-अविनाश राऊत
अकोला :- अकोला जिल्ह्यात बहुसंख्येनं असलेल्या. राजकीय उलथापालथ घडविण्याची क्षमता असलेल्या मराठा आणि माळी समाजाला एकाच वेळी खुश करण्याची खेळी युवा सेनेच्या नेतृत्वाने खेळली आहे. आगामी राजकीय गणितं डोळ्यासमोर ठेवून मराठा आणि माळी अर्थात ” एमएम” समीकरण साधलं आहे.
अकोल्यात युवा सेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांना पदावर कायम ठेवत, अजून एक जिल्हाप्रमुख म्हणून दीपक बोचरे यांची नेमणूक केली आहे. ही नियुक्ती करताना शिवसेनेने दोन मोठया समाजाला खुश ठेण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरण मराठा आणि माळी समाजाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.
या दोन्ही समाजाची जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रावर भक्कम पकड राहिलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातल्या राजकारणावर दोन्ही जातीच्या नेतृत्वाने कमीअधिक प्रमाणात वर्चस्व गाजविले आहे. ज्या पक्षाला या दोन्ही समाजाची मोट बांधण्यात यश आलं, त्या पक्षाला आजवरच्या बहुतांश निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करता आल्याचं दिसते.
अशीच “डबल एम”ची मोट बांधण्याचं काम राज्यातल्या सत्ताधारी शिवसेनेने हाती घेतलं आहे.युवासेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांना मुद्यांवर अनेकदा आवाज उठवून अनेकांना न्याय देण्यात यश मिळविले. युवकांच्या शिक्षणाचा आणि महाविद्यालयीन प्रवेशाचा मुद्दा त्यांनी लावून धरला. शहरातील काही प्रतिष्ठित शाळा- महाविद्यालयात प्रचंड प्रमाणात शुल्क वसूल करण्यात येत होते.
काही ठिकाणी विद्यार्थ्यांना धार्मिक आधारावर त्रास दिला जात होता, यावर त्यांनी शिवसेना स्टाईलने आवाज उठवीत अनेकांना न्याय दिला. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर युवासेनेचे नेतृत्व खुश आहे. मात्र, आमदार गोपिकीसन बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांच्यातील मतभेदाचा फटका अनेकदा सरप यांना बसला. तरीही त्यांनी काम कायम ठेवलं.
अशा परिस्थितीत एका दगडात दोन पक्षी मारून पक्षहीत साधण्याची खेळी युवा सेनेने खेळली आहे. विठ्ठल सरप यांना न दुखवता दीपक बोचरे या युवा कार्यकर्त्याला समोर केलं आहे. दीपक बोचरे शांत, संयमी आणि चिकाटीने काम करण्यासाठी युवासेनेत नेहमीच चर्चेत असतात. आ. देशमुख यांच्या सोबतच आमदार बाजोरीया यांच्याशीही ते उत्तम जुळवून घेतात. बोचरे माळी समाजातून येतात.
त्यामुळे त्यांच्यावर बाळापूर आणि अकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघात माळी समाज लक्षणीय आहे. विठ्ठल सरप यांच्याकडे अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि मूर्तिजापूर या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राहणारआहे.
पुढील राजकीय गणितं नीट सोडविण्यासाठी युवा सेनेच्या नेतृत्वाने मराठा आणि माळी समाजाला जवळ करण्यासाठी डबल एम खेळी खेळली असून, ही “एमएम” जोडी युवासेनेत अजून बळकटी आणेल. याचा लाभ येत्या निवडणुकांमध्ये घेता येईल, असा कयास आहे