जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी कुणाला दिला इशारा…वाचा काय आहे प्रकरण

भंडारा : कोविड १९ च्या नावावर प्राप्त अनुदानातून जिल्हा आरोग्य विभागाने लाखोंची औषधी खरेदी केली. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषद स्थायी सभेची मंजुरी घेतली नाही. यासह अन्य साहित्य खरेदीतही मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत उईके यांचा तात्काळ प्रभावाने कार्यभार काढावा,

अन्यथा जिल्हा परिषदसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दस्तुरखुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला आहे. या आशयाचे पत्र रमेश डोंगरे यांनी आज मुख्यकार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांना दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत उईके यांनी कोविड १९ च्या नावावर शासनाकडून प्राप्त अनुदानातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ६१ लाख ४८ हजार २०० रुपयांची, ओटीएससी अंतर्गत १५ लाख २१ हजार ५० रूपये तर आमदार विकास निधी अंतर्गत ११ लाख १ हजार ७९६ असा एकूण ८७ लाख ७१ हजार ४६ रुपयांची औषधी खरेदी केली आहे.

मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंजुरी घेतलेली नाही. किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने त्यांना कुठलीही कल्पना दिली नसल्याचा आरोप डोंगरे यांनी केला आहे. सोबतच विभागाअंतर्गत संगणक खरेदी प्रकरणात गैरव्यवहार, अनियमितता व भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही अध्यक्ष डोंगरे यांनी केला आहे.

संगणक खरेदी प्रकरणाची मुख्यलेखा व वित्त अधिकारी यांनी चौकशी केली असून त्यात ते दोषी आढळून आल्याचा ठपका जिल्हा परिषद अध्यक्ष डोंगरे यांनी डॉ उईके यांच्यावर लावला आहे.

डॉ प्रशांत उईके यांच्याकडील जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा प्रभार काढावा, यासाठी १२ जूनला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव पारित केलेला आहे. त्यामुळे डॉ उईके यांच्याकडील प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार तात्काळ प्रभावाने काढून दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्यास जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार द्यावा.

चार दिवसाच्या आत ही कारवाई करा, अन्यथा जिल्हा परिषदसमोर उपोषणाला बसू असा इशारा, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे. या प्रकरणावरून जिल्हा परिषद प्रशासन विरुद्ध जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. सिईओ भुवनेश्वरी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

प्रतिक्रिया
सर्व खरेदी नियमानुसार – डॉ प्रशांत उईके
∆ कोविड१९ ची औषधी खरेदी असो वा संगणक खरेदी असो, यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही, सर्व खरेदी शासकीय नियम आणि सर्व दिशानिर्देशाचे तंतोतंत पालन करून करण्यात आलेले आहे. नेमलेल्या समितीच्या मार्गदर्शनात उच्च दर्जाची औषधी खरेदी केलेली आहे. त्यामुळे खरेदी पारदर्शक झाली असल्याने, मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.

डॉ प्रशांत उईके
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, भंडारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here