नाथाभाऊ कुठे गेले…त्यापेक्षा जास्त महत्वाचं कोंडमाऱ्यातून बाहेर पडले

नाथाभाऊ कुठे गेले यापेक्षा कितीतरी पट महत्वाचं आहे, ते आहेत तेथून निघाले. राजकारणातील सहनशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाथाभाऊ, ही नोंद इतिहासाला घेणे भाग पडेल, असं हे व्यक्तीत्व. मायनं झिडकारलं, बापानं लाथाबुक्क्यांनी हाणलं, तरी ब्र न काढणाऱ्या संस्कृतीतही मर्यादा पार केल्यानंतर हात उठणार नाही, पण पाय निघतोच.

निष्ठा कशाला म्हणतात याचंही आदर्श उदाहरण असलेल्या या लोकनेत्याने जिथे काम करतो तिथे पाया भक्कम करण्यासाठी आयुष्य झिजवलं. आज ऐश्वर्य उपभोगणाऱ्यांना ते शक्य होण्यासाठी हाडाची काडं करणाऱ्यांच्या नामावलीत अग्रस्थान केवळ मिळवलंच नाही टिकवलं. त्या नामवलीत अढळ स्थान असणाऱ्यांपैकी कुणी दुषणं दिली, तर काही वैषम्य वाटून न घेण्याची कुवत धारण करणारा कुणीही कुणा ऐऱ्यागैऱ्याच्या दुषणांना भीक घालणार नाहीच.

अशा वेळी आपला कठोर परीश्रमाचा जीवनपट आपल्या डोळ्यांसमोर साकारत डोळे भिजवून टाकत असेल, तर विलंब कसला ? या प्रश्नाचं उत्तर एवढा दीर्घ काळ सोसण्यात वेळ दवडणे, म्हणजे आपण सिंचन करत वाढवलेल्या रोपट्याची फांदी तोडू न धजावण्याव्यतिरीक्त असणार ते काय ? जी तत्वं आजवर जपली, जी मूल्य आजवर ललामभूत समजली,

त्यांच्याबाबत तडजोड करण्यासाठी लागणारी ताकद एकवटायला एवढा वेळ, तर नक्कीच लागणार. ती एकवटलीत. पारंबी बनून छाटून टाकल्या जाण्यापूर्वी फांदी अवस्थेतच छाटून घेतलंत. ज्यासाठी हा खटाटोप केला, ती मूल्य, तत्व, लोकभावना या लोकनेत्यानं नविन ठिकाणी जपाव्यात, त्याबाबत तडजोड न स्विकारता इतरांसाठी मार्गदर्शक ठरावं, तरच आत्मक्लेषाचा परिपाक सार्थ ठरेल.

अविनाश बेलाडकर. पत्रकार, मूर्तिजापूर, जि.आकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here