यवतमाळ | अनावश्यक बाहेर फिरणार्यांवर होणार कारवाई…

सचिन येवले,यवतमाळ

यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण भागाकडे झाला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अजूनही काही नागरिकांना कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य आलेले दिसत नाही.

त्यामुळेच प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढेही अनावश्यकपणे बाहेर फिरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे.


जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा रडारवर आले आहे. कोरोना पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णाला बहुतांशवेळी लक्षणे नसतात. पण त्याच्या संपर्कात आलेल्या व त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशा लोकांना या विषाणुचा लवकर संसर्ग होण्याची शक्यता खुप जास्त आहे.

त्यामुळे नागरिकांनी . त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यासाठी घरातच राहणे आवश्यक आहे. मात्र तरीसुध्दा तरुण-तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काही नागरिक निष्काळजीपणे वागत आहे.


जिल्हाधिका-यांनी सकाळी शहरात फेरफटका मारल्यानंतर अनेक तरुण-तरुणी अनावश्यकपणे बाहेर फिरतांना आढळले. तर काही जण गप्पा करण्यात मशगुल असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या नागरिकांना जिल्हाधिका-यांनी समज दिली. मात्र यानंतर कोणीही अशाप्रकारचे वर्तन करतांना आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रशासनाला हौस नसते. मात्र निष्काळजीपणे वागणा-या नागरिकांना धडा शिकविण्यासाठी अशी पाऊले उचलावी लागता, असेही त्यांनी सांगितले.


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळांवर थुंकणे, मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न राखणे या बाबी करतांना आढल्यास संबंधीत व्यक्तींवर साथरोग अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याअंतर्गत रस्ते, बाजार, रुग्णालये, कार्यालये इत्यादी सार्वजनिक स्थळी थुंकल्यास 500 रुपये दंड, चेहऱ्यावर मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आहे.

तसेच दुकानदार, फळे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांनी दोन ग्राहकांमध्ये तीन फुटाचे सामाजिक अंतर न राखल्यास व मार्कींग न केल्यास प्रति ग्राहकास 200 रुपये दंड, दुकानमालक विक्रेता यांना दोन हजार रुपये दंड आहे.

किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तुंचे दरपत्रक दुकानातील दर्शनी भागात न लावल्यास त्यांना दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल. वरील सर्व बाबी दुसऱ्यांदा करतांनाआढल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांच्या आदेशात आहे.

1 COMMENT

  1. रोज रात्री 10 नंतर पण आर्णी रोड, वडगांव रोड वर पायी चालणारे 100एक लोक येतात तरी कुठून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here