शरद रणपिसे यांच्या निधनाने निष्ठावान व समर्पित नेतृत्व हरपले !: नाना पटोले…

मुंबई – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्ष एका निष्ठावान व समर्पित नेतृत्वास मुकला आहे, अशी शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

शरद रणपिसे यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार केला. काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले. रणपिसे हे अभ्यासू नेते होते. युवक काँग्रेस पासून राजकीय जीवनाला सुरुवात केली होती.

पुणे महापालिकेत नगरसेवक, दोनवेळा विधानसभा व तीनवेळा विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व करताना सामान्य माणसांचे प्रश्न हिरीरीने मांडून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. काँग्रेस पक्ष संघटनेतही त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. शरद रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रणपिसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here