चिंताजनक…राज्यात एका डेल्टा प्लस रुग्णाचा मृत्यू…आरोग्यमंत्री

फोटो- सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – देशात एकीकडे कोरोनाची दुसरी लाटेचा अस्त होत असताना आता दुसरं संकट उभं ठाकलं आहे. राज्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आज रत्नागिरी येथे एका ८० वर्षीय महिलेचा या व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे .

महाराष्ट्र राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं एक बळीही घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. तसंच 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. त्यानुसार आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावर कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले, दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या घटनांवर ३ प्रश्न विचारले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची तपासणी आणि हे थांबवण्यासाठी सरकार मोठ्या स्तरावर टेस्टींग का करत नाही?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here