ही अभद्र युती तोडण्यासाठी आता कोण पुढे येणार?, हाच खरा प्रश्न आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: